तीच खरी जयंती, तोच खरा उत्सव


परमपूज्य, बोधिसत्त्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, दलितांचे उद्धारकर्ते, भारताचे भाग्यविधाते अशा अनेक उपाध्यांनी ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जगभरात गौरव केला जातो, त्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती उत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. दोन वर्षे कोरोनाने बंदीस्त केलेल्या या उत्साहाला आता उधाण न आले तर नवलच...  समस्त भारताला अंध:काराच्या गर्तेतून प्रकाशाकडे नेणा-या `प्रज्ञासूर्या'वरील ही `माया' सूर्याचे अस्तित्व असेपर्यंत तरी कायम राहील, यासाठी कुणाच्या भविष्यकथनाची गरज नाही. दिवसेंदिवस या प्रज्ञासूर्याचा प्रकाश अधिकाधिक तेजोमय होतच आहे.  या तेजोमय प्रकाशात प्रत्येकजण आपआपल्या परीने वावरत आहे. ज्याला जसे जमेल तसे तो चळवळ सांगत आहे.

 जयंतीच्या काळात नाहीतर मग महापरिनिर्वाण दिन जवळ आला की सर्वात महत्त्वाचा विषय ऐरणीवर येतो तो म्हणजे रिपब्लिकन ऐक्याचा. हे तुणतुणं मागील कित्येक वर्षे वाजवल्या जात आहे. मात्र हल्ली हल्ली त्याकडे सर्वसामान्य जनतेने दुर्लक्षच केलं आहे. ऐक्य झाले पाहिजे ही मागील कित्येक वर्षापासूनची समाजाची भावना. मात्र नेहमीच तीला आमच्या सर्वच राष्ट्रीय अध्यक्षांनी पायदळी तुडवले आहे. आता जयंतीचं औचित्य साधून पुन्हा एकदा ऐक्याची हाक देण्यात आली आहे. घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील  रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.   रिपब्लिकन पक्षाचे जे गटतट विसर्जित करून रिपब्लिकन ऐक्य घडवून  व्यापक एकसंघ रिपब्लिकन पक्ष निर्माण करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार झाला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत मात्र आत त्यासाठी जनतेने साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्षांनी केलं आहे. मात्र युती किंवा आघाडीत सहभागी होतांना कोणत्या जनतेची साथ असते हे मात्र गुलदस्त्यातच ठेवून सत्तेसाठी लाचारी स्विकारली जाते. त्यावेळेस मात्र जनतेची साथ किंवा रिपब्लिकन ऐक्य हे विषय खिजगणतीत नसतात. 
 
केवळ जयंती व महापरिनिर्वाणदिनी स्मरण करण्यापलीकडे वर्षभरात बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेवरून किती चाललो, याचा झोपडीपासून अगदी महालात राहणा-यांपर्यंत सगळ्यांनीच विचार करायला हवा. समाजातील गोरगरीब, कष्टक-यांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियांची स्थापना केली होती. पण, आजघडीला या पक्षाचे काय चित्र दिसते. अहंभावात अडकून पडल्याने दिल्लीचे तख्त गाजवण्याची ताकद असलेल्या या समाजाचे शासनकर्ती जमात होण्याचे स्वप्न तर दूरच राहिले उलट प्रगतीचा आलेख घसरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  कोणी सामाजिक व राजकीय परिवर्तनाची पहाट घेऊन येईल आणि ज्याच्या भीमटोल्यामुळे शेकडो पँथर जन्माला येतील असा `वाघ' आता आता केवळ कागदावरच दिसत आहे. त्यामुळेच का होईना स्वार्थ आणि संधिसाधूपणाला ठोकर मारून कांदा-भाकरीवर `समाधान' मानणारे बाबासाहेब पुन्हा यावेत  या भाबड्या आशेवर आजही तळागाळातला समाज लाडक्या भीमबाबांसाठी `जागर' करत असतानाच ऐक्याची साद घालून त्यांना भावनिक करायचे आणि आपण किती ऐक्यासाठी प्रयत्नशील आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा हे आता या सर्वसामान्य जनतेलाही कळू लागले आहे. 

स्वार्थाने बरबटलेले नेतृत्व कधीही आपलं दुकान बंद करणार नाहीत हे आता जनतेला चांगलंच ठाऊक झालं आहे. त्यामुळे आता या विदुषकी चाळ्यांकडे लोकही हास्यास्पद रितीने पहात दुर्लक्ष करीत आहेत. आजघडीला सहा डिसेंबर, 14 एप्रिल, 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन, 20 मार्च चवदार तळे सत्याग्रहाच्या दिवशी ज्यांना `एकच साहेब बाबासाहेब' या मागील श्रद्धाभाव कळला नाही असे `ब्लॉक सिस्टिम'मध्ये राहणारे विचारवंत `आंबेडकर चळवळीची दशा आणि दिशा', `राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात झालेली समाजाची पीछेहाट' यावर पांडित्यपूर्ण लेख लिहून तळागाळातील समाजाच्या आकलनापलीकडचा विचार देत असतात. इतकी वर्षे वाघाप्रमाणे लढणा-या अमक्याने तमक्याची दाढी कशी कुरवाळली, कुणी कुणासाठी `कवाडे' उघडली, कोण स्वत:ला प्रतिआंबडेकर समजतो, तर कोण आता मोठा साहेब झालाय म्हणून भारी आखडतोय.. असे समज-गैरसमज पसरवण्यापलीकडे आपण ज्याला आपली `माय' मानतो त्या बाबासाहेबांचे विचार किती आत्मसात केले हे जास्त महत्त्वाचे आहे.
 
बाबासाहेबांचा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी कॉलर टाइट कार्यकर्त्यांची रेलचेल दिसते. मात्र अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी डोळस श्रद्धा दिली असतानाही उत्सवाच्या पलिकडे विचार होऊ नये ही मोठी शोकांतिका आहे. त्यांचा तो उत्सव तर आमचा हा उत्सव... कोरोनाने समाजातील अनेक घटकांची वाताहत झाली असताना जयंतीसाठी हजारो रुपयांचा चुराडा करायचा आणि आपला उत्सव  हटके साजरा झाला पाहिजे एवढाच कोत्या दृष्टीकोन आज सर्वत्र दिसत आहे. त्यासाठी गरज आहे विचारांचा जागर करण्याची... `डॉ. बाबासाहेबांची जयंती त्यांच्या हयातीत भायखळा येथे समाजाने साजरी केल्याचा इतिहास आहे. मात्र बाबासाहेबांनी त्याचवेळेस बजावले होते.. माझा जयजयकार करण्यापेक्षा मी दिलेला विचार आणि शिकवणुकीचा जयजयकार करा!'  इतकच नव्हे तर 2 मे 1950च्या दिल्ली येथील बुद्धपौर्णिमेच्या कार्यक्रमात ते म्हणाले, माझ्या वाढदिवसापेक्षा बुद्ध जयंती साजरी करा.   

डॉ.बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या लाखो अनुयायांच्या उपस्थितीत  विज्ञानावर आधारित बौद्ध धम्माचा स्वीकार केला. जो संपूर्णपणे माणसाशी माणसाचं असलेलं माणुसकीचं नातं अधोरेखीत करतो.  हे सर्वसामान्य लोकांना कळावं म्हणून बाबासाहेबांनी `भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाद्वारे सोप्या भाषेत `बुद्ध' सांगितला. हा `अमूल्यरूपातील ग्रंथ अडगळणीत पडल्यामुळे पुन्हा सामाजिक हेवेदावे सुरु झाले आहेत.  बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या `भारतीय बौद्ध महासभा', बौद्धजन पंचायत समिती ही एकाच आईची दोन मुले आजघडीला त्यांच्या धार्मिक परिवर्तनाचा रथ पुढे नेण्याऐवजी आम्ही दोघे कसे वेगवेगळे आहोत, याचे दर्शन गावशीव ते अगदी शहर परिसरात विविध समारंभांतून दाखवताना दिसतात. काल झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीत तर अगदी कहरच झाला. केवळ विरोधात उभे राहिल्याने त्या व्यक्तीच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार झाला. यामुळे आम्ही किती सामाजिक बांधिलकी जपत आहोत हे आता सर्वांनीच पाहिलं. 

बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करताना सांगितलेल्या 22 धम्म प्रतिज्ञा, बाबासाहेबांवरील मौलिक ग्रंथ, त्यांच्या विचारांचा `जागर' गावोगावी खेड्यापाड्यांत जाऊन गरिबी आणि दारिद्रयाने पिचलेल्या वर्गाला बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि विचार सांगण्याची आज पुन्हा आवश्यकता निर्माण झाली आहे. केवळ भिक्खू संघानेच नव्हे, तर `बौद्धाचार्य' म्हणजे बुद्ध धम्माचे ख-या अर्थाने आचरण करणा-यांनी भगवान बुद्धांच्या त्रिसरण, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्गाचा विचार अर्थात धम्माचा विचार तमाम शोषित, पीडित लोकांत रुजवणे गरजेचे आहे. तीच खरी जयंती, तोच खरा उत्सव ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1