Top Post Ad

फेसबुक का ठप्प पडले होते?

सोमवारी रात्री फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइट्स सुमारे सहा तास ठप्प पडल्या होत्या. यामुळे भारतासह संपूर्ण जगभरातील यूजर्स अस्वस्थ झाले होते. तब्बल सहा तासांनंतर सेवा पूर्ववत झाली. दरम्यान फेसबुकने कॉन्फिगरेशनमध्ये झालेल्या चुकीच्या बदलांमुळे सेवा ठप्प होती अशी माहिती दिली. डेटा सेंटर्सशी नेटवर्क ट्रॅफिकचे समन्वय साधणाऱ्या राऊटर्समध्ये झालेल्या चुकीच्या बदलांमुळेच सेवा सहा तास ठप्प होती असा फेसबुकचा दावा आहे. ही समाजमाध्यमे ठप्प झाल्यानंतर ट्विटरवर मीम्स आणि तक्रारींचा पूर आला होता. सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही समस्या समोर आली. या आउटेजचा परिणाम अमेरिकन बाजारातील फेसबुकचे शेअर आणि मार्क झुकरबर्गच्या कमाईवरही झाला आहे.

फेसबुक का ठप्प पडले होते? कोणत्या तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या उद्भवली? ती खरोखर तांत्रिक समस्या होती की त्यामागे काही इतर कारण होती आणि या सगळ्यात फेसबुकचे किती नुकसान झाले आहे, हे जाणून घ्या..

फेसबुक का ठप्प पडले होते?

फेसबुक ठप्प पडल्यापासून त्याच्या कारणाबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. सायबर तज्ज्ञांच्या मते,बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल (बीजीपी) मुळे ही समस्या निर्माण झाली आहे.


बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल (बीजीपी) म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, इंटरनेट केवळ बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलद्वारे काम करते. बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल इंटरनेटवरील सर्व नेटवर्क एकमेकांशी जोडतो. खरं तर, इंटरनेट हे नेटवर्कचे जाळे आहे. जेव्हा तुम्ही वेबसाईट उघडता, तेव्हा बीजीपी स्वतः या नेटवर्कच्या जाळ्यात वेबसाईट वेगाने उघडण्याचा मार्ग शोधते. बीजीपीमधील समस्येमुळे, फेसबुकचा नेटवर्क पाथ सापडला नाही आणि हे फेसबुक डाऊन होण्याचे कारण बनले.


ही अडचण का निर्माण झाली?

अलीकडेच, फेसबुकने अनेक राउंटिंग बदल केले, ज्यामुळे फेसबुकचे डोमेन नेम सिस्टम (DNS) सर्व्हर बंद झाले. इंटरनेटची निर्देशिका म्हणून DNS सर्व्हरचा समजला जातो. प्रत्येक वेबसाईटचा अ‍ॅड्रेस DNS मध्ये साठवला जातो. जेव्हा तुम्ही इंटरनेटवर कोणतीही वेबसाईट शोधता, तेव्हा DNS हे डोमेन नाव वेबसाइटच्या IP अ‍ॅड्रेसवर रूपांतरित करते. फेसबुकने केलेल्या बदलांमुळे, DNS सर्व्हर बंद झाला, ज्यामुळे ही समस्या आली.


ती फक्त तांत्रिक चूक होती का?

ही बाब डिजिटल गोपनीयता आणि सायबर सुरक्षिततेशीही जोडली जात आहे. खरं तर, फेसबुक बंद होण्याच्या काही तास आधी, सीबीएस या अमेरिकन चॅनेलवर फ्रान्सिस होगनची मुलाखत प्रसारित झाली.  फ्रान्सिस फेसबुकची माजी कर्मचारी आहे आणि सध्या फेसबुकच्या अंतर्गत चौकशीचे अहवाल व्हिसलब्लोअर म्हणून लीक करते. फ्रान्सिसचा आरोप आहे की, फेसबुक जनतेचे नुकसान करत आहे आणि कठोर उपाय करण्याऐवजी शक्य तितका नफा कमावण्यावर भर देत आहे. तिचे अहवाल वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये 'द फेसबुक फाइल्स' या नावाने गेल्या काही दिवसांपासून प्रकाशित केले जात आहेत.


या मुलाखतीशी फेसबुकचे डाऊनिंग देखील जोडले जात आहे.


फेसबुकचे या विषयावर काय म्हणणे आहे?


फेसबुकने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'फॉल्टी कॉन्फिगरेशन बदलामुळे' ही समस्या उद्भवली आहे. हे कोणत्याही प्रकारचे सायबर हल्ला किंवा हॅकिंगचे प्रकरण नाही.

'डेटा सेंटर्समध्ये नेटवर्क ट्रॅफिकचे समन्वय साधणाऱ्या बॅकबोन राऊटर्समध्ये करण्यात आलेल्या कॉन्फिगरेशन बदलांमुळे सेवा ठप्प झाली होती असे आमच्या इंजिनिअर टीमच्या लक्षात आले आहे. नेटवर्क ट्रॅफिकमध्ये आलेल्या व्यत्ययाचा आमच्या डेटा सेंटरच्या संवाद प्रक्रियेवर परिणाम झाला, ज्यामुळे आमच्या सेवा ठप्प झाल्या,' असे फेसबुकने ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे.

फेसबुक कर्मचाऱ्यांनी मात्र नाव न छापण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले की, अंतर्गत चुकीमुळे सेवा ठप्प झाली होती. इंटरनेट ट्रॅफिक ज्या पद्धतीने सिस्टीमकडे वळवले जाते त्यात झालेल्या चुकीमुळे सेवा ठप्प झाली.


जेव्हा फेसबुकचे सर्व्हर डाऊन होते, तेव्हा कंपनीचे प्रवक्ते अँडी स्टोन ट्विटरवर म्हणाले की, लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लोकांना आमच्या अ‍ॅप्स आणि प्रॉडक्टमध्ये प्रवेश करण्यात अडचण येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत.


मार्क झुकरबर्गने मागितली माफी

मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली हेती. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असे मार्कने म्हटले.


त्यामुळे फेसबुकला किती नुकसान झाले?


फेसबुक डाऊन झाल्यामुळे कंपनीच्या शेअर्सची मोठी पडझड झाली. फेसबुकचे शेअर्स 4.9 टक्क्यांनी घसरले. नोव्हेंबर 2020 नंतर एकाच दिवसातील स्टॉकमधील ही सर्वात मोठी घसरण आहे.  फेसबुकलाही यामुळे रेव्हेन्यूत मोठे नुकसान झाले आहे. डिजिटल जाहिरात व्यवस्थापन फर्म स्टँडर्ड मीडिया इंडेक्सनुसार, डाउनमुळे फेसबुकला दर तासाला 4.06 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र हे नुकसान केवळ जाहिरातीमुळे झाले आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मते, कंपनीला दर तासाला सुमारे 7.50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  याचा परिणाम म्हणजे फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्गला मोठा आर्थिक फटका बसला आहे. झुकेरबर्गची मालमत्ता सुमारे 52 हजार कोटींनी कमी झाली आहे. संपत्तीतील या नुकसानीमुळे झुकेरबर्ग​​​​​​​ ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये चौथ्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर खाली आला आहे. मार्क सध्या मायकोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा एका स्थानाने खाली आहे.  ट्विटर आणि टिकटॉक सारख्या इतर कंपन्यांना फेसबुक बंद झाल्यामुळे फायदा झाला. फेसबुक ठप्प पडले असताना सामान्य दिवसांच्या तुलनेत ट्विटर आणि टिकटॉकवर जास्त ट्राफिक दिसून आली. 


या आधी फेसबुक कधी बंद पडले होते?

6 महिन्यांपूर्वी देखील व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक जगभरात 42 मिनिटे ठप्प पडले होते. रात्री 11.05 वाजता सेवा ठप्प झाली आणि सुमारे 11:47 वाजता सेवा पुर्ववत झाली होती.

24 सप्टेंबर 2010 - 2 तास फेसबुक सर्व्हर बंद पडले होते.

21 ऑक्टोबर 2013 - 4 तास यूजरचे स्टेटस अपडेट होत नव्हते.

1 ऑगस्ट 2014 - 40 मिनिटे फेसबुक ठप्प पडले होते.

27 जानेवारी 2015 - 50 मिनिटे फेसबुकची वेबसाइट आणि अ‍ॅप डाऊन होते.

13 मार्च 2019 - सुमारे 24 तास फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com