वंदना कटारिया..... हमे माफ करना

    राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी असं जाहिर करताच सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आलं. तसं ते नेहमीच येतं.ट्वीटर, व्हॉट्अॅप आणि फेसबूक विद्यापीठं सुरु झाल्यापासून या चर्चा जगजाहिर झाल्या. मात्र त्यांना जगजाहीर होऊ नये म्हणून मग त्यावर विद्यमान सरकारने बंधनं घातली. त्यांना सिमीत केलं. ध्यानचंद यांचा दरारा अगदी हिटलरनेही अनुभवला होता. हिटलरला नकार देण्यारा हा खेळाडू आजही भारतरत्न पुरस्कारापासून वंचित राहिला. याबाबत मात्र प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं.  ज्यानी व्यावसायिक खेळ करून अमाप पैसा कमावला त्यांना भारतरत्नने सन्मानित केलं जातं. खरं तर त्याचवेळेपासून लोकांना ही जातीयतेची किड समजू लागली होती. भारतात या किड्याने थैमान घातलं आहे. मागच्या वेळेस हिमा दास ही मैदान गाजवत होती तर इकडे हे किडे तिची जात शोधण्यात मग्न होते. हे जातीयवादी किडे काल ही होते आणि आजही आहेत.  आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या बहुजनांनी उच्च पदे प्राप्त केली तरीही यांच्या पोटात दुखते आणि बिना आरक्षणाने खेळाचे मैदान गाजवून स्वत:ला सिद्ध केले तरी यांच्या पोटात दुखते. याची कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.   

पण हॉकीपटू वंदना कटारिया बाबत नुकताच झालेला प्रकार म्हणजे जातीयतेची मानसिकता असलेल्या किड्यांनी कळसच गाठला म्हणायला हवा. वंदना कटारियाने हॉकीमध्ये शानदार कामगिरी केली तर लगेच इथले किडे तीची जात शोधायला गुगलवर धावले. तिकडे ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू प्रचंड परिश्रम करून मेडलच्या मागे धावत होते तर इकडे हे किडे त्यांची जात शोधण्यात गर्क होते. इतकेच नव्हे तर या स्वत:ला भारतीय म्हणवून घेण्राया किड्यांनी महिलासंघ हॉकी हरला म्हणून वंदना कटारियाच्या घरासमोर फटाके वाजवले. ही कुठली देशभक्ती. देशभक्तीची व्याख्या करणारे राजकारणी किंवा विचारवतांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. किंवा या देशद्रोह्यांच्या विरोधात सोशल मिडीयाही गाजवला नाही.    

 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या पराभवानंतर जातीवादी गुंडांनी फटाके फोडले आणि शर्ट काढले आणि वंदना कटारिया यांच्या घराबाहेर नाचले आणि जातीय शिव्या फेकल्या! खेळात नेहमी हार -जीत घडते, विश्वकप स्पर्धेत सचिन तेंडूलकर एका रनने आऊट झाल्यानंतर असा प्रकार कोणी केल्याचे ऐकीवात नाही.  पण हे वंदना कटारियाच्या बाबतीत घडले कारण ती बहुजन खेळाडू आहे!  भारतासाठी एकंदरीत सर्वाधिक धावा करण्राया वंदना कटारिया आणि गुरजीत कौर यांचे अभिनंदन. दोघांनी प्रत्येकी 4 गोल केले. राष्ट्राला तुमचा अभिमान आहे. मात्र सोशल मीडियाच्या या युगातही बहुजन खेळाडूंसोबत असे प्रकार घडत आहेत, तर फक्त कल्पना करा की 25 वर्षांपूर्वी विनोद कांबळीला कशाला सामोरे जावे लागले नसेल? आजही कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजीचा विक्रमवीर म्हणून विनोद कांबळी यांचे नाव आहे. वंदना कटारिया अजूनही सोशल मीडियाच्या युगात आहेत. विनोद कांबळीच्या वेळी तर कोणीच बोलायला नव्हते.मग तो कसा स्वत:चा फॉर्म टिकवून ठेवणार? एक वाईट फॉर्म आणि जीवनासाठी बाहेर अशी त्याची अवस्था झाली.   

1993 मध्ये धमाकेदार कारकीर्द सुरू करण्राया कांबळीने पहिल्या सात कसोटी सामन्यात 2 द्विशतके ठोकली, पण त्याची कसोटी कारकीर्द दोन वर्षातच संपली! सचिन आणि कांबळी दोघांनी मिळून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि दोघेही उत्कृष्ट खेळाडू होते, पण एक दलित खेळाडू पुढे जाताना पाहून मनुवादीचे पोट दुखू लागले, आणि त्याला कायमचे बाद केले, मात्र विश्वकप स्पर्धेत एक रान काढणारा सचिन देशासाठी 24 वर्षे खेळला, पण कांबळी काही दिवसातच गायब झाला, कारण कांबळीची कारकीर्द संपवण्यासाठी तो शिस्तबद्ध नसल्याचा आरोप जातिवादी करत राहिले! सर्वात यशस्वी फलंदाजांसोबत असा प्रकार घडला.. जर आकडेवारी पाहिली तर असे निदर्शनास येते की, जातीवादाने एका महान खेळाडूची कारकीर्द उध्वस्त केली होती. विनोद कांबळीच्या काळात सुद्धा सोशल मीडिया असता तर त्यांची कारकीर्द कदाचित टिकण्यास मदत मिळाली असती.   

त्यानंतर आपल्यासमोर मोठ्ठ उदाहरण आहे ते अगदी अलिकडचं प्रणव धनवडेचं. ज्याने 15 व्या वर्षातच 327 बॉलमध्ये 1009 धावा ठोकल्या. एका अॅटो रिक्षाचालकाचा मुलगा त्यातही बहुजन वर्गातला असल्याने अन्डर-16 मध्ये त्याची निवडच झाली नाही. मात्र आपल्या वडिलाचं वलंय असलेल्या अर्जुन तेंडूलकरला सहजतेने संघात प्रवेश मिळतो. इथे तुमच्या गुणवत्तेला काडीचीही किंमत नाही तर तुमच्या जातीचाच मान-सन्मान केला जात आहे. हे जातीवादी किडे दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत आहेत. भारतातील प्रत्येक क्षेत्रात यांचा शिरकाव आहे. त्याचा परिणाम मागील अनेक काळापासून भारत देशाला भोगावा लागत आहे.  भारत हे प्रतिभा आणि गुणवत्तेचे स्मशान बनले आहे. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पधेत चीनने 51 पदकं जिंकली आहेत. ज्यामध्ये 24 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. कारण तीथे गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. इथली तथाकथीत  स्वत:ला उच्च समजणारी मंडळीना याबाबत काही देणे-घेणे नाही. देश हरला तरी चालेल पण जात जिंकली पाहिजे. वंदना कटारीयाच्या घरासमोर झालेल्या प्रकारानंतर हे प्रकर्षाने सिद्ध होते.  

जातीच्या संसर्गजन्य रोगानं  लोकांचा मेंदू नासलाय   
हजारो वर्षांपासून या देशात  लोकांनी हा रोग पोसलाय.   
काही विकृतांना जातीधर्मापेक्षा  देश मोठा वाटतंच नाही   
इथे मराठा ब्राह्मण भेटतील पण भारतीय कुणी भेटतंच नाही.
तरीही मेरा भारत महान आहे. म्हणूनच वंदना कटारिया तु आम्हाला माफ कर ! 


--- सुबोध शाक्यरत्न 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA