ठाणे : चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षरुपी रोपट्याला आता बहर येऊ लागला आहे. कोरोना काळात अखंडितपणे रुग्णांना सेवा देणारा मदत कक्ष अशी या वैद्यकीय मदत कक्षाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. अवघ्या चार वर्षांत लाखो रुग्णांना मदत करण्यासोबतच तब्बल 60 कोटी रुपयांची सवलत रुग्णांना मिळवून देण्यापर्यंत काम या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ठाणे शहरातून सुरू झालेले वैद्यकीय मदत कक्षाच्या 22 जिल्ह्यामध्ये शाखा पसरल्या आहेत. छोट्याशा ऑफिसमधून सूरु करण्यात आलेला हा आरोग्ययज्ञ यापुढेही अखंडितपणे सुरू रहावा, अशी इच्छा राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली
कोरोना नियंत्रणात आणतानाच लाखो रुग्णांना कोरोनामुक्त करण्याचं काम कोविड योद्ध्यांनी केलं आहे त्यांच्या कार्याला सलाम करीत असताना अद्याप आपलं पूर्णपणे कोरोनामुक्त झाले नाही याचं भान सर्वांनी बाळगल पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असून तिसऱ्या लाटेला थोपविण्यात आपण यशस्वी होत आहोत. मात्र सर्वांनी अधिक काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करण आवश्यक असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
पालकमंत्री शिंदे म्हणाले, वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानून अविरत कार्य सुरू आहे. वैद्यकीय मदतीसोबतच नैसर्गिक आपत्तीतही या कक्षामार्फत सामान्यांना सेवा देण्याचं काम केलं. जात. त्यात कुठलाही व्यावसायिक हेतू डोळ्यासमोर न ठेवता हे काम या कक्षाच्या चमू मार्फत केल जात ही अभिनंदनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो रुग्णांना वैद्यकीय सहाय्य करण्याचं काम अहोरात्र केलं गेलं. ठाण्यामध्ये अवघ्या 22 दिवसात 1150 खाटांच सुसज्ज असं कोविड रुग्णालय उभारलं गेलं. त्यात आयसीयू, डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आगामी काळात याच तातपुरत्या रुग्णालयाचे कायमस्वरूपी रुग्णालयात रूपांतर करून तिथे कर्करोग रुग्णालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळातील आठवणी अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. मात्र अशाही परिस्थितीत वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यकर्त्यांनी, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी जीवाची बाजी लावून लोकांना मदत केली. त्यामुळे कोरोनातून लाखो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे कोरोना योद्ध्यांच हे काम नक्कीच अभिनंदनीय आहे, असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.आता कोरोनाची दुसरी लाट काहीशी नियंत्रणात असली तरी तिसरी लाटेच्या धोका उद्भवू नये यासाठी सर्वानीच मास्कचा वापर आणि कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना पूर्णपणे गेल्याशिवाय मास्क वापरत जा, गर्दी टाळा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचं काम होत असल्याचे राज्यमंत्री बच्ची कडू यांनी सांगितले. रुग्णसेवेच्या बळावर मी आमदार झालो याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.चार वर्षापूर्वी वैद्यकीय मदत कक्षाचं लावलेलं रोपट आता जोमाने वाढत असून त्याचा 22 जिल्ह्यांमध्ये विस्तार झाल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. सामाजिक जाणीवेतून ही सेवा सुरू असून लाखो लोकांना सेवा देण्यासाठी कक्ष काम अविरत सुरू राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यभरातील कोरोनायोद्ध्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये शंभरहून अधिक शासकीय अधिकारी, संस्था, रुग्णालये, महापालिका, खासगी रुग्णालये, खासगी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरविण्यात आले. मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी आमदार श्री. लंके, डॉ. लहाने, डिजीटल मीडीयाचे संपादक राजा माने यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
0 टिप्पण्या