Top Post Ad

सेंद्रिय बुद्धिवंत: महात्मा जोतीराव फुले !

स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यात जन्म सार्थक मानतात, परंतु शेतकरी वगैरेंना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे, असा महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा बोध केला. त्यातील काही वचने आपण वाचली की लक्षात येते, की त्यांचा आवाका किती मोठ्ठा होता? त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला. सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. 
सत्यशोधक समाजाचा आवाज ही भारतात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची किंकाळी होय. वेद हे ईश्वरनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत, असे जोतीरावांचे ठाम मत होते. वेदाने समाजात भेद पडले. म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे. पोथीतील जातींच्या उत्पत्तीविषयीची कल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय बाहुतून जन्मले, शूद्र त्याच्या पायातून निघाले हे विधान त्यांना भयंकर आणि धादांत असत्य वाटे. 'मनुस्मृती' ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसविते म्हणून ती अपवित्र आहे, असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला. बुद्धाविषयी जोतिरावांना नितांत आदर वाटे. 

      शेतकऱ्यांचे आसूड हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया त्यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे. त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या बीजमंत्राने बहुजन समाज खडबडून जागा झाला. त्यांचे ते शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे मंत्र- ओळी सर्वांना तोंडपाठ झाल्या आहेत-
    "विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
     नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
     वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।"

     जोतिबा फुलेजींचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी त्यांचा जन्म दि. ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुलेजींचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते. त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. तेच नाव पुढे रूढ झाले. जोतीरावजी केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीमाईंशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स.१८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 

बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय व हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. पुढे महात्मा फुलेजींनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी तद्वतच अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केली. त्यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण- सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढली. तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी- क्रांतिज्योती सावित्रीमाईंवर सोपविली. त्यांच्या सोबतीला ज्ञानज्योती फातिमाबी शेख सावलीसारख्या होत्या. यानंतर जोतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.  
     
 त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतिबांकडून रोज संतश्रेष्ठ कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे त्यांच्या मनावर संत विचारांची शिकवण चांगलीच बिंबली अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक-
     "नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध।  
     तुम कैसे बम्मन हम कैसे क्षूद।।" 
कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे, असे रोखठोकपणे बोलत. मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी गुप्तशक्ती आहे, अशी त्यांची विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे, असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आदी ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल? त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे? हे जोतीराव फुलेंनी आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडले आहे-
    "धर्म राज्य भेद मानवा नसावे।
    सत्यानें वर्तावें। ईशासाठीं।।
    सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतों।
     मनुजा सांगतो। जोती म्हणें।।
(महात्मा फुले समग्र वाङ्मय: सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक: अखंड- पृ.क्र.५५९.)

     बहुजन समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. वेदांना झुगारून जोतिबांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरूवात केली. तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीमाई फुले यांनी केले. त्यांच्याबरोबर १९ स्त्रिया सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी त्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. त्यानंतर मुख्याध्यापिकाही झाल्या. छ.शाहू महाराजांनी या सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला होता. न्याय, अत्याचार व गुलामगिरी यांपासून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. या समाजाने पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. तेही स्वरचित मंगळाष्टके उच्चारून-
      "देवाचे नियमां प्रमाण धरुनी, चालें तुझें कूळ गे।।
    सत्यानें अवघ्यांत श्रेष्ठ असशी, तैसेच हे त्वत्सगे।।
    अज्ञान्या समदृष्टिनें शिकविशी, तूं ज्ञान त्या दाविशी।।
    प्रीतीनें वरितों तुला अजि तुझी, ऐकून कीर्ति अशी।।
    .... शुभमंगल सावधान।।१।।"
(महात्मा फुले समग्र वाङ्मय: सत्यशोधक समाजोक्त पूजा-विधी: मंगळाष्टक- वर: पृ.क्र.४३४.)

     जोतिबा फुलेजींना मुंबईच्या जनतेनेच महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ साली मिळाली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. दि.२४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनीं एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले. तर- 
       "सर्वसाक्षी जगत्पती। 
        त्याला नकोच मध्यस्ती॥"
 हे या समाजाचे घोषवाक्य होते. 

       सर्वसामान्यांचे कैवारी शिक्षणसम्राट महात्मा जोतीरावजी फुले हे दि.२८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे निर्मिकांकी कायमचे विसावले. आज सर्वत्र त्यांचा पावन स्मृतिदिन 'खरा शिक्षकदिन' मानून बहुजन समाजातर्फे गावोगावी आठवडाभर विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. तो आता शासन दरबारीही लागू होण्याची प्रतिक्षा आहे, हे येथे उल्लेखनीयच!
!! पावन जयंतीनिमित्त त्यांच्या चरणकमली या लेकरांचे कोटी कोटी विनम्र अभिवादन !!

 सत्यशोधक- कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे.       ७४१४९८३३३९.
 मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी. ता. आरमोरी, जि. गडचिरोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com