‘‘ शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ’’ असे डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी म्हंटले आहे. पण आज समाजाची अवस्था पाहता मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. माणसातला स्वाभिमान, स्वत्व, विवेक जागा करण्याचे सामर्थ्य नक्कीच शिक्षणात आहे. पण तरीही आज शिकलेला-सवरलेला वर्ग अकलेची दिवाळखोरी असल्यासारखा वागत असेल तर शिक्षणाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. शिकलेली माणसंसुद्धा वेडपटासारखी, मुर्खासारखी वागत असतील, मेंदू नावाचा अवयव वापरत नसतील तर काय करणार ? डोळ्यावरची रूढी परंपरांची झापडं काढून त्याच्याकडे डोळसपणे पाहत नसतील तर या आंधळ्यांना काय म्हणायचे ? निसर्गाने ज्यांना दृष्टी दिली ते सुद्धा ठार आंधळ्यासारखे वागतात याचे आश्चर्य वाटते. परवा पदवीधर असणारा एक तरूण शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली आणि तुकाराम महाराजांना विमानाने सदेह वैकुंठाला नेले असे सांगून तावातावाने भांडत होता. तो इतक्या ठामपणे या गोष्टी सांगत होता की जणू काही भवानीने याला साक्षी ठेवूनच शिवाजी महाराजांना तलवार दिली असावी आणि तुकाराम महाराजांना विमानातून नेताना हा बसवायला गेला होता.
स्वत: पदवीधर असणारा आणि तेही विज्ञानाच्या शाखेतून असा तरूण जर या बोगस कथा सांगत असेल तर काय कप्पाळ बडवून घ्यावे का ? विज्ञान शाखेचा पदवीधर असणारा तरूण जर असल्या भाकडकथा सांगत असेल, त्या खर्याच आहेत म्हणून छाती बडवत असेल तर सामान्य अडाणी, देवभोळ्या माणसांची अवस्था काय असेल ? देवा धर्माच्या नावाने काय-काय कंड्या पिकवल्या, किती भुलथापा मारल्या, समाजाला किती मुर्ख बनवले याला काही परिसिमा आहे का ? धर्माच्या आणि देवाच्या नावाने पोट भरण्यासाठी सोकावलेल्या व्यवस्थेने समाजाला मानसिक, वैचारिक गुलाम बनवल्याचे यातून जाणवते. या गुलामांचा मेंदू नावाचा अवयव बर्फासारखा गोठून, थिजून गेला आहे की काय ? अशी शंका आल्यावाचून राहत नाही.
पसरवलेल्या भाकडकथांची चिकित्साच करावयाची झाली तर या धुर्त व्यवस्थेचे बुरखे टराटरा फाडता येतील, त्यांची कारस्थानं उघडी पाडता येतील पण तुर्तास तलवार व सदेह वैकुंठ पाहू. अनेक महामानवांना, महापुरूषांना किंवा महान स्त्रियांना अवताराच्या यादीत टाकून त्यांचे कर्तृत्त्व, पराक्रम, विदवत्ता, महानपण समूळ नष्ट करणारी, तसेच सामाजिक गुलामगिरी निर्माण करणारी आहे. मानवी उत्तूंगता, कर्तृत्त्वाला, कौशल्य व पराक्रमास नाकारणारी ही व्यवस्था माणसाच्या पौरूषाला, कर्तृत्त्वाला वांझ बनवत नाही का ? देव, धर्माच्या नावाने असल्या बोगस भाकडकथा रचून, त्या समाजात पसरवून समाजाची सृजनशिलता नष्ट केली जात नाही का ?
माणसाला स्वकर्तृत्वाचा विसर पडावा अन तो परावलंबी मानसिकतेचा, दुबळ्या मनाचा रहावा यासाठी ही व्यवस्था कार्यरत आहे. माणूस जेवढा मनाने दुबळा, मेंदूने अधू, दृष्टीने अंध व परावलंबी राहिल तेवढीच देव-धर्मावाद्यांची दुकानदारी तेजीत राहते. त्यांचा धंदा तुफान चालतो. याचसाठी मोठ-मोठ्या माणसांना देवाचे अवतार ठरवत त्यांचे चरित्र चमत्काराच्या बजबजपुरीने नासवले जाते. त्याला देवत्वाचा मुलामा जरूर चढवला जातो. देैवत्वाची झळाळी दिली जाते. पण या बेगडी मुलाम्यात आणि झळाळीत त्या माणसाचे कर्तृत्व, विचार गतप्राण होतात. त्यासाठीच देव -धर्माच्या ठेकेदारांची ही धुर्त व कपटी विचारचलाखी सुरू असते.
अखंड देश गुलामीच्या अंध:कारात चाचपडत असताना स्वयंप्रकाशी छत्रपती शिवरायांनी स्वकर्तृत्वावर तो अंध:कार भेदण्यास सुरूवात केली. स्वत:चे व मावळ्यांचे रक्त आणि घाम सांडून गुलामीचा अंध:कार नष्ट करत स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा तेजस्वी प्रकाश निर्माण केला. त्यांनी हे सारं वैभव स्वत:च्या धडावरील स्वत:च्याच डोक्यात असणार्या मेंदुच्या आणि मनगटाच्या जोरावर केले. या कामी त्यांना असंख्य मावळ्यांनी साथ दिली. शहाजी राजे, जिजामाता यांनी मार्गदर्शन केले. बाकी भवानीने तलवार दिली, कुठल्या गुरूने मार्गदर्शन केले वगैरे-वगैरे सब बकवास आहे. या गोष्टी पसरवणे म्हणजे शिवरायांच्या कर्तृत्त्वाला, पराक्रमाला नाकारणे आहे. त्यांच्या शौर्याला, धैर्याला व चाणाक्ष बुद्धीमत्तेला संकुचित करून अवमानित करणे आहे.
शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली ही निव्वळ लोणकढी थाप आहे. शिवरायांच्या असीम उंचीला मर्यादित करणारी आहे .याचा अर्थ असा होतो की जर भवानी मातेने तलवार दिलीच नसती तर शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करू शकले नसते. ती तलवार त्यांच्याकडे होती म्हणूनच ते पराक्रम गाजवू शकले. जो काही पराक्रम गाजवला तो त्या तलवारीनेच. त्यात महाराजांचे काहीच योगदान नाही. असाच याचा अर्थ होतो. म्हणजे तलवार प्रकरणाआडून शिवाजीराजांचे चरित्र आणि चारित्र्यच नाकारले जात आहे. हे जाणिवपुर्वक घडवले जाते पण ते देव-धर्माच्या आड दडून. देव आणि धर्म दडण्यासाठी अशा जागा आहेत की तिथे कोणी शोध घेत नाही. तिथे कोणी संशय घेतला किंवा चिकित्सा केलीच तर त्याचा आवाज धर्मद्वेष्टा, नास्तिक म्हणून बंद करता येतो. समाजमन त्याच्या विरोधात वापरता येते. प्रसंगी अशाच आंधळ्यांच्या माध्यमातून तो आवाज समुळ नष्ट करता येतो. म्हणूनच अशा गोष्टींना देव-धर्माच्या बुडाशी लपवले जाते. देवत्त्वाच्या, धार्मिकतेच्या बेगडी चढवल्या जातात. शिवाजी राजांना भवानीमातेने तलवार दिली असे सांगितले जाते.
शिवरायांचा काळ सोळाव्या शतकातला. 1630 ते 1680 हा त्यांचा कार्यकाळ पण त्याच्याही आधीपासून जगातल्या काही देशात बंदूका, तोफा अस्तित्त्वात होत्या. भारतावर आक्रमण केलेल्या मोघल, पोर्तुगिजांनी व इंग्रजांनी या प्रगत युद्ध साहित्याचा वापर केला आहे.16 व्या शतकात जर काही देशात तोफा आहेत, बंदूका आहेत तर भवानीमातेने शिवाजी महाराजांना तलवारीऐवजी शंभर तोफा, हजार-पाचशे बंदूका दिल्या असत्या तर ? याशिवाय 16 व्या शतकातच एक विमान येते काय ? तुकाराम महाराजांना घेवून जाते काय ? तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला विमानात बसून जातात काय ? हे जर खरे असेल तर आमच्या देवी-देवतांच्याकडे त्या काळात विमानेही होती. मग असे असेल तर भवानी मातेने शिवरायांना पाच-पंचवीस विमाने दिली असती तर त्यांनी जगावर राज्य केले असते. अपुरी साधने, अपुरे मनुष्यबळ यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रावरसुद्धा सत्ता निर्माण करता आली नाही. महाराष्ट्रातला खुप मोठा भाग स्वराज्यात नव्हता. तो मोघल, आदिलशहा व निजामशहा यांच्या ताब्यात होता. जर भवानीमातेने त्यांना तोफा, बंदूका, विमान दिले असते तर अख्या जगाचा इतिहास बदलला असता. बर यातल्या तोफा, बंदूका जगातल्या इतर देशात अस्तित्त्वात होत्या. विमानाचा शोध उशिरा लागला तो 1903 साली लागला. पण त्या क्षणी आमच्या देवांच्याकडे विमान होतेच ना ? मग आमच्या देवतांनी या गोष्टी शिवाजी राजांना का दिल्या नाहीत ?
5 मार्च 1666 रोजी शिवाजीराजे आग्रा भेटीस निघाले. ते 25 मे 1666 ला आग्य्रास पोहोचले. म्हणजे त्यांना आग्य्रास पोहोचण्यासाठी जवळ-जवळ 82 दिवस (3 महिने) लागले. त्यांच्याकडे जर विमान असते तर तासा-दोन तासात पोहोचले असते. तुकाराम महाराजांना विमान न्यायला त्याच काळात येते तर भवानी मातेने शिवरायांना विमान द्यायला हवे होते. कारण शिवाजीराजे रयतेसाठी झुंजत होते. विमानाची खरी गरज शिवरायांना होती. आमच्या देवांच्याकडेही तोफा, बंदूका निर्माण करण्याची ताकद नव्हती का ? आमचे देव पण मागासलेलेच होते काय ? पोर्तुगिजांना व इंग्रजांना तोफा-बंदुका निर्माण करता येत असतील, त्याचा वापर ते युद्धात करत असतील तर आमच्या देवांच्याकडेही हे असायला हवे. भवानीमातेने तलवारी ऐवजी युद्धतंत्राचे हे प्रगत साहित्य शिवरायांना द्यायला हवे होते. काही भामटे शिवाजीराजे हे शिव शंकराचा अवतार होते असे सांगत आहेत. तसे समाजात रूजवत आहेत. त्यासाठी शिवरायांची मंदिरं बांधून आरत्या करत आहेत. त्यांना भगवान म्हणत आहेत. त्यांना चार हात जोडत आहेत मग शिवरायांना तर या गोष्टी काय अवघड होत्या ? त्यांनी लढाईत अखंड हयात घालवली त्यापेक्षा त्यांना तिसरा डोळा उघडून मोघलाई नष्ट करता आली असती, जाळून भस्मसात करता आली असती. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांना मोघलाई-आदिलशाही समुळ नष्ट करता आलीच नाही. औरंगजेबाचे साम्राज्य संपवता आले नाही. मग आमच्या शिव-शंकरापेक्षा औरंगजेब ताकदवान होता काय ? आमच्या महादेवाला औरंगजेब भारी पडला असेच म्हणावे लागेल ? वरील सर्व प्रश्न चिकित्सक मनाला पडल्याशिवाय राहत नााहीत.
शिवरायांचे मोठेपण, कर्तृत्व नाकारण्यासाठी त्यांना अवताराच्या यादीत अडकवणे, त्यांना देवीने तलवार दिली म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले असे भासवणे. हा पाताळयंत्री खटाटोप आहे. जे लोक ही हरामखोरी करत आहेत तेच लोक तुकारामांचा खूनही लपवत आहेत. विमान आले आणि सदेह वैकुंठाला गेले असे सांगून त्यांचा मुडदा पाडला हे सत्य दडपत आहेत. तुकारामांच्या पुर्वी अनेक संत झाले, महात्मे झाले. तुकारामांचे समकालीन संत रामदासही होते. म्हणजे संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, एकनाथ, जनाई, रामदास यातल्या कुणालाच विमानात बसवून सदेह वैकुंठाला नेले नाही की कैलासातही नेले नाही. हा योग एकट्या तुकारामांच्या नशिबातच होता काय ?
या अर्थाने विचार केल्यास बाकीचे संत तुकारामांच्या पात्रतेचे नव्हते की काय ? तुकारामांना खुप खुप छळणारा आणि नंतर त्यांचा शिष्य होणारा भट तुकारामांच्या बरोबर विमानातून का गेला नाही ? तो आपल्या गुरूबरोबर का गेला नाही ? या प्रश्नांची उत्तरे काय आहेत ? बोगस आणि बकवास भाकडकथा रचून लोकांना मुर्ख बनवणारे या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देवू शकतील का ? देव-धर्माच्या आड दडून समाजाला कुठवर लुटायचे, फसवायचे ? त्यांचे मानसिक आर्थिक, प्रसंगी शाररीक शोषणही कुठवर करायचे ? रोज नव्याचा शोध घेणार्या जगाने ही हरामखोरी उघडी पाडली आहे. अशा षडयंत्राच्या जोरावर समाजावर सत्ता गाजवणार्या लोकांची मुस्काडं विज्ञानाने फोडली आहेत. तरीही त्यांचा तोच-तोच खेळ सुरू आहे. देव-धर्माच्या आड लपून समाजाला मुर्ख बनवत आहेत, गुलाम बनवत आहेत. या नालायकांनी कितीही प्रयत्न केेला तरीही हे बोगस भांडवल त्यांचा धंदा फार काळ चालू देणार नाही. या सगळ्या उचापती आता बंद कराव्यात. शिवाजीराजांना भवानीने तलवार दिली आणि तुकारामांना विमानाने सदेह वैकुंठाला नेले म्हणणे म्हणजे लोणकढी थाप मारणे आहे. अशा थापा आता चालणार नाहीत. लोक शहाणे होतायत. स्वत:चे डोके वापरताहेत. जे मुर्ख असतील त्यांना हे पटत असेल म्हणून अख्खा समाज मुर्ख नाही. याचे भान ठेवावे लागेल.
- अरुणा नारायण ( कर्जत-अहमदनगर)
0 टिप्पण्या