कार्यकर्ता,हे मुरलीधर जाधव यांचं पुस्तक वाचून बरीच वर्षे लोटली आहेत.पण आज त्या पुस्तकाची तीव्रतेने आठवण झाली.कारण 11 जानेवारी 2022 रोजी दिलीप हजारे या कार्यकर्त्याचं निधन झालं.ज्यांनी कार्यकर्ता हे पुस्तक वाचलंय त्यांना वेगळं काही सांगायची गरज उरणार नाही की मी दिलीप हजारेच्या निमित्ताने कार्यकर्ता पुस्तकाची आठवण का करतोय.पण ज्यांनी ते वाचलं नाही किंवा एखाद्या कार्यकर्त्यांची जिंदगी जवळून पाहिली नाही त्यांना हे सविस्तर सांगावं किंवा खरं तर दिलीप सारख्या तमाम उपेक्षित वंचित दलित कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील काही मोजकी पानं उलगडून दाखवावी म्हणून हे लिहावंसं वाटतंय.
तर झालं असं की महाराष्ट्रातल्या बासष्ट किंवा सदुसष्ट अडुसष्ट सालच्या दुष्काळात अनेक गोर गरिब,खास करून दलितांनी मुंबई पुण्यासारख्या शहरांची वाट धरली होती.दिलीपचे वडील याच काळात मुंबईत आले.हातगाडी वर राबत कुटुंबाचा गाडा कसाबसा ओढू लागले.हजारे कुटुंबियांनी भांडुपच्या फुटपाथ वर तीनेक वर्षे काढली.एव्हढ्या कालावधीत त्यांच्या उस्मानाबादचे पाच पंचवीस कुटुंबीय त्यांना येऊन बिलगले होते.तोपर्यंत दिलीप पण ब्रयापैकी समजूतदार मोठा झाला होता.हायवे कडेला राहणं मुश्किल झालं होतं म्हणून सगळे उठले आणि डोंगरावर भांडुप तलावापाशी झोपड्या ठोकून राहू लागले.तेव्हाचे मुंबई महापालिकेचे उपायुक्त गो.रा. खैरनार त्यांना म्हणाले की तुम्हाला इथं राहता येणार नाही.आणि तशी पण ही जागा फॉरेस्टच्या अंडर येते.तुम्हाला इथं काही अधिकार मिळणार नाहीत.तुम्ही एक काम करा,पवई तलावाच्या बाजूला मोकळा पट्टा आहे तिकडे जा.आतापर्यंत त्या डोंगरावर दोन तीनशे झोपड्या उभ्या राहिल्या होत्या.दिलीप त्या सर्वांना घेऊन पवई तलावाच्या शेजारच्या त्या डोंगराळ जमिनीवर आला.येताना सोबत दोन तीनशे घरांचा बारदाना.मात्र नव्या जागेत उभी राहिली जवळपास सतराशे घरं.कोण कोण कुठून कुठून पोट भरायला मुंबईत आलेली.दिलीप हजारेंचा संघर्ष त्या सर्वांच्या डोक्यावर छत देऊन गेला.त्या वस्तीला नाव दिलं गेलं फुले नगर ! दलित उपेक्षित माणसं किती यतार्थ विचार करतात ना !!
आज फुले नगर चहूबाजुनी फुलून गेलं आहे.पवई गांधीनगरच्या नाक्यावर आय आयटीच्या बाजूला असलेल्या या फुले नगरची किंमत करोडो अब्जोच्या घरात गेली आहे.प्रत्येक गल्लीबोळात स्वयंघोषित पुढारी राज करू लागले आहेत.त्या गलबलाटात दिलीप हजारे सारखे भिडस्त कार्यकर्ते अडगळीत फेकले गेले.ज्याने फुले नगर वसवलं तोच विस्थापित ठरला.अर्थात ही झाली आताची गोष्ट.
1992 ला दिलीप हजारेने सुरू केलं कष्टकरी आंदोलन., कचरा वेचण्राया महिलांची संघटना.पुढे 1996 मध्ये याचं रूपांतर झालं कष्टकरी अभियानात.त्यावेळी मुंबईच्या सगळ्या झोपडपट्यांमध्ये असण्राया कचरा वेचक महिला रांगा लावून लावून दिलीपच्या संघटनेच्या मेंबर होत होत्या.तब्बल पंचेचाळीस हजार महिला मेंबर झाल्या होत्या.दिलीपचा आजपर्यंतचा सर्वात जवळचा सहकारी आणि फॅमिली फ्रेंड सतीश जळगावकर या आठवणींना उजाळा देताना गलबलून गेला.आणि आम्ही त्या महिलांना पुढे न्याय देऊ शकलो नाही अशी खंतही व्यक्त करून गेला.आज मुंबईत कचरा वेचक महिलांसाठी काम करण्राया अनेक संस्था पुढे आल्यात.त्यांना आज राजमान्यता मिळाली आहे.पण दिलीप सारख्या माणसांना राजमान्यता मिळवता येत नाही हेच खरं.नाही म्हणायला रामदास आठवलेसारखे नेते अडीअडचणीला दिलीपच्या मागे उभे राहिलेत हेही खरंय.दलित पँथर चा प्रत्यक्ष कार्यकाळ सीमित असला तरी त्या उर्जेतून आणि उर्मीतून उभे राहिलेले हजारो नवे जुने पँथर तीच ओळख घेऊन पुढील अनेक दशके एकाकी झुंजत राहिले.दिलीप हजारे त्यापैकीच एक.फुले नगरच्या गेटवर लागलेले मोठमोठे होंर्डिंग तेच सांगत होते.पँथर दिलीप हजारे !
बदलत्या काळाशी जोडून घेण्यासाठी वय आणि विचाराने परिपक्व होत चाललेल्या दिलीप हजारेंनी स्वतच साप्ताहिक सुरू केलं.थेट संवाद ! त्यातून त्यांचा चळवळीशी थेट संवाद सुरू राहिला पण आर्थिक घडीशी विसंवाद कायम राहिला.तो अखेरपर्यंत. त्यागी कार्यकर्त्यांच्या नंतर भोगी कार्यकर्ते कधी आणि कसे वाढले ते कोणालाच कळले नाही.यात असंख्य प्रामाणिक कार्यकर्त्यांची कुत्तर ओढ झाली. कोणी परिस्थिला शरण गेले तर कोणी बाजूला झाले.ज्यांना टिकून पण राहायचं होतं आणि शरणही जायचं नव्हतं ते संभ्रमित झाले.लोकं त्यांना खिजवू लागली.काही कमावलं नाही म्हणून हिणवू लागली.अस्तित्व टिकवण्यासाठी या कार्यकर्त्यांना खूप कसरती कराव्या लागल्या.आजही कराव्या लागत आहेत.त्या नादात त्यांच्या हातून चुकाही झाल्या.हजारेंच्या हातूनही कळत नकळत एक दोन चुका झाल्या.बहुतेक त्या चुका त्यांच्या मनावर खोल घाव करून गेल्या असाव्यात.
चार पाच वर्षांपूर्वी हजारेंच्या सांगण्यावरून त्यांचा मुलगा अविनाश याला आम्ही दैनिक महासागर मध्ये ट्रेनी रिपोर्टर म्हणून जॉईन करून घेतलं होतं. आज त्यांचा मुलगा बापाच्या पावलावर पाऊल ठेऊन स्वतंत्ररित्या पत्रकारिता करतोय.आपण स्वतंत्र पत्रकारितेचे चटके सोसल्यानंतरही मुलाला त्या मार्गावर टाकण्याचं धाडस चळवळीतल्या डेडीकेटेड कार्यकर्त्या शिवाय कोण करू शकेल ?
मधल्या काळात त्यांच्याशी थेट संवाद झाला नाही.अधूनमधून सतीश जळगावकर कडून त्यांची खबर कळत होती.आणि काल सतिशनेच दिलीप हजारेंच्या निधनाची बातमी दिली.विस्मरणात गेलेल्या आपल्या जेष्ठ कार्यकर्त्या दोस्ताच्या अंत्यविधीला हजर रहावं म्हणून आवर्जून फुले नगरला पोहोचलो. कोविड च्या नियमाप्रमाणे वीस पेक्षा अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही हे माहीत असल्यामुळे तिथे सुनसान वातावरण असेल असं गृहीत धरून चाललो होतो.मात्र फुले नगरच्या गेटवरच विलास जाधव आणि संजय जाधव हे कार्यकर्ते बंधू भेटले आणि माझ्या अपेक्षाभंगाला सुरवात झाली. फुले नगरच्या गेटपासून ते दिलीपच्या घरापर्यंत इतकी गर्दी होती की पोलिसांना आपली गाडी गल्लीत घुसवता आली नाही.माघारी वळावं लागलं.लोकांनी स्वतहून दुकानं बंद ठेवली होती.श्रध्दांजलीचे बोर्ड लावले होते.निर्वाण रथावरून जेव्हा दिलीप हजारेंची अंत्य यात्रा निघाली तेव्हा शेकडो लोक रस्त्याच्या बाजूला उभे राहून त्यांना अंतिम निरोपाचा हात जोडत होते.बायकांचे घोळके खूप दूर पर्यंत चालत अश्रूभरल्या डोळ्यांनी सोबत करत होते.स्मशानभूमीच्या गेटवर रिपाई कार्यकर्ते घोळक्या घोळक्याने उभे होते.त्यात रिपाई मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्यासह पवनकुमार बोरुडे, पत्रकार जयवंत हिरे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.दिलीप हजारे नावाच्या एका प्रेमळ,मवाळ आणि मृदू हृदयाच्या व्यक्तींसाठी लोकांची ती सहज स्फुर्त श्रद्धांजली होती.
माझ्यासाठी मात्र ती वस्तीतल्या लोकांनी एका निरलस कार्यकर्त्या बद्दल वर्षानुवर्षे मनोमन जपून ठेवलेली खोल खोल अशी कृतज्ञता होती.ती आज जाहीरपणे व्यक्त होत होती. वस्तीतल्या कार्यकर्त्यांचं काही वेगळंच असतं. जितेपणी कंगाल असतात आणि जाताना श्रीमंती ठेऊन जातात !
- रवि भिलाणे
0 टिप्पण्या