जगेल तर रिपब्लिकन म्हणून अन् ....

मित्रांनो,

       मी विवेक मोरे. वय वर्षे ५४. शहिद भाई संगारेंच्या चार चाळीत माझा जन्म झाला. आमची ही चार चाळ सातरस्त्याला आहे. म्हणजे महालक्ष्मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो की, पूर्व दिशेला चालत रहायचं. प्रथम धोबीघाट लागतो आणि त्यानंतर सातरस्ता लागतो. या विभागाला सातरस्ता म्हणण्याचं कारण म्हणजे इथे एक सर्कल आहे आणि या सर्कलला सात रस्ते आहेत. म्हणून या सर्कलला सातरस्ता म्हणतात. फार पूर्वी या सर्कलला जेकब सर्कल  म्हणत असत. आता या सर्कलला संत गाडगे महाराजांचं नाव दिलं गेलं आहे. खरं तर या सर्कलला आठवा रस्ता सुध्दा आहे. पण हा रस्ता कुठेच जात नाही. या आठव्या रस्त्यावर नामदेव ढसाळ रहायचे. ढसाळ रहायचे ते घर वास्तविक शाहिर अमर शेख यांचं. ढसाळांचा अमरशेखांच्या मुलीशी म्हणजेच मल्लिकाशी प्रेमविवाह झाला आणि ढसाळ ढोर चाळीतून या घरात आले.

       ढसाळांची एक आठवण माझ्या नेहमीच स्मरणात राहिली आहे. ढसाळांचे वडिल वारले. वडिलांची शोकसभा ढसाळांनी शिरीन टाँकिजच्या शेजारील म्युनिसिपल शाळेत ठेवली होती. मोठमोठी मातब्बर मंडळी या शोकसभेला आली होती. शोकसभेनंतर हमखास भोजनदानाचा कार्यक्रम असतो. हे भोजन म्हणजे डाळ, भात, पुरी, भाजी, असे शुध्द शाकाहारी स्वरुपाचे असते. ढसाळांनी मात्र या प्रसंगी दोन प्रकारचे जेवण ठेवले होते. त्यातला पहिला प्रकार हा नेहमी सारखा शाकाहारी होता. मात्र दुसरा प्रकार होता मांसाहारी. म्हणजे चक्क मटण बिर्याणी, आणि  मटण सुध्दा मोठ्याचे. मुर्तिमंत विद्रोह म्हणजे काय असतं, हे मला त्या वेळी कळलं.

        भाई संगारे व ढसाळ हे तसे सख्खे शैजारी, म्हणजे सातरस्त्याचे. आमच्या चार चाळीसमोरील रस्त्याचे व ढसाळांच्या घरासमोरील रस्त्याचे नावही एकच, व ते म्हणजे, 'केशवराव खाड्ये मार्ग' हे होय. याच मार्गावर गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर व सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत खोतही रहायचे. ढसाळ दररोज भाईंना भेटायला आमच्या चार चाळीत यायचे. त्याचवेळी पोरसवदा असलेले वडाळ्याचे मनोजभाई संसारे, कुलाब्याचे झापडेकर, शिवडीचा गोपी मोरे, यासारखे असंख्य कार्यकर्ते भाईंकडे यायचे. चाळ क्रमांक २ व ३ मधलं बौद्ध विकास संघाचे कार्यालय हेच भाईंचं कार्यालय असायचं. सहा डिसेंबरच्या आधीपासुनच बाहेरून येणाऱ्या लोकांना झुणका भाकर खाऊ घालण्यासाठी भाईंच्या देखरेखीखाली संपूर्ण चार चाळ कामाला लागायची. सहा व सात डिसेंबरला बाहेरगावची लोकं दर्शन करुन आली की हक्काने आमच्या चार चाळीत यायची. भोजनाचा आस्वाद घेऊन तिथेच विश्राम करायची.

       भाईंकडे पाहत, पाहत आम्ही मोठे झालो. भाईंना माझ्या कविता खुप आवडायच्या. भाई म्हणायचे की, नामदेवच्या कविता समजायला खूप जड जातात. पण विवेकच्या कविता मात्र तुकारामासारख्या साध्या सोप्या, अगदी अडाण्यातल्या अडाण्यालाही सहज कळतील अशा आहेत. मी जिथे शक्य असेल तिथे भाईंची भाषणे ऐकायला जायचो. आणि मग भाईसुध्दा मला त्यावेळी तिथे एकतरी कविता म्हणायला लावायचे. एकदा बौद्ध विकास संघाच्या कार्यालयात भाई बसलेले असताना उपस्थित चाळकऱ्यांना भाई म्हणाले की, आपल्या चार चाळीत तसे कव्वाल बरेच आहेत पण कवी मात्र एकच आहे, व तो म्हणजे विवेक. भाईंचे हे बोल ऐकून खुपच धन्य वाटले होते. भाईंना माझ्या बऱ्याच कविता माहीत होत्या. त्यातल्या त्यात माझी जयंतीची कविता त्यांना खुपच आवडायची. भाई बहुतेकदा मला जयंतीच्या कवितेचीच फर्माईश करायचे. कारण ही कविता आमच्या चार चाळीच्या जयंतीचीच होती. दरवर्षी जयंतीसाठी होणारी रहिवाशी मंडळाची मिटिंग, त्यात होणारी वादावादी, पदाधिकाऱ्यांची निवडणूक, वर्गणी वसुलीची स्टाईल, ते अगदी दि एन्ड पर्यंतची सगळी वर्णने मी या कवितेत अगदी जशीच्या तशी चितारली होती. या कवितेतला वेडा गंग्यासुध्दा आमच्या चाळीतलं जीवंत पात्र होतं. ही कविता भाईंना आवडणे, हे मला खूप विशेष वाटायचं. भाईंच्या जागी जर संकुचित मनाचा जर कोणी दुसरा असता तर आपल्या चाळीवर व्यंग करणऱ्या या कवितेचा त्याने नक्कीच निषेध केला असता. पण टिकासुध्दा हसत, हसत स्विकारण्याचा दिलदारपणा भाईंकडे होता.

       भाईंच्या दिलदारपणाचा आणखी एक किस्सा सांगावासा वाटतो. आमचे वडील हे भाईंचे कट्टर विरोधक. कारण आमचे वडील बी.सी.कांबळेंचे कार्यकर्ते. त्यांचा पँथरला टोकाचा विरोध. मात्र भाईंची आई व माझ्या वडिलांची आई म्हणजेच माझी आजी, या दोघी सख्ख्या मैत्रीणी. आपली मुले एकमेकांची विरोधक आहेत, याची या दोघींना फिकीरच नसे. सार्वजनिक नळावर उभ्या राहून या दोघी तासंतास गप्पा मारत बसायच्या. माझी आजी वारली तेंव्हा तिच्या शोकसभेला भाई न बोलावता आले. या शोकसभेत माझ्या आजीविषयी भाईंनी जे भाषण केले ते इतके अप्रतिम भावपूर्ण होते की त्या भाषणाने सगळा श्रोतु वर्ग हेलावून गेला होता. भाईंचं हे भाषण म्हणजे वक्त्तृृृत्व कलेचा एक सर्वश्रेष्ठ नमुना होता.

        खरं पहायला गेले तर भाई काय, भाईंची आई काय, किंवा आमचे वडील काय किंवा आमची आजी काय! ही माणसच निराळी म्हणावी लागतील. सथ्या अशा माणसांचा इतका तुटवडा झाला आहे की, अशी माणसे आता दिवा घेऊन शोधावी लागतात. आपली मुले एकमेकांची विरोधक आहेत म्हणून भाईंच्या आईने व आमच्या आजीने आपली मैत्री कधीच तोडली नाही. तसेच आपल्या विरोधकाकडे आपला मुलगा कसा जातो?, हा प्रश्न आमच्या वडिलांना कधी पडला नाही किंवा विवेक हा आपल्या विरोधकाचा मुलगा आहे म्हणून भाईसुध्दा माझ्याशी कधी अंतर राखून वागले नाही. उलट मी जेंव्हा, जेंव्हा भाईंबरोबर असायचो तेंव्हा भाईंचा आश्वासक हात नेहमीच माझ्या खांद्यावर असायचा. आपले वैचारिक वाद आणि आपले मानवी हितसंबंध यांची सरमिसळ त्यांनी कधीच होऊ दिली नाही. धन्य तो काळ आणि धन्य ती माणसे.

          मी आरपीआयच्या सगळ्याच नेत्यांवर टीका करणारी 'दो रुपया' नावाची कविता लिहली त्यावेळी अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. या कवितेमुळे अनेकदा माझ्यावर हल्लेसुध्दा झाले. पण या सगळ्या प्रसंगात माझ्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहून भाईंनी माझ्या या कवितेचे ठामपणे समर्थन केले. कारण या कवितेमागचा खरा उद्देश, या सर्व नेत्यांनी एकत्र यावं, हाच होता. भाईसुध्दा याच उद्देशाने अखेरच्या श्वासापर्यंत झगडत राहिले.

        ज्या दिवशी भाईंचं प्रेत चार चाळीत आणलं त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला जनसमुह चार चाळीत जमला होता. बर्फाच्या लादीवर झोपलेल्या भाईंना मी पाहिले. पण मी अनुभवलेले सडपातळ, हसतमुख भाई मला तिथे दिसलेच नाही. बर्फामुळे त्यांचा संपूर्ण चेहरा सुजला होता. संपूर्ण शरीर जाडजुड झालं होतं. मग भाईंची प्रेतयात्रा सुरू झाली. ६ डिसेंबरला जशी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी रांग लागते अगदी त्याच मार्गाने म्हणजे सातरस्ता ते वरळी, वरळी ते प्रभादेवी आणि प्रभादेवी ते चैत्यभूमी अशी प्रेतयात्रा सुरू झाली. प्रेतयात्रेला एवढी प्रचंड गर्दी मी कधीच पाहिली नव्हती. प्रेतयात्रेला जमलेली ही गर्दी म्हणजे नुसती गर्दी नव्हती. तर भाईंच्या संशयास्पद मरणाने प्रचंड संतापलेली ती गर्दी होती. ही गर्दी सिध्दिविनायक मंदिराजवळ आल्यावर या गर्दीतून एक संतप्त दगड सिध्दीविनायक मंदिरावर भिरकावला गेला. त्यानंतर दगडामागून दगड त्या मंदिरावर आदळले. मंदिराच्या काचांचा चक्काचूर झाला. गर्दीच्या संतापाचा उद्रेक सिध्दीविनायक मंदिरावर रिता होऊ लागला. ही दगडफेक जणू काही सांगत होती की, या गणपतीनेच आमच्या भाईंचा बळी घेतलाय. अँग्री यंग म्हणून नावाजलेला अमिताभ बच्चनही निमुटपणे नागड्या पायाने ज्या सिध्दिविनायकाच्या गणपतीच्या दर्शनासाठी येतो, त्या गणपतीवर पत्थर फेकण्याचं धाडस या गर्दीला भाईंनीच दिलं होतं. या प्रसंगानंतर  या मंदिरासमोर संरक्षक भिंत बांधण्यात आली. आज सुध्दा बसमधून जाताना जेंव्हा मी ही भिंत पाहतो त्या,त्या वेळी मला त्या भिंतीमध्ये भाईंच्या दराऱ्याची आठवण येते. ती भिंत म्हणजे माझ्यासाठी भाईंचं जीतजागतं स्मारकच बनलं आहे.                           

        भाई गेले पण भाईंनी दिलेला निडरपणा, बिनधास्तपणा आम्ही आमच्या काळजात सामावून घेतलाय. अडवाणींची रथयात्रा रोखण्याचं धाडस भाई आम्हाला देऊन गेलेत. जन्मभूमीच्या जागी गरीबांसाठी मोफत रुग्णालय किंंवा सुुुलभ शौचालय बांथा असे म्हणण्याची धमक भाईंनीच आम्हाला देवू केलेय. मग आम्हीसुध्दा भाईंचा हा वारसा घेऊन आंबेडकरी चळवळीत वावरू लागलो. डोक्याला कफन बांधून बिनधास्त कविता म्हणू लागलो. उठाव साहित्य मंचाची स्थापना करून नव्या, जुन्या  आंबेडकरी कवींना सोबत घेऊन कवितेद्वारे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेचे प्रबोधन केले आणि करतो आहोत. टंपूस नेत्यांमुळे मुर्दाड झालेल्या आंबेडकरी चळवळीच्या छातीत विद्रोहाचे निखारे पेरीत आम्ही ही चळवळ जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आजही घरावर तुळशीपत्र ठेवून, पायाला भिंगरी बांधून आणि भाईंला काळजात घेऊन आम्ही वस्त्या, वस्त्या पालथ्या घालतोच आहोत.

       सध्या तरुणांमध्ये पँथरविषयीच्या प्रेमाला फारच भरते आल्याचे दिसून येते. पण या सर्व तरुणांनी इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे जो, जो पँथर होता तो शेवटपर्यंत पँथर राहिलाच नाही. थोडीशी समज येताच प्रत्येक पँथर हा 'रिपब्लिकन' झाला आहे. मग ते ढाले असो, ज.वि.असो, डांगळे असो, महातेकर असो किंवा आठवले असो. आंबेडकरी चळवळीचे मूळ 'रिपब्लिकन' आहे. जो स्वतःला आंबेडकरवादी समजतो त्याला रिपब्लिकन बनल्याशिवाय गत्यंतर नाही. भाई जरी सुरवातीला पँथर म्हणून उभे राहिले तरी शेवटी ते 'रिपब्लिकन' म्हणून जगले आणि 'रिपब्लिकन' म्हणूनच शहीद झाले. भाईंच्या सानिध्यात राहून आम्हालाही 'रिपब्लिकन' शब्दाची ताकद समजली. 

आज भाईंच्या पश्चात त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या काही दोन, तीन पक्ष, संघटना काढल्या आहेत त्या़च्या नावातही 'रिपब्लिकन' हा शब्द ठसठशीतपणे दिसून येतो. भाई आम्हाला सांगायचे की, 'रिपब्लिकन' ही बाबासाहेबांनी आपल्यालाच नव्हे तर समस्त भारतीयांना दिलेली खरी ओळख आहे. 'रिपब्लिकन' हे बाबासाहेबांच्या जातीअंताच्या चळवळीतलं एक प्रभावी हत्यार आहे. या जातीपाती जर उध्वस्त करावयाच्या असतील तर जातीपातीचं बहुजनवादी राजकारण झिडकारून बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले रिपब्लिक भारताचं रिपब्लिकन राजकारण स्विकारलंच पाहिजे. 'सर्वप्रथम मी भारतीय आहे आणि अंतिमत:ही भारतीय आहे.' या बाबासाहेबांच्या वाक्याचा उद्घोष आपण आपल्या छातीत सामावून घेतला पाहिजे.

      मी भाईंच्या निमित्ताने वारंवार 'रिपब्लिकन', 'रिपब्लिकन', म्हटल्याने कुणाला मी 'वंचित आघाडीच्या विरोधात बोलतो आहे, असे वाटण्याची शक्यता आहे. पण मला वंचितच्याच नव्हे तर कुणाच्याच म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, बिजेपीच्याही विरोधात बोलायची आवश्यकता नाही. प्रत्येक जण आप आपल्या विचाराने चालले आहेत. मी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन विचाराने चालू इच्छितो आहे. त्यामुळे इथे कुणी कुणाच्या विरोधात जायची काहीही गरज नाही. ज्याने, त्याने आपआपले काम चोख करावे, बस्स.

      पण गेल्या सहा, सात महिन्यापासून मी पाहतो  आहे की, काल, परवा पर्यंत जे स्वतः ला रिपब्लिकन म्हणवून घेत होते ते सगळेच अस्वस्थ झालेत, मुके झालेत, धास्तावल्यागत झालेत. जो, जे वांछिल तो,ते राहो म्हणत सगळेच स्साले पसायदान म्हणू लागलेत. पण मला असं मुकं राहणं शक्य नाही. चार, दोन रिपब्लिकन मिंधे झाले, बेईमान झाले, पथभ्रष्ट झाले म्हणून बाबासाहेबांची 'रिपब्लिकन' संकल्पना हद्दपार करा, असे जर कोणी म्हणत असेल तर ते मी अजिबात मान्य करणार नाही. माझ्यातला भाई मला गप्प बसू देत नाही. भाई म्हणतात मला की, 'विवेक, चार - दोन रिपब्लिकन पथभ्रष्ट झाले तरी तू पथभ्रष्ट होऊ नकोस. कुणाला काही वेगळे करायचे ते त्यांना खुशाल करू दे पण तू तुझ्यातला 'रिपब्लिकन' मरु देऊ नकोस. कोणी तुझ्या सोबत येवो अथवा न येवो, तू तुझ्या 'रिपब्लिकन' पथावर दटून उभा रहा. आपल्याला जातीपातीचं बहुजनी राजकारण करायचं नाही. आपला रस्ता सर्वस्वी वेगळा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला जातीपातीचा अंत करून रिपब्लिक भारत घडविण्यास सांगितले आहे. आणि म्हणुनच वाट्टेल ते झालं तरी तू या 'रिपब्लिकन' पथावरुन भटकू नकोस.' आणि म्हणुनच मला असं ठामपणे वाटतं की, बाबासाहेबांनी सांगितलेला हा 'रिपब्लिकन' मार्ग प्रशस्त करण्यासाठी जो, जो स्वतः ला रिपब्लिकन समजतो त्यांनी आता एकत्र आलं पाहिजे.

       आज जर भाई असते तर त्यांनी नेमकं हेच केलं असतं. वेड्यासारखे भाई वारा होऊन रिपब्लिकन ऐक्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले असते. आज जो, जो रिपब्लिकन आहे त्यांनी हेच केले पाहिजे. मग भले एखाद्याचा वेगळा गट असेल, वेगळे दुकान असेल, ते सगळं मोडून या साऱ्या रिपब्लिकन्सनी एक रिपब्लिकन म्हणून एकत्र आलं पाहिजे. मग भले कोणी आपल्याला गद्दार म्हणेल. हरकत नाही. कोणी आपल्याला बेईमान म्हणेल, हरकत नाही. कोणी आपल्याला घराण्याचा दुश्मन समजेेल, पर्वा नााही. बाबासाहेबांचा 'रिपब्लिकन' होणं ही जर गद्दारी असेल तर ती गद्दारी आता आपण केलीच पाहिजे. कदाचित आपली कोणीच दखल घेणार नाही. कदाचित आपण निवडूनही येणार नाही. पण रिपब्लिक भारत घडविण्यासाठी आपण रिपब्लिकन म्हणून  जातियवादी, धर्मवादी शक्तींच्या विरोधात लढणं महत्वाचे आहे. कदाचित आज आपण जिंकणार नाही पण एक ना एक दिवस आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडताना बाबासाहेब म्हणाले होते की,' मी या पक्षाचं रोपटं खडकावर लावलं आहे. उशिरा का होईना पण या रोपट्याला निश्चित फळे लागणार आहेत. ज्यांना फारच घाई आहे त्यांनी खुशाल दुसरीकडे जावं. पण जे थांबून या रोपट्याची निगा राखतील, ते निश्चितच या झाडाची फळे चाखतील.'

      आज बाबासाहेबाचं हे 'रिपब्लिकन' रोपटं सुकू लागलय. कारण आजकाल या रोपट्याची निगा राखणाऱ्यांची संख्या रोडावत चाललेय. जे काही थोडे फार या रोपट्याचे समर्थक आहेत, ते सुध्दा या रोपट्याची निगा राखण्यात चालढकल करू लागलेत. याला मी सुध्दा अपवाद नाही. काल परवा माझ्यासमोर एक जयभिमवाला रिपब्लिकनविषयी नाही, नाही ते वाईट, साईट बोलून गेला. आणि आश्चर्य हे की मला त्याचे काहीही वाटले नाही. खरच, बाबासाहेबांचा 'रिपब्लिकन' शब्द इतका निंदाजनक झाला आहे काय? की या शब्दाविषयीच्या आमच्या संवेदनाच मरून गेल्यात. यापैकी एक तरी गोष्ट निश्चितच खरी असावी.

       आता मी हे सगळं लिहण्यामागचं प्रयोजन सांगतो. प्रयोजन सांगणे मी यासाठी आवश्यक समजतो, कारण हे सगळं वाचत असताना अनेक शंकासूरांच्या मनात अनेक शंका निर्माण होऊन प्रश्नांच्या जंत्री तयार झाल्या असतील. उदाहरणार्थ, मी हा लेख का लिहला? आत्ताच का लिहला? या लेखामागचा उद्देश काय? वगैरे, वगैरे. या प्रश्नांची उत्तरे द्यायची झाल्यास ती अशी असतील, हा लेख मला वाटला म्हणून लिहला. आत्ताच सुचला म्हणून आत्ता लिहला. या लेखामागचा उद्देश रिपब्लिकन पक्ष संघटित व्हावा, हा होय.

       पण या शंकासुरांना वगळून जे ही पोस्ट निरपेक्ष बुध्दीने वाचत असतील, त्यांच्यासाठी मी या पोस्टमागची जन्मकहाणी सांगू इच्छितो. काल वरळीला जाण्यासाठी प्लाझावरुन बस पकडली. कधी नव्हे ते विंडो सिट मिळाली. बस पोर्तुगीज चर्च मागे टाकून प्रभादेवीच्या दिशेने निघाली आणि ट्राफिकमुळे नेमकी सिध्दिविनायक मंदिरासमोर थांबली. मी खिडकीतून डोकाऊन पाहिले. मंदिरासमोरची ती संरक्षक भिंत पाहताच भाईंची तिव्रतेने आठवण झाली. आणि भाई चक्क त्या भिंतीतून बाहेर आले. त्यानंतर ते माझ्या बसमध्ये चढून माझ्याच सिटवर येऊन बसले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी मला विचारले की,'रिपब्लिकनचे काय झाले?' हा एकच प्रश्न विचारून भाई अंतर्धान पावले. कदाचित हा मला झालेला भास असावा. बसमधून वरळीला उतरलो. घरी आलो आणि अस्वस्थ मनाने जे काही खरडले, ते म्हणजे ही पोस्ट. पण आता मात्र मी ठरवलय की, फक्त आता पोस्ट लिहून थांबायचं नाही. रिपब्लिकन पक्षाचं रोपटं जर वाढवायचं असेल तर प्रत्यक्ष मैदानात उतरून संघटनात्मक बांधणी करायला हवी. एक, एक रिपब्लिकन्सना जोडून घ्यावे लागेल. मला माहित नाही याला किती वेळ लागेल. पण आता या एकाच गोष्टीसाठी आयुष्य वेचायचं ठरवलय. आता जगेल तर रिपब्लिकन म्हणून आणि मरेल तर रिपब्लिकन म्हणूनच!

- विवेक  मोरे   मो. ८४५१९३२४१०

( आज भाईंचा तेविसावा स्मृतीदिन आहे. त्याप्रित्यर्थ हा लेख. भाईंच्या स्मृतीस विनम्रपूर्वक अर्पण करतो.) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA