२१ जून २०१२ रोजी प्रशासकीय कारभाराचा केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालय इमारतीला भीषण आग लागली. जिथून राज्याच्या कारभाराची सूत्र हालतात तीच इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे जवळपास सारेच भस्मसात झाले होते. अशा वेळी ही वास्तू कमीत कमी दिवसात पुन्हा उभी राहणे अपेक्षित होते. कारण लोक कारभाराचा गाडा बंद पडायला नको होता. अशावेळी छगन भुजबळ यांनी एका विश्वासू अभियंता अधिकार्याकडे मंत्रालय दुरुस्तीची जबाबदारी सोपवली. ठाणे विभागाच्या अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत या अधिकार्याने आपला अनुभव, अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून काही दिवसात मंत्रालय इमारतीचे पहिले तीन मजले सुस्थितीत आणले. इतकेच नव्हे तर अवघ्या २४ महिन्यात मंत्रालयाच्या वास्तूचे पुनर्निर्माणही केले. त्यामुळे अल्पावधीतच मंत्रालयातील कामकाज सुरळीत सुरू झाले. मंत्रालय पुनर्निर्माणात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला ते नाव म्हणजे अनिलकुमार गायकवाड! मंत्रालयाला नवी झळाळी देणारे अनिलकुमार गायकवाड नुकतेच ३१ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंत्रालयातील परिषद सभागृहात त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता विभागाच्या वतीने स्मृतीचिन्ह शाल पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभागातील कर्मचारी अधिकारी तसेच विविध शेत्रातील मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते. विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्या मनोगतांमधून गायकवाड यांच्या कामाबद्दल कौतुक केले. तसेच त्यांना समृद्धी महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने पुन्हा संधी द्यावी अशी भावना व्यक्त केली.
आपल्या कार्यकाळातील आठवणीना उजाळा देतांना अनिलकुमार गायकवाड यावेळी म्हणाले, बांधकाम खात्याविषयी पूर्वीपासूनच आवड होती. नोकरी करायची तर बांधकाम खात्यातच या जिद्दीने प्रयत्न करीत राहिलो एका कॉलेजमध्ये नाईलाजाने दोन वर्ष प्राध्यापक म्हणून काढले. जलसंपदा विभागात देखील नाईलाजाने पहिली नोकरी केली. परंतु मन रमले नाही. प्रयत्न करीत राहिलो. १९८६ ला एमपीएससी परीक्षा दिली. त्याचा निकाल १९८७ ला आला चांगल्या मार्कांनी पास झालो आणि एप्रिल १९८९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झालो. सेवाकाळात ५ ठिकाणी काम केले मंत्रालयात १ नोव्हेंबर २०२० पासून अवघे एक वर्ष मिळाले त्यातील सहा महिने कोरोनामध्ये गेले केवळ सहा महिनेच काम करता आले मंत्रालयातील कामकाजाविषयी लोकांमध्ये नकारात्मकरित्या बोलले जात होते परंतु या कार्यकालात मंत्रालयीन कामाचा अनुभव नसतानाही विभागातील सर्वांच्या कार्यपद्धती सजून घेतल्या व सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले. याबद्दल गायकवाड यांनी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या आयुष्यातील ३२ वर्षाच्या सेवाकाळातील जून २०१५ ते एप्रिल २०१७ अशी दोन वर्ष विनाकारण वाया गेली अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. कालिना विद्यापीठ तसेच महाराष्ट्र सदन प्रकरणात दोष नसतानाही आपल्याला गोवण्यात आले. सलग २२ महिने बाहेर राहावे लागले. " आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे योजिले आहे त्यामुळे आपणास निलंबित करण्यात येत आहे " अशी आगळीवेगळी नोटीस देवून कारवाई करण्यात आली, यावर प्रशासनाकडे सुमारे १० पानांवर म्हणणे मांडले. परंतु ती पाने उघडून देखील पहिली गेली नाही अशी खंत गायकवाड यांनी बोलून दाखविली. निलंबनाचा काल हा केवळ ३ महिनेच असावा असे न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र त्यावर काम केले जात नाही. मंत्रालयात आपले कर्मचारी किवा अधिकारी यांच्यावर शिस्तभंग किवा निलंबनाची कारवाई करीत असताना माझ्यासारखी वेळ कुणावरही येवू देवू नका संबंधितांचे म्हणणे गांभीर्याने घ्यावे अशी विनंती त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना शेवटी केली.
महाराष्ट्राच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडविणारी वास्तू देशाच्या राजधानीत दिमाखाने उभी राहिली. याचे श्रेय गायकवाड यांचे आहे. नवी दिल्लीच्या वैभवात महाराष्ट्र भवन या वास्तूने भर घातली आहे. अशी वास्तू निर्मिती करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या अनिलकुमार गायकवाड यांची सेवानिवृत्ती ही मनाला हुरहूर लावणारी आहे. ज्यांनी त्यांच्या कामाची शैली, चिकाटी, सचोटी, कार्यतत्परता पाहिली, अनुभवली अशांची भावना आता बांधकाम खात्यात गायकवाडसाहेबांसारखा अधिकारी होणे नाही, अशी आहे. अशा शब्दात बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
0 टिप्पण्या