कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता सिडकोची १५ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी

 नवी मुंबई – गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी अनेक समाज घटकांनी आपले योगदान दिले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतही डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनी प्रसंगी जीवावर उदार होऊन सेवा बजावली आहे. त्यांच्या या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार, कोविड योद्धे व गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील कोविड योद्धे व गणवेषधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या पाच नोड्समध्ये ४,४८८ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सन २०२०च्या प्रारंभी संपूर्ण जगावर कोरोना (कोविड-19) महासाथीचे संकट कोसळले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने बहुतांशी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. परंतु अशा बिकट परिस्थितीतीतही डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी हे कोविड योद्धे बनून, आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाप्रतीचे कर्तव्य अव्याहतपणे पार पाडत राहिले. या कोविड योद्ध्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य प्राणहानी टळली, तसेच अत्यावश्यक सेवांचा नागरिकांना अविरतपणे पुरवठा होत राहिला. या कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या माध्यमातून ही योजना आणली आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या पाच नोड्समध्ये ४,४८८ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी १,०८८ घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (ईडब्लूएस) आणि उर्वरित ३,४०० घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच, वैधानिक तरतुदींनुसार काही घरे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत. योजनेशी संबंधित सविस्तर माहिती जसे, घरांचा तपशील, विविध प्रवर्गांकरिता राखीव घरे, अनामत रक्कम, योजनेचे वेळापत्रक इ. https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेमध्ये (Scheme Booklet) नमूद आहे. तरी अर्जदारांनी या पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. राज्यातील अधिकाधिक कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांनी या गृहनिर्माण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या २९ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ महासाथीच्या काळात रुग्ण सर्वेक्षण, रुग्णांचा माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व सहाय्यता उपक्रमांशी संबंधित शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारी, कोविडसंबंधी कर्तव्यावर असणारे आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारी (जिल्हा प्रशासन, पोलिस, होम गार्ड, अंगणवाडी सेविका, वित्त व कोषागार, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे नेमून दिलेले विविध विभागांचे कर्मचारी इ.), तसेच कोविडसंबंधी कर्तव्यावर असणारे कंत्राटी/बाह्यकंत्राटी/रोजंदारी/तदर्थ/मानधन तत्त्वावरील कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याकरिता, या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांकडे सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे. 

कोव्हिड योद्ध्यांनी दिलेल्या लढ्याचा आम्हाला अभिमान आहे. कोव्हिड योद्ध्यांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबांचे योगदानही महत्त्वाचे आहे. कोव्हिड योद्धे आपल्या समाजाचे वर्तमान सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत, त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने ही विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे, असे सिडकोचे उपाध्यक्ष व महाव्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA