Top Post Ad

सरदार भगतसिंह यांची वाचन संस्कृतीसरदार भगत सिंह समजून घेण्यासाठी त्यांच्या मेंदूत आणि हृदयात एकदाच शिरता यायला हवं. ते मोजून किती दिवस जगले याचा जर हिशोब मांडला तर बरोबर "२३ वर्ष, ५ महिने आणि २५ दिवस". या एवढ्याश्या आयुष्यात त्यांनी जे क्रांतीदिव्य उभं केलं ते कालजयी ठरलं. त्यांचा विद्वतेचा डोलारा कधीच उसना नव्हता किंवा एका रात्रीत अंगाऱ्या धूपाऱ्याच्या दिव्यानुभूतीनं आलेला नव्हता तर घरचं क्रांतिकारी वातावरण आणि पुस्तक-वाचनाचं त्यांनी सांभाळलेलं वेड यातून त्यांनी तो स्वतः कष्टानं अर्जित केला होता, कायम राखलेला होता.एका अभ्यासकाच्या अंदाजाप्रमाणं त्यांनी शालेय जीवनात साधारण ५० अवांतर पुस्तकांचा अभ्यास केलेला (१९१३ ते १९२१), साधारण २०० पुस्तकांचा अवांतर अभ्यास कॉलेज जीवनात केला, तर अंदाजे ३०० पुस्तकांचा मुळातून अभ्यास ७१६ दिवसांच्या कैदेत केला ( एप्रिल ८, १९२९ ते मार्च २३, १९३१ ). 

  • ( हा उपलब्ध पुस्तकांच्या यादीतून काढलेला अत्यंत ढोबळ आकडा आहे. भगत सिंहांनी अभ्यासलेल्या पुस्तकांचा मूळ आकडा याहून प्रचंड मोठा असणार एवढं नक्की. ज्या काळात पुस्तकं मिळवणं प्रचंड अवघड होतं. पुस्तकांवर, पुस्तक वाचणाऱ्यांवर बंदीचा तो काळ. असं असताना हा ढोबळ आकडाही प्रचंड मोठाच आहे. )

भगत सिंहांचे एक जवळचे मित्र आणि लाहोर सेंट्रल जेलमध्ये सहकैदी असणारे शिव वर्मा भगत सिंहांच्या पुस्तक वाचनाबद्दलची एक रोचक आठवण सांगतात. ती अशी,

"आम्हा सर्वाना वाचन आवडत असलं तरी, भगत सिंहाचं वाचन प्रेम काही वेगळंच होतं. समाजवादाविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा असूनही त्यांनी कादंबर्या वाचण्याची, खासकरून राजकीय आणि आर्थिक विषयांबद्दल उत्कट इच्छा मनी धरलेली. डिकन्स(Dickens), अप्टन सिन्क्लेअर (Upton Sinclair), हॉल केन (Hall Caine), व्हिक्टर ह्यूगो (Victor Hugo), गॉर्की (Gorky), स्टेपॅनिक (Stepnik), ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) आणि लिओनार्ड अँड्रयू (Leonard Andrew) हे त्यांचे काही आवडते लेखक. कादंबर्यांतल्या काही विशिष्ट पात्रांसमवेत ते भावनात्मक-रित्या जोडले जायचे, काही काही वेळा त्या पात्रांसमवेत ते अक्षरशः रडायचे तर कधी मनमोकळे हसायचे."

क्रांती अभ्यासताना त्यांनी विनाकारण येणारं अकाली प्रौढत्व नाकारलं होतं. जगाला कलाटणी देणारी पुस्तकं वाचताना त्यांनी कथा- कादंबऱ्या आणि शेर-शायरीही मनसोक्त वाचली, त्याचा मनमुराद आनंद घेतला. गालिब यांची एक शायरी त्यांना प्रचंड आवडायची त्यांनी ती एका कागदावर उतरवून काढलेली.

यह न थी हमारी किस्मत जो विसाले यार होता,
अगर और जीते रहते यही इन्तेज़ार होता ।
तेरे वादे पर जिऐं हम तो यह जान छूट जाना,
कि खुशी से मर न जाते अगर ऐतबार होता ।   या त्यांच्या अत्यंत आवडत्या शायरीच्या पहिल्या चार ओळी.

भगत सिंहांच्या वाचन प्रेमाबद्दल एकदा द्वारकादास ग्रंथालयाचे (त्याकाळी लाहोरमध्ये, सध्या चंदीगडमध्ये) ग्रंथपाल राजाराम शास्त्री यांनी एक आठवण शिव वर्मा यांना सांगितली होती.

ग्रंथपाल राजाराम शास्त्री म्हणालेले, "भगतसिंह शब्दशः पुस्तके खाऊन टाकायचे. ते पुस्तके वाचायचे, त्यातून नोट्स तयार करायचे, वाचलेल्या पुस्तकांबद्दल मित्रांसोबत चर्चा करायचे आणि ज्ञानाच्या नव्या प्रकाशात स्वतःच्या मान्यतेची-आकलनाची कठोर समीक्षा करायचे, सर्वंकष मंथनातून ज्या चुका सापडल्या त्या दुरुस्त करून घ्यायचे."

भगत सिंहांची जेल डायरीचं जर आपण अध्ययन केलं तर राजाराम शास्त्री यांचं म्हणणं तंतोतंत खरं आहे हे समजतं. भगत सिंहांनी वाचलेल्या सर्व पुस्तकांमधली टिपणं त्यांनी त्या जेल डायरीमध्ये नोंदवून घेतली आहेत. आपल्या सुदैवानं आज त्यांची जेल डायरी उपलब्ध आहे.

भगत सिंह कायम स्वतःसोबत एक छोटंसं फिरतं ग्रंथालय बाळगायचे. त्यांचे पुतणे  जगमोहन सिंह यांच्या मते, भगतसिंह यांनी आग्रा इथं सुमारे ७० लेखकांच्या सुमारे १७५ पुस्तकांचं एक ग्रंथालय स्थापन केलेलं. हे तेच ठिकाण जिथं असेम्ब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याचं प्लॅन निश्चित करण्यात आला होता." म्हणजे क्रांतीची ठिणगी जी पडली तीही पुस्तकांच्या सानिध्यात असतानाच. 

भगत सिंह स्वतः जे वाचत त्याबद्दल सर्वांशी चर्चा करत, त्यांनी जे वाचलं ते इतरांनीही वाचवं अशी त्यांनी इच्छा असे. याच इच्छेमुळं त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॅन ब्रिन यांची आत्मकथा "आयरिश स्वातंत्र्यासाठी माझा लढा" या पुस्तकाचा अनुवाद केला. इतरांनीही वाचावं यासाठी एवढं कष्ट वाचनावर नितांत प्रेम करणारा अवलियाच करू जाणो. त्यांच्या बऱ्याचश्या पत्रात त्यांची मुख्य मागणी ही नवनव्या पुस्तकांचीच असायची,

भगत सिंहांचे मित्र जयदेव गुप्ता यांना २४ जुलै १९३० रोजी त्यांनी पाठवलेलं एक पत्र उपलब्ध आहे. ज्या पत्रातून त्यांचं पुस्तक प्रेम कमालीचं ठळकपणे दिसून येतं. ते छोटंसं पण महत्वाचं पत्र इथे वाचकांसाठी उपलब्ध करून देतोय. 

सेंट्रल जेल
लाहोर
२४ जुलै १९३०

प्रिय मित्र जयदेव,
खाली लिहिलेली पुस्तकं द्वारकानाथ ग्रंथालयातून माझ्या नावावर नोंदवून घेऊन शनिवारी कुलबीरच्या हस्ते पाठवावीत. पुस्तकांची नावं अशी,
Militarism ( Karl Liebknecht )
soviet at work ( Lenin )
Left wing Communism ( Lenin )
FIELDS FACTORIES AND WORKSHOPS ( Prince Peter Alekseyevich Kropotkin )
why men fight ( B russell )
Collapse of the Second International ( Lenin )
Mutual Aid: A factor of evolution ( Alekseyevich Kropotkin )
Civil War in france ( Karl Marx )
The Spy ( Upton Sinclair )

शक्य असेल तर कृपया मला आणखी एक पुस्तक पाठवण्याची व्यवस्था करावी. त्याचे नाव, historical materialism, bukharin असं आहे. ( हे पंजाब लायब्ररीतून मिळेल. ) आणि ग्रंथालयाच्या अध्यक्षांकडून माहिती करून घ्या की काही पुस्तकं बोर्स्टल तुरुंगात पाठवली आहेत काय? त्यांच्याकडे पुस्तकांचा भयंकर दुष्काळ पडला आहे. त्यांनी सुखदेवचे बंधू जयदेव यांच्याकडे एक यादी पाठवली होती, परंतू त्यांना अजून पुस्तकं मिळाली नाहीत. ग्रंथालयाकडे अशी एखादी यादी नसेल तर कृपया लाला फिरोजचंद यांच्याकडून माहिती मिळवून त्यांच्या पसंतीनुसार काही मनोरंजक पुस्तके पाठवा. या रविवारी मी जेंव्हा तिकडे पोहोचेन तोवर पुस्तकं तिकडं पोहोचायला हवीत. हे काम काहीही करून शीघ्र करून घ्यावं. याच बरोबर डार्लिंग लिखीत Peasant in Prosperity आणि याच सारखी आणखी ( शेतीच्या समस्याविषयक ) काही पुस्तकं डॉक्टर आलम यांच्यासाठी सुद्धा पाठवावीत. 
तुम्हाला हे कष्ट जास्त वाटणार नाहीत अशी अशा करतो. भविष्यकाळात तुम्हाला कधी कष्ट, त्रास देणार नाही असे वाचन देतो. सर्व मित्रांना माझी आठवण करून द्या. लज्जावतीजी यांना नमस्कार सांगा. दत्तच्या भगिनी आल्या तर त्या माझीही भेट घेतील अशी अशा करतो.

आपला नम्र,
भगत सिंह

~~~~~~~~~~~~

या त्यांच्या पत्राव्यतिरीक्त २६ एप्रिल १९२९ साली वडिलांना पाठवलेल्या एका पत्रात ते "गीतारहस्य" आणि "नेपोलियनचं चरित्र" वडिलांकरवी मागवून घेताना दिसतात. त्यांचं वाचनप्रेम त्यांनी आवर्जून शेवटच्या क्षणाबद्दल प्राणपणानं टिकवलं. भगत सिंहांचे वकील प्राण मेहता यांना २३ मार्च रोजी त्यांना भेटू दिलेलं. भगत सिंह पिंजऱ्यातल्या सिंहासारखे वाटलेले प्राण मेहता यांना. भगत सिंहांच्या चेहऱ्यावर कसल्याही चिंतेचा किंवा भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांनी उत्कट हास्यानं मेहता यांचं स्वागत केलं आणि त्यांनी मागवलेलं लेनिन (Vladimir Lenin) यांचं "स्टेट अँड रिव्होल्यूशन (State and Revolution) " हे पुस्तक आणलं काय असा प्रश्न केला. 

मेहता यांनी जसं त्यांना पुस्तक दिलं तसे ते पुस्तक वाचायला बसले. त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही आणि त्यांना ते पुस्तक वाचून संपवायचं होतं. वाचनावरची अशी पराकोटीची निष्ठा जगभर शोधून सापडायची नाही. मेहता निघून गेले आणि भगत सिंह यांना सांगण्यात आलं तुमची फाशी अलीकडे घेतली आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला फाशी देण्यात येईल. तोवर त्यांची थोडीथोडकीच पानं वाचून झालेली.

या प्रसंगाबद्दल भगत सिंहांचे निकटचे सहकारी मन्मथनाथ गुप्त यांनी लिहून ठेवलं आहे,

"जेव्हा फाशीचा तख्त तयार आहे हे सांगायला एक अधिकारी भगत सिंह यांच्याकडे आला तेंव्हा भगतसिंह लेनिन यांनी लिहिलेलं किंवा लेनिन यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचत होते, भगत सिंह यांनी त्यांचं वाचन चालू ठेवलं आणि दृढतम् आवाजात म्हणाले, 

"काही काळ प्रतीक्षा करा. एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकारकाची ( पुस्तकातून) गळाभेट घेत आहे." 

त्यांच्या त्या आवाजात काहीतरी विशेष होतं, तो मृत्यूचा संदेश घेऊन आलेला अधिकारीही काही काळ संमोहित झाला. भगतसिंह वाचत राहिले. काही क्षणांनंतर त्यांनी ते पुस्तक छताच्या दिशेने भिरकावून दिलं आणि धीरगंभीर आवाजात गरजले, "चला जाऊया."

इंन्कलाब जिंदाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com