ठाण्यातील राबोडी येथील खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सुचना देवून तसेच इमारत धोकादायक घोषित करून देखील रहिवाशांनी दुर्लक्ष केल्याने दुर्दैवाने आजची घटना घडल्याचा खुलासा ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. राबोडी येथील खत्री इमारत धोकादायक म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली आहे. सदरच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सुचना देवून देखील त्यांनी इमारत खाली केली नव्हती. याबाबत महापालिकेच्यावतीने इमारत दुरुस्तीची नोटीस बजावून, त्याचे स्मरणपत्र देण्यात आहे. परंतु रहिवाशांनी प्रतिसाद न दिल्याने दुर्दैवाने आजची घटना घडली आहे. घटनेनंतर तात्काळ ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार, उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी पथकाच्या माध्यमातून सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करत इमारत पुर्णपणे खाली करुन सील करण्यात आली आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे व महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील राबोडी येथील खत्री अपार्टमेंट या इमारतीच्या सी-विंग च्या तिसऱ्या मजल्याचे फ्लोरिंग, दुसऱ्या व पहिल्या मजल्याचे स्लॅब कोसळून आज पहाटे ६:०० च्या दरम्यान घडलेल्या दुर्घटनेमध्ये २ (दोन) व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. खत्री अपार्टमेंट या इमारतीची सन २०१३ साली पाहणी करून सदर इमारतीस धोकादायक इमारत म्हणून घोषित करुन महाराष्ट्र महापालिका अधिनियमचे कलम २६४ (१) (२) (३) (४) अन्वये धोकादायक इमारत म्हणून नोटिस बजावण्यात आली होती. सदर नोटिसच्या विहित मुदतीनंतरही भोगवटधारकांनी इमारत रिक्त न केल्याने कलम २६८ (सी-१) अन्वये संबंधितांना नोटिस बजावण्यात आली होती. त्यानंतरही संबंधितांनी इमारत रिक्त न केल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम २६८(५) अन्वये राबोडी पोलिस स्थानक यांना इमारत रिक्त करून देणेबाबत पालिकेकडून पत्र देण्यात आले होते.
या इमारतीस ठाणे महापालिकेने पुरविलेल्या सर्व सेवा खंडित करण्याबाबत कार्यकारी अभियंता, (पाणी पुरवठा) कार्यकारी अभियंता, (विद्युत) कार्यकारी अभियंता, (ड्रेनेज) यांना पत्र देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत संबंधितांना पत्र देण्यात आले होते. तसेच ही इमारत सी – २ – बी या वर्गवारीत असल्याचा अहवाल महापालिकेच्या तालिकेवरील स्ट्रक्चरल ऑडिटर मे.सेंटरटेक यांनी सादर केलेला असून, त्यामध्ये ही इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर या इमारतीच्या भोगवटधारकांना आजतागायत तीन वेळा इमारतीच्या दुरुस्तीबाबत स्मरणपत्र देण्यात आली होती. त्यामध्ये इमारत तातडीने रिक्त करून दुरुस्त करावी तसे न केल्यास काही जीवित व वित्त हानी झाल्यास झालेल्या दुर्घटनेस महापालिका जबाबदार राहणार नाही,असेही पालिकेकडून नमूद करण्यात आलेले होते.
दरम्यान, इमारतीची काही अंशी दुरुस्ती करण्यात आली. इमारतीचे ८५ टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, उरलेले १५ टक्के काम तातडीने दुरुस्त करा, तसे न केल्यास काही दुर्घटना घडल्यास त्यास ठाणे महानगरपालिका जबाबदार नाही असेही पत्र मे. सेंटरटेक यांनी संबंधितांना दिलेले होते. मात्र त्यालाही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. सदरची इमारत पुर्ण रिकामी करुन काम करण्यात आले नसल्याने आज दुर्दैवाने दुर्घटना घडली आहे.
0 टिप्पण्या