Top Post Ad

विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा, एसएफआयचे राज्यभरात आंदोलन

   मुंबई : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या वतीने गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी विविध शैक्षणिक मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा. कोविडचे नियम पाळून सर्व शैक्षणिक संस्था सुरु करा आणि इतर महत्त्वाच्या शैक्षणिक मागण्यांसाठी एसएफआयने हे आंदोलन केले. आज राज्यभरात अनेक जिल्ह्यांत हे आंदोलन झाले. काही जिल्ह्यांत प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून एसएफआयने शैक्षणिक मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला पाठविले आहे.

१२ ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस आहे. याच दिवशी १९३६ साली भारतातील पहिल्या संघटीत विद्यार्थी चळवळीची सुरुवात झाली होती. तिने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका निभावली. स्वातंत्र्यानंतर बदललेल्या परिस्थितीत सार्वजनिक शिक्षण वाचविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर तिने कार्य केले. ते आजतागायत सुरु आहे. एसएफआय त्याच आंदोलनाचा एक भाग आहे. या महत्त्वपूर्ण १२ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी देशभरात आणि राज्यभरात रस्त्यावर उतरले.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून राज्यातील सर्वच जनता त्रस्त आहे. या महामारीचा अत्यंत वाईट असा परिणाम शिक्षण क्षेत्राला भोगावे लागले; अद्यापही भोगावे लागत आहे. मागील वर्षी सर्व विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरमध्ये सवलत देऊन पास करण्यात आले. परंतु पुढील वर्षात त्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. म्हणजेच विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. महामारीत पर्याय म्हणून ऑनलाईन शिकवणी वर्ग चालू करण्यात आले. परंतु त्यात सर्वच विद्यार्थी सामावून घेतले गेले नाहीत. नेटवर्क समस्या, ग्रामीण-दुर्गम भागातील मुलभूत सोई-सुविधांचा अभाव, मोबाईल खरेदी व रिचार्जसाठी पालकांकडे पैसे नसणे, विद्यार्थ्याची स्क्रीनसमोर बसण्याची मर्यादा आदी प्रकारचे अडथळे समोर आले. त्यमध्ये राज्य सरकारकडून कोणतेही प्रभावी असे कार्य झालेले नाही. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात सामावून घेणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार ते करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. म्हणून या आंदोलनातून राज्यभरात एसएफआयने अशा सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.

एसएफआयच्या वतीने आज १२ ऑगस्ट रोजी राज्यभरातील विविध जिल्ह्यांत कोविडचे नियम पाळत आंदोलन, निदर्शने, प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून आंदोलन केले आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबई विद्यापीठ, कलिना परिसर येथे करण्यात आले. तसेच राज्यात बीड, नांदेड, सोलापूर, जालना, बुलढाणा, नागपूर यांसह इतर जिल्ह्यांत एसएफआयने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले.

या आंदोलनातून एसएफआयने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत : (१) मागील व चालू वर्षाचे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा. (२) कोविडचे नियम पाळून सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्था सुरु करून विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध करा. डिजिटल विभाजन थांबवा. (३) मुंबई विद्यापीठाचा आकस्मिक निधी इतरत्र खर्च न करता शैक्षणिक कार्यासाठी खर्च करावा. (४) विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती, फेलोशीप, स्वाधार योजनेची रक्कम त्वरित वितरीत करा.  (५) १०/१२वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रवेशाची व्यवस्था करा. (६) एमपीएससीच्या रखडलेल्या नियुक्त्या व भरती प्रकिया त्वरित पूर्ण करा. सरकारी विभागातील सर्व नोकरभरती एमपीएससी मार्फत करा. (७) दिल्लीत ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून ठार मारले गेले, या घटनेचा एसएफआय तीव्र निषेध करते आणि महिला अत्याचार प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी करते. 

राज्यात ही अनेक महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अशा घटनांना कायमचा आळा घालण्यात यावा. (८) विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने करा. (९) ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांसाठी घोषित वसतिगृहे त्वरित सुरु करा. (१०) राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया त्वरित राबवा. (११) नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवर कठोर कारवाई करा. (१२) आरोग्य विभागातील पदांसाठी २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना यावेळी विना-शुल्क अर्ज करण्याची संधी द्या. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या दिवशी परीक्षांचे आयोजन करा. (१३) महाज्योती संस्थेकडून संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणाऱ्या फेलोशीपमध्ये वाढ करा. तसेच फेलोशीप विद्यार्थी कोटा वाढवा. (१४) विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी ग्रामीण भागात बससेवा सुरु करा.

मुंबई विद्यापीठासमोर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व एसएफआय राज्य उपाध्यक्ष कविता वरे, राज्य कमिटी सदस्य विमलेश राजभर यांनी केले तर यावेळी विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यायात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व एसएफआयचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष अनिल मिसाळ, राज्य सहसचिव सुहास झोडगे, मल्लेशम कारमपुरी, राज्य सचिवमंडळ सदस्य लहू खारगे, राज्य कमिटी सदस्य संतोष जाधव, अमित हाटवर, राहुल जाधव, ओम मुंडाले, अजित पंडित, प्रफुल कऊडकर, आदींनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com