बांधकाम सुरु असताना या इमारती अनधिकृत नव्हत्या का ? काल्हेर-कशेलीतील नागरिकांचा संतप्त सवाल

 भिवंडीत काल्हेर -- कशेळी येथील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या 
एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत नागरिकांचा वाद


भिवंडी -
 तालुक्यातील नवीन ठाणे म्हणून उदयास येत असलेल्या कशेळी -  काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीए प्रशासनाने अनधिकृत ठरवीत कारवाई सुरू केली आहे .मागील पंधरा दिवसांपासून या भागातील इमारती तोडण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे येथे फ्लॅट खरेदी केलेल्या कुटुंबियांच्या डोक्यावरील छत हिरावले जाणार असल्याने येथील फ्लॅट धारक चिंतेत आहेत. त्या ठिकाणी स्थानिक आमदार शांताराम मोरे ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे हे नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी घटनास्थळी आले असता एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असताना संतप्त जमावाचा एमएमआरडीएचे अधिकारी प्रधान यांच्या सोबत प्रचंड वाद झाला.

          एमएमआरडीए क्षेत्राअंतर्गत भिवंडी तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचा समावेश आहे . काल्हेर - कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या प्रमाणावर निवासी इमारतींचे बांधकाम झालेले आहे.यापैकी बहुतांश इमारती या एमएमआरडीए प्रशासनाने अनधिकृत ठरविल्या आहेत.त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याप्रमाणे  एक १ जूनपासून या ठिकाणी इमारती तोडण्याचे काम सुरू असताना काही इमारतींना अवघ्या २४ तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यात येत आहे.तोडकामाची कारवाई सुरू असताना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना येथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.या ठिकाणी दोनशेहून अधिक इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे.त्यामुळे हजारो कुटुंब या कारवाईमुळे बेघर होणार असून आम्ही मुद्रांक शुल्क भरून बँकेतून कर्ज घेऊन हे फ्लॅट खरेदी केले आहेत त्यावेळी या अनधिकृत इमारती नव्हत्या का ? असा सवाल उपस्थित करीत आम्हाला कोरोनामुळे नाहीतर या इमारती तोडल्याने मरण येणार अशी व्यथा येथील फ्लॅट धारक महिलेने बोलून दाखविली आहे .

          कशेळी - काल्हेर या परिसरात ठाण्यापेक्षा निम्म्या किमतीत फ्लॅट मिळत असल्याने नागरिकांचा ठाणे बाळकुम येथील दोस्ती ग्रुप बिल्डरच्या ५० लाख रुपयांच्या फ्लॅटला ग्राहक मिळत नसल्याने ते ठाणे येथील राजकीय व्यक्तींना हाताशी धरून ही कारवाई फक्त काल्हेर - कशेळी या भागातच करीत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी केला असून एमएमआरडीए अधिकारी येथील विकासकांकडून पैसे उकळत आहेत पैसे न देणाऱ्या बिल्डरांच्या इमारतींवर कारवाई करीत असल्याचा आरोप केला आहे.येथील इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागा एनए झालेल्या खाजगी जागा आहेत त्यांची परवानगी ग्रामपंचायतीने दिली आहे.त्यासाठी मुद्रांक शुल्क भरून त्याची खरेदी नागरीकांनी केली असून त्यासाठी बँकांकडून अनेकांनी कर्ज घेतले आहेत त्यांना देशोधडीला लावण्याचे काम एमएमआरडीए अधिकारी करीत असल्याचे सांगत ही कारवाई थांबली नाही तर यापुढे  आम्ही आत्मदहन आंदोलन करू असा इशारा देवानंद थळे यांनी दिला आहे 

.तर आमदार शांताराम मोरे यांनी सदरची कारवाई एमएमआरडीए कशापोटी करीत असल्याचा आरोप करीत या बाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन येथील फ्लॅट धारकांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडणार असल्याचे सांगितले .यानंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण हे पोलीस पथकासह दाखल होत त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्यापूर्वी किमान सात दिवस आधी नोटीस बजावणे गरजेचे असल्याचे सांगत येथील परिस्थिती बाबत वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA