अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल

 शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे निष्कासीत
महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

   ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत असून आज ७ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३९७ (क) (१) ख, अन्वये सुनील सखाराम वहाळ, राम सुरेश मौर्या, गुड्डू पटवा आणि जनार्दन बेडेकर यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.  

आज झालेल्या कारवाईतंर्गत माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती येथील स्मशानभूमी समोरील ३ आरसीसी वाढीव अनधिकृत बांधकामे व नौपाडा- कोपरी प्रभाग समितीमधील कोपरी गाव येथील १ वाढीव अनधिकृत बांधकाम महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत जमीनदोस्त करण्यात आली. तसेच दिवा प्रभाग समिती येथील बेडेकर नगर येथील १ वाढीव आरसीसी बांधकाम व कॉलम तोडण्यात आले असून कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव व घोलाई नगर येथील प्रत्येकी १ अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. सदर अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर, नौपाडा कोपरी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.  
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या