रेल्वे पास मदत कक्षाकरिता मनुष्यबळ वाढविण्याचे आयुक्तांचे निर्देश


ठाणे : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करता यावा यासाठी ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या चार रेल्वे स्थानकांवर ठाणे महापालिकेच्यावतीने आज पासून सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षाला महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देवून पडताळणी प्रक्रियेची पाहणी करून आढावा घेतला. आणि नागरिकांना जलद गतीने रेल्वे पास मिळण्यासाठी तात्काळ मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  यावेळी अतिरिक्त आयुक्त ( २) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी, सहाय्यक आयुक्त अलका खैरे, सागर साळुंखे तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या चारही रेल्वे स्थानकावरील सर्व पडताळणी प्रक्रियेची पाहणी करून आढावा घेण्यात आला.

        ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांच्या लसीकरण प्रमाणपत्राची तसेच ओळखपत्राची ऑफलाईन पडताळणी करुन त्या आधारे त्यांना मासिक पास रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या चार रेल्वेस्थानकावर मदत कक्ष सुरु करण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेच्यावतीने या मदत कक्षात सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा दोन सत्रांमध्ये ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मदत कक्षावरील कर्मचाऱ्यांकडून संबंधित नागरिकांच्या कोविड लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राची वैधता कोविन ऍपवर तपासून छायाचित्र ओळखपत्र पुराव्याची देखील पडताळणी करण्यात येत आहे. या पडताळणीमध्ये कागदपत्रे वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येत आहे. सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येत आहे.  मदत कक्षाच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन देखील महापालिका आयुक्त डॉ.‍ विपीन शर्मा यांनी केले आहे.

दरम्यान ठाणे महापालिकेच्यावतीने ठाणे रेल्वेस्थानकावर सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षाच्या पडताळणी प्रक्रियेची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करून कळवा - मुंब्रा - दिवा असा लोकल प्रवास केला. यामध्ये प्रत्येक स्थानकांवर सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षाला भेट देवून स्वतः कागदपत्रे पडताळणीची खात्री केली. या प्रवासा दरम्यान त्यांनी रेल्वे प्रवाशांसोबत संवाद साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या