Top Post Ad

लढले असते तर हरले असते का ?

         चार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपने पुन्हा झेंडा रोवला आहे. तर बहुजन, वंचित, पीडित जनतेचा एकेकाळी राजकीय सत्ता भोगणारा एकमेव राष्ट्रीय पक्ष नेस्तनाबुत झाला आहे. नेस्तनाबुत होण्यामागे असे काय कारण असेल की अंग मेहनत करूनही विजयाचा टप्पा गाठणे आंबेडकरी पक्षांसाठी अशक्य झाले आहे? त्यासाठी हिंदीच्या काही ओळी आठवतात ज्या आंबेडकरी पक्षाच्या वर्तमान स्थितीस लागू पडतात. 'कोई भी दुःख मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नही.' खरंच लढले असते तर हरले असते का? हे पक्ष लढले नाहीत म्हणून हरले आहेत. ते कसे?

निकाल लागल्यानंतर अनेक जण EVM ला दोष देत बसणार आहेत. मात्र, खरंच यामागे EVM घोळ आहे की आपले पक्ष वारंवार काही चुका करत आहेत. या बाजुने विचार करण्याची आणि तुलना करण्याची आता वेळ आहे. उत्तर प्रदेशातीलच आंबेडकरी पक्ष नाही तर देशभऱ्यातील आंबेडकरी पक्षांजवळ या महत्वाच्या गोष्टीच नाहीत.

1. सेंकड लाईन लिडरशिप - आंबेडकरी पक्षांमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा सोडले तर असे नेतेच नाही ज्यांच्यावर पक्षाची कमी अधिक धुरा राहू शकते. उलट भाजप जवळ अनेक मोठे नेते आहेत ज्यांना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. हे नेते त्यांनी स्वतः तयार केले आहेत. आपल्या पक्षातील पक्ष प्रमुखाशिवाय इतर कोणत्याही नेत्याला दुसऱ्या जातीत सोडा स्वतःच्या जातीत सुद्धा ओळख नाही.

 2. पक्ष प्रमुखच सर्व भूमिका पार पाडतो - सेंकड लाईन लिडरशिप नसल्यामुळे प्रवक्ता, प्रचारक आणि पक्षातील सर्व निर्णय पक्ष प्रमुखच घेतो. या प्रमुखांमध्ये आपली जागा, दबदबा जाईल ही भिती असल्यामुळे ते दुसऱ्यांना समोर येऊ देत नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी ऐरा-गैरा-नत्थु-खैरा उमेदवार रिंगणात उतरवण्याची वेळ येते. ज्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते तर नाराज होतातच. पण उमेदवाराचा जनतेशी संपर्कच नसतो. 

3. पक्षाजवळ कॅडर नाहीत - आंबेडकरी पक्षांनी कॅडर बनवणे सोडून दिले आहे. जे काही लोकं पक्षांसोबत आहेत ते काही ना काही हेतु घेऊन पक्षासोबत आहेत. त्यामुळे हेतु साध्य होताना दिसला नाही की ते काँग्रेस-भाजप सारख्या पक्षांमध्ये जातात. कॅडर नसल्यामुळे बेसिक व्होट बँकच आंबेडकरी पक्षांजवळ नाही.

4. लढण्यासाठी मुद्देच नाहीत - निवडणूक लढण्यासाठी केवळ आपल्या समाजावर अवलंबून राहाता येत नाही. इतर समाजाला सोबत घेण्यासाठी त्यांचे मुद्दे सुद्धा हाताळणे तेवढेच गरजेचे आहे. शिक्षण, गरीबी उन्मुलन, रोजगार, मुलभूत सुविधा ही मुद्दे दुसऱ्या पक्षातून आपले पक्ष आयात करतात. मात्र, स्वतःचे ठोस असे मुद्देच नाहीत ज्याचा वापर लोकांमध्ये चेतना भरून जनमत मिळवण्यासाठी करता येईल. 

5. ग्राऊंड रिसर्च नाही - आंबेडकरी पक्ष ग्राऊंड रिसर्चवर विश्वास करत नाहीत. जमीनीवर काय सुरू आहे? कोणत्या पक्षाकडे लोकांचा कल आहे? लोकांच्या गरजा काय? भाषणात काय बोलावे? कोणत्या जागेवर आपण कमी पडतोय? असे असंख्य रिसर्च करण्याच्या भानगडीत आपले पक्ष पडतच नाहीत. 

6.कमर्शियल वर्तमानपत्र, न्यूज चॅनल्स नाहीत - आंबेडकरी पक्षाजवळ किंवा कोणत्याच नेत्याने संधी मिळूनही मीडिया एजेन्सी किंवा सेटेलाईट चॅनल उभारला नाही. ज्यांनी ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केले ते फक्त बौद्ध लोकांपर्यंत पोहोचतील अशाच चॅनल्सची व्यवस्था त्यांनी केली. हे वर्तुळ सोडून समाजाच्या बाहेर आपले मतं कशी मांडता येतील ही व्यवस्था कोणत्याही पक्षाने केलेली नाही. कम्युनिकेशनचे साधन नसल्यामुळे आंबेडकरी पक्षांची तळमळ नी मेहनत फक्त आपल्याच लोकांमध्ये सिमीत आहे. 

7. पक्षाचे नियोजन करण्याची यंत्रणा नाही - पक्षाच्या लहानात लहान गोष्टींचे नियोजन करण्याची यंत्रणा कोणत्याच पक्षाने आतापर्यंत उभारलेली नाही. आता मागील काही वर्षापासून ग्राफिक्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर थोडे थोडके पोस्ट दिसतात. मात्र, जनतेपर्यंत थेट कोणता मुद्दा पोहोचवावा याबद्दल रिसर्च करण्याची टीमच नसल्यामुळे बेकामी कंटेट प्रसारीत केला जातो. ज्याचा काहीच उपयोग नाही.

8. लेखक/ रिसर्चर्स नाहीत - कोणत्याच आंबेडकरी पक्षाने लेखक, रिसर्चर्स तयार केले नाही. जे पक्षासाठी लिखान व रिसर्च करतील. पक्षांनी मुद्दाम या लोकांना जागाच दिलेली नाही. जन संवादासाठी लागणारा कंटेट कोणत्याच पक्षाजवळ नाही. मुद्दा प्रसारीत केल्यानंतर त्याचा फिडबॅक मिळण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे कोणता अँगल घेऊन जनमत मिळवायचे हेच पक्षांना माहिती नाही. 

9. पक्षात येऊन काय करायचे? कार्यकर्त्यांना माहितच नाही - पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेमके करायचे काय? याची स्पष्टताच पक्षांकडे नाही. आंदोलनं करायचे, सुविधा उपलब्ध करून द्यायचा, समाजसेवा करायची की पक्ष बांधणी करायची. या पैकी कोणतेच प्रशिक्षण कार्यकर्त्यांना नाही. सभांमध्ये केवळ इतिहास सांगण्याचीच व्यवस्था आहे. इतर बाबींचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे पक्षात आहोत की नाही हेच कार्यकर्त्यांना माहित नाही.

10. महिला/ तरुणांपर्यंत पोहोच नाही - निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाचे फॅक्टर्स म्हणजे महिला आणि तरुण. त्यांच्या पर्यंत पोहोचण्याची कोणतीच यंत्रणा पक्षानी उभारलेली नाही. कारण त्यांच्याजवळ या लोकांसाठी कार्यक्रमच नाहीत. त्यांना मुख्यत्वे हवे तरी काय? याची तसदी त्यांनी घेतलेली नाही. या घटकांसोबत नेत्यांचा संपर्क फक्त निवडणुकांच्या वेळीच येतो. इतर वेळी वाढदिवस साजरे करण्यासारखे प्रपंचच केले जातात. 

11. प्रोफेशनल लोकांना प्रत्साहित केले नाही - समाजामध्ये अनेक लोकं आहेत जे जनसंवाद, क्रिएटीव्ह, टेक्निकली साऊंड, रिसर्चर्स, अॅनालिस्ट आहेत. पण त्याच्याकडे या पक्षांचे अद्यापही लक्ष गेलेले नाही. यांना मोटिव्हेट करून पक्षाच्या कामात आणण्यासाठी पक्ष काहीच करत नाही. यामुळे यांचा टॅलेन्ट वाया चालला आहे. तसेच व्यावसायिक आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये धुरंदर असणाऱ्या लोकांची पक्षांमध्ये कमतरता आहे.

12. बाजार समितीसारख्या निवडणुकांकडे कानाडोळा - बाजार समितीच्या निवडणुकांकडे या पक्षांचे कवडिचे लक्ष नसते. केवळ जिल्हा परिषदा ते लोकसभा या निवडणुकांव्यतिरिक्त या जागी हात आजमावण्याचा प्रयत्न कोणताच पक्ष करताना दिसत नाही. त्यामुळे बेसिक लेव्हलवर पक्षाची सुरुवात अशा निवडणुकांपासून करावी, याचा विचार सुद्धा पक्ष करत नाही.

13. मॅनपावर मॅनेजमेंट नाही -  मॅनपावर मॅनेज करण्याची यंत्रणा पक्षांजवळ नाही. कोणते काम कोण करणार? प्रवक्ता कोण असेल? सभा लावणारा कोण असेल? मतदारांशी सरळ कॉन्टॅक्ट करणारा कोण असेल? याचे काहीच नियोजन पक्षांजवळ नाही. 

14. जिंकण्याची भूक नाही - आंबेडकरी कोणत्याच पक्षामध्ये जिंकण्याची भूक दिसून येत नाही. निवडणूक होताच भाजप-काँग्रेस समिक्षा बैठका करणार आहेत. भाजप त्या पुढे जाऊन जॉईन भाजप कॅम्पेन चालवणार आहे. कारण त्यांना जिंकायचे आहे म्हणून. मात्र, ज्यांचा पेशाच राजकारण आहे असे आंबेडकरी पक्षातील लोकं राजकारण पार्टटाईम जॉब म्हणून करत आहेत. फक्त लढायचे म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे पुढचे अधिक काही वर्ष जो पर्यंत हा संपुर्ण सेटअप आंबेडकरी पक्ष करत नाहीत, तो पर्यंत आंबेडकरी पक्ष सत्तेपासून दुरच राहणार आहे.

-अतुल खोब्रागडे ,नागपूर 

"खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीनेच"


     " आपल्याला मिळालेल्या राजकीय सुधारणा जरी अपुऱ्या  असल्या तरी त्या राबवून घेऊन झिडकारून  न देता त्यांच्याच जोरावर आणखी आपल्याला पुष्कळ प्राप्त करून घेता येईल. या मिळालेल्या राजकीय सुधारणांनानवे आपल्याला पुष्कळ अशा गोष्टी करून घेता येतील. कोणतीही गोष्ट कायदा झाल्याशिवाय घडवून येत नाही. म्हणून त्याच्याकरिता कायदाच झाला पाहिजे. निदान अस्पृश्य समाजाचे भवितव्य मुख्यतः कायद्यावर अवलंबून राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला या राजकीय सुधारणा स्वीकारणे आवश्यकच आहे.
             आपली सामाजिक सुधारणा कायदे करून होणार नाही. परंतु आपली आर्थिक, शैक्षणिक व औद्योगिक उन्नती कायद्याने करून घेता येईल. त्यांच्यावरच तुम्हाला अवलंबून राहिले पाहिजे. आपल्या उन्नतीचे कायदे कसे घडून येतील हे आपण कायदेमंडळात ज्या लायकीचे सभासद निवडून देणार आहोत त्यांच्यावर अवलंबून राहणार आहे. आपण जे प्रतिनिधी निवडून देऊ ते आपल्या समाजहिताला जागणारे आहेत किंवा नाहीत, हे पाहिले पाहिजे. जे आपल्या समाजहिताच्या दृष्टीने कायदे म्हणून कायदे घडवून आणतील अशाच लोकांना तुम्ही निवडून द्या."!!!
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 
 ( संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-१,पान नं. ५३४.)
 दि.१ जून १९३६  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय परिषदेपुढे भाषण.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com