... तरीही नजिकच्या काळात पाणी टंचाईची टांगती तलवार

ठाणे- आत्तापर्यंत एकूण १७०२ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.  गेल्यावर्षी याच काळात १३०७ मिलीमीटर पाऊस झाला होता. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून ठिकठिकाणी सामान्य रहिवाशांचे हाल होत असले तरी  ज्या ठिकाणी पाऊस पडणं आवश्यक आहे अशा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसल्यामुळे मात्र लोकांच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे. अंदाजित वेळेच्या आधीच दाखल होऊन केवळ हजेरी लावून गायब झालेल्या पावसामुळे मुंबई-ठाण्यासह संपूर्ण राज्यावर जलसंकटाचे सावट आहे. मुंबई-ठाणे परिसरात सध्या जोरदार पाऊस होत असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रांतून मात्र तो बेपत्ता आहे. परिणामी मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. कारण धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आवश्यक असलेला पाऊस न झाल्यामुळे नजिकच्या काळात पाणी टंचाईची टांगती तलवार लटकत आहे. 

ठाण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. आज दिवसभरात काही काळासाठी थांबला असला तरी संध्याकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला असल्याचे चित्र दिसत आहे. काल रात्रभरात १८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल रात्री झालेल्या या तुफान पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. दादोजी कोंडदेव स्टेडियम, कोपरी, खोपट, दिवा, किसननगर, वागळे इस्टेट, मुंब्रा, कळवा, सावरकरनगर, विटावा, उथळसर अशा अनेक ठिकाणी पाणी साचले होते.. नाले तुडुंब वाहत असल्यामुळं नाल्याच्या बाजूला राहणा-या रहिवाशांच्या घरात पाणी जाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. 


काल रात्री साडेनऊ नंतर पावसाला सुरूवात झाली.  साडेनऊ ते साडेदहा या एक तासात साधारणत: १५ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर साडेअकरा ते साडेबारा या वेळेत २१ मिलीमीटर पाऊस झाला. दीड ते अडीच या काळात जवळपास ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अडीच ते साडेतीन या वेळेत २४ मिलीमीटर पाऊस झाला तर साडेतीन ते साडेचार या वेळेत जवळपास ९ मिलीमीटर पाऊस झाला. असा साडेनऊ पासून रात्री साडेचार पर्यंत या काळात १८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर दुपारच्या वेळेस काहीसा शांत झाला असला तरी संध्याकाळपासून पुन्हा सुरु झाला आहे. 

दरम्यान मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ आज सकाळी ९ वाजता भरुन‌‌ वाहू लागला आहे‌ . २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव आज १८ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला आहे. बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या