घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केली पाहणी
ठाणे- शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेकरिता मौजे डायघर येथे प्रकल्प उभारणीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु सदरचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होई पर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून विकेंद्रित पद्धतीने ५-५ मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प उभारून पहिल्या टप्प्यात १०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणेसाठी प्रशासकीय वित्तीय मान्यता घेवून हिरानंदानी इस्टेट येथे बायोकंपोस्टिंग २० मेट्रिक टन, मेकॅनिकल कंपोस्टिंग १० मेट्रिक टन व बायोमिथेल गॅस ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच ऋतू पार्क येथे १० मेट्रिक टन क्षमतेचा मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. हिरानंदानी इस्टेट आणि ऋतू पार्क येथे उभारण्यात आलेल्या या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळांना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देवून तेथील कार्यप्रणालीची बारकाईने पाहणी केली.
शहरातील विविध ठिकाणांहून दररोज ओला व सुका कचरा ठाणे महापालिकेच्या हिरानंदानी इस्टेट व ऋतू पार्क या दोन प्रकल्पस्थळी आणला जात असून त्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाते. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असून या प्रकल्पांची आज महापालिका आयुक्तानी पाहणी केली. यावेळी उप आयुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर आदी उपस्थित होते. या प्रकल्पस्थळावरील सर्व यंत्रणेची त्या-त्या जागी जाऊन पाहणी करून भविष्यातील प्रकल्पस्थळाच्या नियोजनाविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचऱ्यांचे संकलन, वाहतुक आणि शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट प्रणाली व्यवस्थित राबविली जात असली तरी त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
0 टिप्पण्या