Top Post Ad

आंबेडकरी समाजाच्या वस्त्या या जाणीवपूर्वक "Ghettos" बनवून ठेवलेल्या आहेत काय?...एक शोध"

अन्न, वस्त्र आणि निवारा हे मुद्दे आपल्या चळवळीचे मुद्दे कधीच बनले नाहीत हा इतिहास आहे. तथापि, निवारा, निवास, घर हा चळवळीचा मुद्दा बनतोय ही चांगली गोष्ट आहे. तसे पाहिले तर मुंबईतील तमाम आंबेडकरी समाजाच्या वसाहती अशाच अखंड वादात अडकुन पर्याय रहित, विकास विरहीत, गलिच्छ, भकास असे "Ghettos" म्हणजे 'एकाच वंशाच्या, धर्माच्या वगैरे अनेक लोकांची गरीब वस्ती असलेला शहराचा एक भाग' बनुन राहीलेल्या आहेत. दुसऱ्या अर्थाने, 'आर्थिक बिकट परिस्थिती अथवा सामाजिक दबाव यामुळे प्रामुख्याने एकाच जातीच्या, वंशाच्या किंवा अल्पसंख्याक गटातील समाज समुहाचा दाट लोकवस्ती असलेल्या शहराचा एक भाग बनलेल्या आहेत. तिसऱ्या अर्थाने, 'घेटो हा शहराचा असा एक भाग की ज्यात अनेक गरीब लोक किंवा विशिष्ट वंश, धर्म किंवा राष्ट्रीयत्व असलेले बरेच लोक इतर प्रत्येका पासून वेगळे राहतात. चवथ्या अर्थाने, 'घेट्टो ही अशी जागा आहे जिथे विशिष्ट जाती, धर्म, वंशाच्या लोकांचे गट जबरदस्तीने इतरांपासून वेगळे केले जातात. पाचव्या अर्थाने, अधिक स्पष्ट करायचं म्हटलं तर, 'देशाच्या, राज्याच्या, शहराच्या, गावाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक, आरोग्य अशा मुख्य प्रवाहापासून कोसो दूर, अलग थलग केलेल्या वंचित, उपेक्षित आणि नाकारलेल्या व्यक्तींचा रहिवास असलेल्या शहराच्या कोप-यातील दाट वस्तीचा एक दुर्लक्षित भाग.
"वर्तमान परिस्थितीत मुंबई तथा देशातील, राज्यातील आंबेडकरी समाजाच्या वस्त्या या जाणीवपूर्वक "Ghettos" बनवून ठेवलेल्या आहेत तथा किळसवाणे तथाकथित राजकारण तथा व्होट बॅंकेचा अड्डा बनवून ठेवलेल्या आहेत शोकांतिका ही आहे की, हे षडयंत्र बुद्धिमान म्हणून ओळख असलेल्या आंबेडकरी समाजाच्या अजूनही ध्यानात येतं नाही. सभोवताली वेगाने होत चाललेल्या शहरी निवास विकासाच्या प्रक्रियेत आंबेडकरी वस्त्यांचा सहभाग अगदी नगण्य अथवा शुन्य म्हणावा असाच आहे. साठ पन्नास वर्षांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादाने अस्तित्वात आलेल्या या वस्त्या या वर्षागणिक बकाल, भकास होत गेलेल्या आहेत. विस्तारणा-या वाढत्या कुटुंबांतील येथील लोकांना वसई, विरार, नालासोपारा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, तथा बदलापूर या ठिकाणी न परवडणारी घरं विकत घेऊन किंवा न परवडणारे भाडे देऊन रहाण्यास मजबूर झाला आहे.

आंबेडकरी चळवळीतील आमचे जुने जाणते, खुप जेष्ठ कार्यकर्ते आयुष्यमान प्रा.एम. जी. शिरसाठ ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला एक अपुर्व असा प्रसंग सांगितला तो असा. "डॉ बाबासाहेब आंबेडकर तेंव्हा 1950 च्या दशकांमध्ये केंद्रीय मंत्री होते त्यावेळी त्यांचेवर मंत्रांच्या गैरहजेरीत त्यांच्या मंत्रालयांची जबाबदारीही वरचेवर टाकली जायची, रेल्वे तथा संरक्षण मंत्रालय याचीही जबाबदारी अशीच त्यांचेवर संभवतः असताना एकदा ते "कुर्ला" रेल्वे स्थानकावर अचानक अवतरले सुरक्षारक्षक तथा कार्यकर्त्यांच्या ताफ्यात ते कुर्ला स्टेशनच्या पुर्वेला आले. त्यावेळी कुर्ला हे गाव होते, त्याच्या आजूबाजूचा परिसर खाड्या, खाचरं, मिठागरांनी व्यापलेला होता. त्यांनी आपला हात डोळ्यांच्यावर धरुन तो समोरचा परिसर एकदा न्याहाळला आणि आपले बोट उत्तरेकडून दक्षिणेकडे दिशानिर्देश करत सोबत आलेल्या सचिवाला इंग्रजीमध्ये काही ऑर्डर्स लिहून घ्यायला सांगितल्या. कुर्ला पुर्वचा तो सर्व भु-भाग त्यामध्ये चेंबूर गावाचा पण भु-भाग समाविष्ट होता, तो सर्व अनुसूचित जाती जमाती,भटके विमुक्त या लोकांच्या रहिवासाकरीता आरक्षित करण्याच्या त्या ऑर्डर्स बाबासाहेबांनी त्यावेळी सचिवाला दिल्या होत्या.

त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार खेडी सोडून आलेल्या तत्कालीन आंबेडकरी समाजाच्या लोकांनी या परिसरात आपआपल्या झोपड्यावजा वसाहती मोठ्या संख्येने उभ्या केल्या. नेहरु नगर, कामगार नगर, शिवसृष्टी, राजा मिलिंद नगर, वसंतराव नाईक नगर, सुमन नगर, वत्सलाबाई नाईक नगर, भटके विमुक्त विमोचित समाज नगर, ठक्कर बाप्पा नगर, सहकार नगर, राजा प्रियदर्शी सम्राट अशोक नगर, श्रमजीवी नगर, यशवंत नगर, प्रगती को.ऑप.सोसायटी, कापुस माथाडी कामगार नगर, सुस्वागतम नगर, चंद्रोदय सोसायटी, लाल डोंगर वसाहत, आनंद नगर को.ऑप.हौ.सोसायटी, कुंभारवाडा सोसायटी, पी.एल.लोखंडे मार्गावरील वसाहत, सुभाष नगर येथील खाचर, भाई भाई नगर आणि अशा वसाहती मधीलच एक जुनी व प्रसिध्द वसाहत म्हणजे सिद्धार्थ कॉलनी होय! त्यावेळी त्या दाट गर्दीत उभ्या असलेल्या पोरसवदा वयाच्या एम. जी. शिरसाठ यांनी प्रत्यक्ष पाहिलेला हा बोलका प्रसंग आपणांस या आंबेडकरी वसाहतींच्या गतकाळात लुप्त झालेल्या इतिहासाबाबत बरच काही सांगून जातो व प्रकाशझोत टाकतो.

'खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत, ‘खेडापाड्यातून रहाणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही.

पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात, 'खेड्यात रहाणाऱ्या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे? खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा'. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही.

स्वातंत्र्याला जशी 60 वर्षे झाली तशीच 'खेडी सोडून शहराकडे चला' या आदेशाला ही 60 वर्षं झाली पण दुर्दैवाने आजही आमच्या निवारा, निवास, रहिवास या कोणत्याही कायम सुविधांचा आंबेडकरी समाजाला स्पर्श झालेला नाही. आंबेडकरी समाजाच्या वसाहतींचे आजचे एकुण स्वरुप पाहिले तर ते हिटलरच्या काळातील नाझी जर्मनीतील "ज्यु" लोकांच्या वसाहतीसारखे नाही असे म्हणण्याचे धाडस समाजातील नेते, कार्यकर्ते, कार्यसम्राट, धुरीण करु शकतील काय?
गेल्या ५० वर्षांत दोनच जातींनी खेडी सोडली. एक बाबासाहेबांच्या आदेशानुसार बौद्ध समाजाने व दुसरे म.गांधीच्या हत्येनंतर ब्राह्मण समाजाने! पण आज 2021 च्या वर्तमान काळात काही अपवादात्मक गोष्टी वगळता ब्राह्मण समाज आज कोठे उभा आहे आणि आंबेडकरी समाज कोठे उभा आहे याची तुलनात्मक कारणमीमांसा एकदाची व्हायला हवी!!! जेणेकरून आंबेडकरी समाजाला ब्राम्हण समाजाच्या उत्कर्षाची व स्वतःच्या अपकर्षाची कठोर, कटु उत्तरे आपोआपच मिळुन जातील...!!!"
जय भीम, नमो बुद्धाय!

संकलन - नागार्जुन नागसेन
दिनांक - 12/08/2021, गुरुवार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com