Top Post Ad

धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा पालकमंत्र्यांचे आदेश

  घोलाईनगर दुर्घटनेतील मृतांच्या नातलगांना पाच लाख रुपयांची मदत

ठाणे – कळवा येथील घोलाईनगर येथील झोपड्यांवर दरड कोसळून पाचजण मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री शिंदे यांनी जाहीर केली. जखमी झालेल्या रहिवाशांवर महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू असून  शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, उपचारांचा सर्व खर्च शासनाच्या वतीने केला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका दरवर्षी धोकादायक इमारती, तसेच धोकादायक ठिकाणी राहाणाऱ्या रहिवाशांना नोटिस देत असते. परंतु, केवळ नोटिशीवर न थांबता अतिधोकादायक आणि अपघातप्रवण ठिकाणी राहाणाऱ्या रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिले. याप्रसंगी महापौर नरेश म्हस्के, ठामपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.


गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाःकार उडाला असून घोलाईनगर येथे सोमवारी दुपारी झोपडपट्टीवर दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाचजण दगावले. प्रभू यादव, विद्यादेवी यादव, रवी यादव, सिमरन यादव, संध्या यादव अशी मृतांची नावे असून प्रीती यादव (६) आणि आंचल यादव (१७) या दोन बहिणी या दुर्घटनेतून बचावल्या आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच, त्यांच्या उपचारांत कुठलीही कसर ठेवू नका, अशी सूचना रुग्णालय प्रशासनाला केली. 

ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळेच कळवा येथील दुर्घटना घडली आहे. आज दुपारी ही दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, रेस्क्यू वाहन, दोन अॅम्ब्युलन्स, दोन जीप आणि दोन टेम्पो यासह टीम घटनास्थळी दाखल झाली. अजूनही घटनास्थळी मदतकार्य सुरू असून या घटनेनंतर डोंगराला लागून असलेल्या भागांना सतर्क करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com