ठाणेः पारसिक डोंगरावरील तीव्र उतारावरील घोलाईनगर परिसरात ठाणे महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, झोपडीदादांमुळे स्वस्त दरामध्ये विकत किंवा भाड्याने मिळणारे घर, वीज, पाणी पुरवठ्याची ग्वाही, पायवाटा आणि रस्ते थेट डोंगराच्या माथ्यापर्यंत पोहचवतात. यामुळे अनेक गरीब कुटुंब या भीषण परिस्थितीमध्येही राहण्यास तयार होतात. आपली व्होटबँक वाढावी याकरिता येथील स्थानिक लोकप्रतिनिधीं झोपडीदादांच्या माध्यमातून दरवर्षी नव्या झोपड्यांची निर्मिती करीत आहे. त्याचा विळखा पारसिकच्या डोंगराच्या माथ्याच्या दिशेने सुरूच असतो. वनविभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष आणि महापालिकेच्या वसुली अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे राजकीय वरदहस्ताने उभ्या राहणाऱ्या या झोपड्यांवर दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या धोक्याची टांगती तलवार नेहमीच असते. यामुळे हजारो कुटुंबे या भयावह परिस्थितीत याच भागामध्ये तग धरून जीवन जगत आहेत. यामध्ये परप्रांतियांचा भरणा अधिक आहे.
झोपड्या बांधून तेथे नागरिकांना घरे भाड्याने देऊन त्यांच्याकडून भरमसाठ भाडी आकारणे, घरे विकून त्यांची फसवणूक करणे, दारूच्या भट्ट्या चालवणे असे बेकायदा व्यवसाय या भागात प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. अनेक गुन्हेगार या भागात आश्रय घेऊन राहत असल्याने गरीब वस्तीच्या नावाखाली अनेक बेकायदा प्रकार या भागात घडत आहेत. पोलिस, वनविभाग आणि महापालिकेकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याने मोठ्या गुन्हेगारी घटनांची शक्यताही नाकारता येत नसल्याचा दावा येथील कळवा-पारसिक नागरिक संघटनेने व्यक्त केला मात्र याकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे. केवळ पावसाळ्यात अशा दुर्घटना घडल्यानंतरच तात्पुरती कारवाई करण्यात येते असा आरोपही संघटनेने केला आहे.
कळवा येथील डोंगराच्या परिसरात अनेक वर्षांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. मात्र, ती वेळीच रोखण्यास सत्ताधारी लोकप्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी अपयशी ठरले. या प्रकारात सामान्य माणसांचा नाहक बळी गेला. त्यामुळे मुंब्रा येथील लकी कम्पाऊंडच्या धर्तीवर जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. तर याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत कळवा घोलाईनगर येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश देसाई यांनी व्यक्त केले. गेल्या दोन वर्षांमध्ये केंद्र, राज्य आणि महापालिकेस २५ ते ३० पत्रे पाठवून याभागातील अतिक्रमणांचा प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे यंत्रणांनी घोलाईनगरमध्ये पाच जणांचा खून केला, असे म्हणावे लागेल. अतिवृष्टीमुळे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत या ठिकाणी पाच जणांचा बळी गेला आहे या पार्श्व्रभूमीवर देसाई यांनी आपले मत व्यक्त केले.

वनविभागाकडून महापालिकेकडे तर महापालिकेकडून वनविभागाकडे केवळ बोटे दाखवण्यात येत असल्याने या भागात एकदाही अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई होऊ शकलेली नाही. परिणामी झोपड्यांचा वेग सातत्याने वाढतच राहिला असून आता या भागातील नागरिकांच्या झोपड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. १९ जुलैच्या घटनेनंतर याभागातील निसर्गावरील अतिक्रमणांचीही मर्यादा संपल्याने भविष्यात अशा घटनांचे संकट कायमच घोंगावत राहण्याची शक्यता या भागातील नागरी संघटनांकडून व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या