कोणत्याही परिस्थितीत मॅनहोल्सची झाकणे उघडू नयेत- आयुक्तांचे आवाहन


   मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी साचल्यास पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने मलवाहिनीवरील मॅनहोल्स उघडण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. ही बाब अत्यंत धोकादायक असून मॅनहोल्समध्ये पडून जीवितहानी होवू शकते. तरी कोणत्याही परिस्थितीत मलवाहिनीवरील झाकणे उघडू नयेत तसेच नागरिकांनी पावसात चालताना काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.    

       मुसळधार पावसामुळे मलवाहिनीवरील मॅनहोल्सची झाकणे पाण्याच्या दाबामुळे मॅनहोल्सपासून बाजुला होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातुन काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलवाहिनी चेंबर्सच्या झाकणाच्या खाली लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे. तरीही, काही ठिकाणी चेंबर्सवरील आरसीसी झाकणे पाण्याच्या दाबामुळे बाजुला होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून अशा वेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच त्वरीत उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे

 महापालिका आयुक्तांनी तलाव सुशोभीकरण, साफसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. दरम्यान रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज सायंकाळी महापालिका आयुक्तांनी मासुंदा तलाव येथून मुसळधार पावसात चालतच सुशोभीकरण, खड्डे भरणे तसेच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली.

 यामध्ये मासुंदा तलाव, जांभळी नाका, भाजी मार्केट तसेच स्टेशन रोडवरील मुख्य मार्केट आदी ठिकाणांच्या रस्ते दुरुस्ती, पाणी साचणारी ठिकाणे तसेच साफसफाई कामाची पाहणी केली. कोरोनाचा संसर्ग कमी होत असून पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त महापालिका आयुक्त रोज विविध ठिकाणांच्या स्वच्छता कामाची पाहणीसाठी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या