दरम्यान . एका वृत्तवाहिनीनं ठाण्यातील पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणारे बार आणि रेस्टॉरंट पहाटे उशिरापर्यंत सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी ठाण्यातील चार वरिष्ठ अधिका-यांवर कारवाई झाली आहे. तसेच या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या 4 अधिकारी-कर्मचा-यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणी ठाणे महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांवर का कारवाई नाही असा सवाल ठाणेकर विचारत आहेत. केवळ आस्थापना सील करून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारीतून सुटका करून घेतली असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे, तर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या 4 अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई झाली असून सब इन्स्पेक्टर बजरंग पाटील, प्रदीपकुमार सर्जिने, कॉन्स्टेबल जोतिबा पाटील आणि सुरेंद्र म्हस्के या चार जणांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र पालिका अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या