Top Post Ad

विधवा महिलेस मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी

  शहापूर  : सासरच्यांकडून विधवेचा विनयभंग आणि मारहाण प्रकरणी वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी चालढकल केल्यामुळेच हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला असून सुदाम शिंदे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

शहापूर तालुक्यातील वासिंद पूर्व स्वामी विवेकानंदनगर येथे राहणाऱ्या संगीता सुहास महाजन या विधवेचा तिचा सासरा, दिर आणि जाऊबाई हे सर्व शारीरिक व मानसिक छळ करत तिला मारहाण करत आहेत. याबाबत संगीताने वासिंद पोलीस ठाण्यात अनेकवेळा तक्रार केली परंतु तिला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याची शंका भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली असून पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी या विधवा महिलेचे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळेच शनिवारी (दि.२८) या विधवा महिलेवर सासरच्या मंडळींनी प्राणघातक हल्ला करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे संगीताच्या नऊ वर्षीय मुलाने भाजपा कार्यकर्त्यांना सांगितले. 

हा प्रकार अतिशय गंभीर असून या प्रकरणी भाजपा पदाधिकारी यांनी पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांची भेट घेतली परंतु त्यांनी उडवा उडावीची उत्तरे दिली. यावरून या प्रकरणातील  सासरा,  दिर  आणि जाऊबाई यांना शिंदे हे पाठीशी घालत असल्याचा संशय भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल होऊन देखील त्यांना अटक न करता, उलट आरोपींना परस्पर कोर्टात हजर राहून जामीन घ्या असे शिंदेंनी सांगितल्याचा आरोप निवेदनात भास्कर जाधव यांनी केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना वेळीच कायद्याची भाषा दाखवली असतीतर हा जीवघेणा हल्ला टळला असता. तसेच सुदाम हे या महिलेचा जीव जाण्याची वाट पहात होते का? असा आरोप देखील जाधव यांनी केला आहे. तसेच सुदाम शिंदे यांच्या विरोधात  नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत त्यामुळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com