ज्या बांधकामांच्या ठिकाणी सुचना फलक नसतील ते बांधकाम अनधिकृत

    नागरिकांनी सदनिका खरेदीचा व्यवहार करताना विकासकाने ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्याची खातरजमा करूनच सदनिका खरेदी कराव्यात, शहरातील अनधिकृत इमारतींमध्ये सदनिका व्यवहार न करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील काही विकासक नियमबाह्य अथवा आवश्यक त्या परवानग्या प्राप्त न करून घेता, बांधकाम करीत असतात. अशा अनधिकृत इमारतींमध्ये नागरिक सदनिका खरेदी करण्याचे व्यवहार करतात. अनधिकृत इमारतीमध्ये सदनिका खरेदी केल्यास व अशा बांधकामांवर ठाणे महापालिकेने कारवाई केल्यास त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीस ठाणे महापालिका जबाबदार राहणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी., असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

परंतु ठाणे महापालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर अशा बांधकामांवर ठाणे महापालिकेकडून निष्कासनाची कारवाई केली जाते. त्यामध्ये सामान्य नागरीक जे अशा अनधिकृत बांधकामामध्ये सदनिका खरेदी करतात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होवून त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत इमारतीमध्ये सदनिका खरेदी करू नयेत. सदनिका खरेदीचा व्यवहार करताना विकासकाने ठाणे महापालिकेकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत का? याबाबत ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाशी संपर्क साधून खातरजमा करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी विकासक, बांधकामाविषयी माहिती मागितल्यास ती देण्यात येईल. तशा सुचनाच सर्व प्रभाग समित्यांमधील अधिकाऱ्यांना देण्यात येतील असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.


जिथे जिथे नवीन बांधकामे सुरू आहेत तेथे सर्व सुचनांचा बोर्ड लावण्याची सक्ती विकासकांना करणार आहे. या सुचना फलकावर पालिकेच्या आवश्यक परवानग्यांची क्रमांकांनुसार नोंदवणे बंधकनकारक करण्यात येणार आहे. ज्या बांधकामांच्या ठिकाणी असे सुचना फलक नसतील ते बांधकाम अनधिकृत आहेत असे गृहित धरून व्यवहार टाळावा असे आवाहन अतिक्रम विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या