महिला बचत गटांसाठी जिल्हा ग्रामीण विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र

    ठाणे   :  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांना आर्थिक, सामाजिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण राबवली जातात. यासाठी उत्तम प्रशिक्षण संकुलाची नेहमीच गरज भासते. ही गरज ओळखत ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पामधून शहापूर येथे प्रशिक्षण केंद्र  उभारले असून नुकतेच प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते केंद्राचे उदघाटन करण्यात आले.  

या प्रशिक्षण केंद्राचा फायदा जवळच्या सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थीना होणार आहे तसेच बचतगटासंदर्भातील सर्व प्रशिक्षणाचे आयोजन येथे होणार असल्याने महिलांना आणि विविध केडरला याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. शासकीय, निमशासकीय आस्थापनांची विविध प्रशिक्षणासाठी देखील हे केंद्र खुले असणार आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या निगराणीची जबाबदारी स्वप्नपूर्ती लोक संचालित साधन केंद्र धसई  या प्रभागसंघाला देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रभाग संघातील महिलाना शाश्वत आर्थिक स्रोत उपलब्ध झाला आहे. 

महिलांनी या वास्तूची  उत्तम देखभाल करून जास्तीत जास्त प्रशिक्षण शिबीरे या संकुलात कशी होतील यासाठी विशेष प्रयत्न करावेत  असे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे  यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई वेखंडे, विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी मंगेश सूर्यवंशी,जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले , अमित सय्यद, तालुका व्यवस्थापक शहापूर बाबासाहेब सावंत, उपजीविका सल्लागार  हृद्देश गायकर, ब्लॉक कॉर्डिनेटर गणपत लोंढे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते यांनी केले.

महिला सक्षमीकरणांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत ठाणे जिल्हयातील अंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुक्यात इंनटेनसिव पध्दतीने 2017 पासून योजना सुरु आहे. तसेच भिवंडी व शहापूर या तालुक्यात माविम मार्फत 2016 पासून इंनटेनसिव पध्दतीने योजना सुरु आहे. या अभियानातून महिलेच्या घरातील प्राथमिक गरजा तसेच आरोग्य, शिक्षण व व्यवसाय करण्यासाठी विविध प्रकारचे निधी उपलब्ध करुन दिले जाते. तसेच, बँक लिंकेज मार्फत पतपुरवठा निधी उपलब्ध करुन दिला जातो. ग्रामीण भागातील महिलेचे सक्षमीकरण करण्यासाठी ग्रामीण महिलांना एकत्र आणून त्यांच्या संस्था उभारणे , सदर संस्थेचे क्षमतावृध्दी व कौशल्यवृध्दी करणे आणि शाश्वत उपजिवीकेची साधने उपलब्ध करुन देऊन त्यांचे सामाजिक व आर्थिक समावेशन केले जाते.

ठाणे जिल्हयामध्ये एकूण 10,413 स्वयंसहायता समूह,असुन एकुण 1,14,715 महिला सहभागी आहेत तसेच 815 ग्रामसंघ व 32 प्रभागसंघ आहेत.  जिल्ह्यात गटातील महिलांचे विविध उपजीविके अंतर्गत व्यवसाय सुरु आहेत. भाजीपाला लागवड,मत्स्य शेती,मत्स्य जाळी बनविणे, समूह शेती,फुल शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, खाद्य व्यवसाय,विकेल ते पिकेल, घरकुल मार्ट, लोणचे-पापड  बनविणे, अवजार बँक चालविणे,घरकुल मारट,किराणा दुकान चालविणे,गणपती बनविणे,मातीच्या वस्तू बनविणे, बांबूपासून विविध वस्तू बनविणे,पुरणपोळी बनविणे,कापडी पिशव्या बनविणे, टेलरिंग व्यवसाय,बाटिक प्रिटींग करणे अश्या विविध प्रकारच्या व्यवसाय करण्यात महिला सक्षम झाल्या आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील पुरणपोळी व बाटिक पेटिंग करणाऱ्या महिलांचा गट व्यवसायासाठी परदेशात जावून आल्या आहेत.  अश्या प्रकारे  अभियानामुळे ग्रामीण भागातील महिला सशक्त होऊन तिचे व तिच्या कुटुंबाचे सामाजिक आणि आर्थिक समावेशन झाले आहे.  --

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या