नव्या शोषणकारी समाजव्यवस्थेचा प्रारंभ

  
पृथ्वीवर माणसामध्ये जस-जसे परिवर्तन होऊ लागले, तस-तसे त्याच्यामध्ये एक वेगळीच भावना उत्पन्न झाली, माझा या माणसावर कसा वचक राहील, यासाठी तो प्रयत्न करू लागला. येथूनच मानवामध्ये संघर्षाची सुरूवात झाली. प्रथम हा संघर्ष अतिरेकी भावनेतून नव्हता तर माझं कसं वर्चस्व राहील यासाठी होता. पण काही कालांतराने काही धार्मिक माणसाने इथल्या समाजाचे वर्णामध्ये विभाजन केले. जो व्यक्ती स्वत:चा व्यवसाय करतो, तो व्यवसाय म्हणजे त्याची `जात' अशी ओळख होऊ लागली. आणि इथूनच नव्या शोषणकारी समाजव्यवस्थेला प्रारंभ झाला. माणसा-माणसात भेदाभेद सुरू झाल्याबरोबर इथे माणसाचे दोन गटात विभागणी झाली. एक शोषित समाज ज्यात भांडवलदार वर्ग, ब्राह्मणवर्ग, मार्तंड, मालक वर्ग, राजकारणी वर्ग इत्यादी या विभागणीमुळे जातियता, मोठ्या प्रमाणात वाढली, प्रत्येक माणूस स्वत:च्या जातीला धर्माला श्रेष्ठ मानू लागले तर दुसऱयाच्या जातीला-धर्माला कनिष्ठ मानू लागले. 

भारतामध्ये वैदिक धर्माने फारच शोषण केले आहे. धर्माच्या नावावर भाकडकथा तयार करून इथल्या मुलनिवासावर फार मोठे अत्याचार केले आहेत. त्याचे व्रण अजूनही मिटायचे आहेत. त्यांनी माणसाचे माणूसपणच हिरावून घेतले होते. पाणी, शिक्षण, संपत्ती, चांगले राहणे इत्यादी मुलभूत अधिकारच हिरावून घेतले होते. त्याला पशु बनविले होते. या शोषणाविरुद्ध बंड पुकारणारा प्रथम क्रांतीकारक कुणी असेल तर तो तथागत भगवान बुद्ध होय. ज्यांनी वैदिक धर्माला आव्हान देऊन नव्या मानवतावादी बुद्ध धम्माची पताका भारताच्या भूमित रोवली आणि समाजक्रांतीच्या चक्राला गती मिळाली. त्याकाळी वैदिक धर्माने जे भ्रम निर्माण केले होते. त्या भ्रमाचा बुरखा फाडून वास्तववादी खरी ओळख माणसाला करून दिली होती. ``गौतम बुद्ध हे लोकशाही जीवनमूल्यांचा जगातील पहिले विचारवंत आहेत. ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या जीवनमूल्याचा अडीच हजार वर्षांपूर्वीच पुरस्कार केला आणि ती जीवनमूल्ये राबविण्यासाठी भिक्खूंची एक यंत्रणा उभी केली.'' त्याद्वारे शोषित समाजाच्या दु:खाला मुक्ती मिळाली होती. 

प्राचीन युगामध्ये सम्राट अशोकाने कलिंगाच्या युद्धात विजय मिळविल्यावर जेव्हा त्यांनी सगळीकडे प्रेतांचा खच पाहिला, तेव्हा त्यांच्या मनातील माणूस जागा झाला. आपण निरपराध मानवाला मारले आहे, कितीतरी आई-बहिणींचे सुहाग उजाडले आहे, अशी खंत त्याला झाली त्यामुळे त्याच्यात मत परिवर्तन होऊन (दु:ख) त्यांनी मानवता शिकविणारा तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला. तेव्हा सुद्धा एक प्रकारची शोषण प्रक्रिया होती, पण बुद्ध धम्म स्वीकारल्याबरोबर सम्राट अशोकाने समाजोपयोगी काम करायला सुरूवात केली, गरीब-श्रीमंत असा भेद न राखता सर्व माणूस एक असून सर्वांना चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा अधिकार आहे. असे नियम करून भारताच्या वैभवाची शान सर्व जगात पसरवली. 

परंतु त्यांच्यानंतर मौर्य घराण्याला योग्य राजा मिळाला नाही व पृष्यमित्र शुंग याने मौर्याच्या शेवटचा राजा बृहद्रथ यांना 180 ई.पू. मध्ये कपटनितीने मारले व आपले साम्राज्य निर्माण केले. इथून माणसाच्या शोषणाची दैन्यावस्था निर्माण झाली. ही अवस्था जवळपास 18व्या शतकापर्यंत होती. मध्ययुगात समाज परिवर्तनाचे प्रयत्न भरपूर झाले असले तरी मानवाचे माणूसपण प्राप्त करण्यात ते यशस्वी झाले नव्हते हे खेदाने म्हणावे लागते. परंतु 16व्या शतकात इंग्रज लोक भारतात आले. त्यांनी भारतीय लोकांची नाडी हेरली. त्यांच्यातील अंतर्कलहाचा फायदा घेऊन ते भारतातील शासनकर्ती जमात बनले. त्यांनी 18व्या शतकाच्या कालखंडात भारतीय लोकांना शिक्षित करण्यासाठी आटोकाटप्रर्यंत केला. काही लोक त्यांना कारकून निर्माण करण्यासाठी शिक्षणाची गरज होती असे म्हणत असले तरी त्याच शिक्षणाचा फायदा घेऊन समाजसुधारकांनी एकत्र येऊन परस्पर धर्मातील  चिकित्सा करायला सुरूवात केली होती, हे सूर्यप्रकाशासारखे सत्य विसरून चालणार नाही, लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात थोर समाजसुधारकांचा फार मोठा वाटा आहे. 

त्यामध्ये शोषित मुक्तीच्या लढाया लढण्याचे खरे कार्य क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी केले. धर्माचा पगडा असलेले सर्व नीतीमूल्य त्यांनी झिडकारून निर्घृण निराकाराची उपासना करण्याचे लोकांना पटवून देऊन शोषितांना शिक्षणाचे खरे महत्त्व पटवून दिलेच नाही तर स्वत: शाळा सुरू करून शोषित समाजाला माणसात आणण्याचा खरा प्रयत्न जोतीराव सावित्रीबाईने केले. महात्मा ज्योतिबाने केलेली शोषित मुक्तीची लढाई निरपेक्ष होती, तर काही सुधारकांनी फक्त स्वत:च्या जातीचा विकास केला. शोषित मुक्तीच्या लढाया लढताना काही सुधारकांनी शोषित समाजात संभ्रम निर्माण केले तर वास्तव पडद्याआड लपवून ठेवले. 

महात्मा गांधीने शोषित मुक्तीचे आंदोलन चालवले पण ते जातीव्यवस्था मानत असल्यामुळे त्यांनी खरे वास्तव लपवून ठेऊन लोकांमध्ये भ्रम पैदा करून देवळात जाणे, जेवण करणे इत्यादी कार्य शोषित समाजासोबत केले तर इथली जाती व्यवस्था समाप्त होईल, असे त्याचे म्हणणे खोटे ठरले, उलट त्यांनी ``शुद्र हे आपले धार्मिक कर्तव्य म्हणून सेवा करतात ते कधीही संपत्ती धारण करणार नाहीत, त्यांच्यात संपत्तीच्या स्वरूपात काहीही धारण करण्याची आकांक्षा सुद्धा नाही. याकरिता त्यांचे हजारदा अभिनंदन केले पाहिजे. देवसुद्धा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतील.'' (काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले पान. 289) असा भ्रम निर्माण करून शोषित समाजाची फसगत केली. वॉल्टेयने गांधीवादाच्या शोषितमुक्तीच्या लढ्यातील वास्तव सांगताना म्हटले आहे की, ``काहींची विपत्ती किंवा दु:ख इतरांना आनंद देत असेल तर ते सर्वांच्या मूल्याचे आहे, असे सांगणे म्हणजे क्रूर थट्टा होय. मृत्युनंतर तुझ्या मृत शरीरातून हजारो कीडे जन्माला येतील यातून तुला शांती आणि समाधान मिळणार आहे,'' ही क्रूर थट्टाच नव्हे का? या वास्तवाची जाणीव शोषित समाजाने ठेवायला हवी. 

शोषित मुक्तीच्या खऱया लढाया-लढल्यात त्यामध्ये शाहू महाराज, रामास्वामी नायकर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वात मानवमुक्तीची लढाई लढली व सर्वस्वपणाला लावून लोकशाही जिवंत ठेवली. काही विकृत मुर्ख (अरुण शौरी) बाबासाहेबांविषयी भ्रम निर्माण करतात. अरूण शौरीने डॉ. बाबासाहेबांचे द्वितीय महायुद्ध विषयी विचार वाचावे म्हणजे बाबासाहेबांचे वास्तवाने त्यांच्या डोळ्याचे मोतीबिंदू गळून पडतील. (डॉ. आंबेडकर आणि दुसरे महायुद्ध पा. नं. 170) अचूक असे भविष्य सांगून आपल्या विद्वतेने जगाला दिपवून टाकले. 

भारतीय शोषित समाज हा नेहमीच अंधानुकरण करताना दिसतो, स्वत:च्या कुवतीने विचार करायला तयार राहत नाही, तो एखाद्या सुधारकाच्या, धर्ममार्तंडाच्या, मौलवी, साहित्यिक व राजकारण्याच्या फसव्या चक्रव्युहात सापडून स्वत: स्वत:च शोषण करत असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सजग राहण्याचा इशारा देताना म्हणतात की, ``धार्मिक परिवर्तन म्हणजे जीवनाच्या मुलभूत उद्देश्यामध्ये परिपूर्ण परिवर्तन घडवून आणणे होय. बौद्ध धम्म सामाजिक क्रांतीचे इतिहास आहे. माणसाच्या मनामध्ये आणि जगाच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणल्याशिवाय जगामध्ये सुधारणा घडवून आणणे अशक्य आहे, अशी तथागत बुद्धानी जगाला दिलेली शिकवण, सर्वाधिक मोठी बाब आहे.'' हे वास्तव इथल्या शोषित समाजाने समजून धार्मिक भ्रम पसरवणाऱ्यापासून सावध राहीले पाहीजे. 

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असले तरी इथल्या शोषित समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक पणती होऊ शकली नाही. आजही खैरलांजी इथल्या प्रकरणाने भारतीय समाजव्यवस्थेतील सनातनी व्यक्तीचे मन कसे बरबटले आहे याचा प्रत्यय आला आहे. आंदोलनकर्त्यांना गृहमंत्री दहशतवादी आहेत म्हणून स्वत:चे दिवाळे निघाल्याचे संकेत देत आहेत. आंदोलन लहान मुले-मुली सुद्धा सहभागी असताना बेजबाबदारपणाचे वक्तव्य करणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षणच म्हणावे लागेल. आरक्षण, शेतकरी आत्महत्या, बेरोजगाराचे प्रश्न, सेज प्रश्न इत्यादी प्रश्नावरून लोकांचे मन वळवण्यासाठी समाजकंटकांच्या हाताने काही राजकीय लोकांनी हा डाव साधल्याचे वाटते. सनातन आम्ही तुमचे कैवारी आहोत, असे वास्तव तयार करून तुमचे मारेकरी दुसरेच आहेत, असा भ्रम निर्माण करण्यात येत आहे. 

भारतीय राज्यकर्त्यांनी शोषीत समाजाला न्याय देण्याचे नाकारले आहे तर स्वत:च्या पक्षाचे ढोल वाजवत धन्यता मानली आहे. `भारत उदय' नावाचं पिल्लू निर्माण करून आम्ही किती चांगलं काम केलं असा गाजावाजा प्रसारमाध्यमाद्वारे शोषित समाजात दिशाभुल निर्माण केले होते. तर वास्तव हे होतं की, ``भाजप के चुनावी प्रचार अभियान के लिए बढ़े साजिशी ढंग से सरकारी कोष से `भारत उदय' के विज्ञापनों पर 550 करोड रुपये का खर्च किया गया। वहीं महाराष्ट्र के 14 जिलों में पडे सुखे के लिए केंद्र सरकारने 71 करोड रुपये देकर खानापूरी की।'' 

हे वास्तव आपण केव्हा समजून घेणार.... भारतीय लोकांची आर्थिक बाजू भक्कम न होता तो दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. त्यांच्या विकास विदेशी चलनाने आपण करू शकतो या तोऱ्यात आजचे प्रधानमंत्री, अर्थमंत्री सारखे विदेशी नीतीचे समर्थन करतात. पण एखाद्या मोठ्या देशाच्या दबावात जर आपण निर्णय घेत असू तर येणाऱ्या काळात त्याचे प्रायश्चित भारताला जरूर भोगावे लागेल. जर राज्यकर्त्यांना शोषित जनतेची आस्था असती तर विदेशी लोकांना कवडीभावाने भारतीय सुपीक जमीन विकली नसती हे वास्तव जळजळीत आहे. काँग्रेस जागतिकीकरणात भारतीय जनतेचा विकास होणार असा भ्रम पैदा करून शोषण मुक्त समाज निर्माण करण्याचे बँड वाजवताना दिसतात. ह्यापासून शोषित समाजाने सावध राहीले पाहिजे. 

शोषण मुक्तीच्या लढायातील भ्रम आणि वास्तव ओळखून, शोषित समाजाने यानंतर काम करायला हवं. आपलं यश हे सर्वांचं यश आहे. घासभर तुकड्याकडे कुत्र्यासारखे जाण्यापेक्षा त्यांच्या भ्रमात राहण्यापेक्षा स्वकष्टाने मिळकत करून आपले पोट भरले पाहिजे. नेमकं वास्तव कोणतं आहे हे ओळखून जगण्याचे दिवस आता आले आहेत. कुणी येईल तो आपली लढाई लढणार यांच्या भ्रमात राहू नका, आपले सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकिय हक्क मिळवण्यासाठी एकत्र येऊन शोषित मुक्तीची लढाई लढली पाहीजे. कारण की, ``जगात समान दु:खी आणि समान प्रश्नांसाठी लढणाऱया प्रवक्त्यांची जीवनसृष्टी कशी समान असते, हे साम्यावरून प्रतीत होईल. दडपल्या गेलेल्या मनुष्यत्व हिरावून घेतलेल्या समाजाची युद्धे कधीच संपत नसतात. जुनी युद्धे संपली की, पुन्हा नवी युद्धे, आकाशात काळे ढग यावेत, त्याप्रमाणे जन्म पावतात आणि म्हणून अशा साधनवंचित समाजाला जागृत करण्यासाठी त्याला त्याचा इतिहास सांगावा लागतो आणि त्यापेक्षाही त्याला त्याचे वास्तव जाणवून द्यायचे असते. सामाजिक व सांस्कृतिक वर्चस्वखोरांनी त्यांची मलिन केलेली प्रतिमा, त्यांची ठोकरलेली विश्वासार्हता, नवे जग निर्मिण्याची कुस्करलेली दुर्दम्य आकांक्षा या संबंधीची सत्य प्रतिपादावयाची असतात.'' (लोकराज्य ऑक्टो. 2006- पान नं. 45)  तेव्हा कुठे तो बंड करून उठू शकतो आणि शोषित मुक्तीच्या लढ्यातील भ्रम आणि वास्तव ओळखू शकतो. 

किती जेल्स किती बरॅक्स यांचा एकदा हिशेब करा, उधाणलेल्या समुद्राला बांधणार कसं याचं एकदा गणित मांडा. समतेचं वारं प्यालेली पाखरं त्यांना असं डांबू नका, तुरुंगासह ती उडून जाणार नाहीतच अशा भ्रमात राहू नका. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1