Top Post Ad

लोकशाहीचाच वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट


● आज देशभरातील कट्टरवाद्यांकडून हिंदुराष्ट्राचा राग आवळला जातोय. "हिंदुराष्ट्र हे फक्त आमचं स्वप्न नाही तर आमचं ध्येय आहे", असं छातीठोकपणे सांगितलं जातंय...◆ 'पण हिंदुराष्ट्र पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे ?'◆ 'हिंदुराष्ट्र म्हणजे आज अस्तित्वात असलेल्या राष्ट्रात नेमके काय बदल केले पाहिजेत ?'याबद्दल मात्र स्पष्टपणे कुणीच बोलतांना दिसत नाही. कारण ही मागणी करणाऱ्या ९०% लोकांनासुद्धा हिंदुराष्ट्राची संकल्पना नेमकी काय आहे हे माहित नाही.आणि ती जर त्यांना नेमकी कळली तर या मागणीला सर्वात जास्त तेच लोक विरोध करतील हे निश्चित.  ● आज हिंदुराष्ट्र म्हंटले की आपण विचार करतो हिंदूंचे राष्ट्र. म्हणजे जिथे हिंदूंच्या हाती सत्ता आहे असे राष्ट्र.मग स्वातंत्र्यापासून सत्ता कुणाकडे आहे ? आज देशाची सत्ता कुणाच्या हाती आहे ? 

★ देशाचे राष्ट्रपती हिंदू,★ पंतप्रधान हिंदू,★ गृहमंत्री हिंदू,★ संरक्षण मंत्रीहिंदू,★ अर्थमंत्री हिंदू● देशाच्या मंत्रिमंडळातील  २८ पैकी २६ राज्यपाल हिंदू, देशाच्या संसदेत ९६% खासदार हिंदू आहेत.● सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हिंदू, इतर सर्व न्यायालयांमध्ये ९०% च्यावर न्यायाधीश हिंदू, सर्व राज्यांमध्ये ९६.५ % आमदार हिंदू, देशात २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.● केंद्रशासित प्रदेशात केंद्राचे म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधानांचीच म्हणजेच हिंदूंचीच सत्ता आहे.● बाकी २८ राज्यांपैकी नागालँड (नेफ्यु रियो), मेघालय (कोनराड संगमा), मिझोरम (झोरामथांगा) हे ३ ख्रिश्चन आणि पंजाब चे कॅप्टन अमरिंदर सिंग असे एकूण ४ सोडले तर २४ राज्यांचे मुख्यमंत्री हिंदूच आहेत.● देशाच्या संसदेच्या ५४० खासदारांपैकी २७ मुस्लिम आहेत म्हणजे एकूण संख्येच्या फक्त ५%. मग आणखी कोणतं हिंदुराष्ट्र पाहिजे आहे यांना ?       ● हिंदू धर्माच्या जास्त खोल इतिहासात आपण जाणार नाही. पण ज्यांना आपण हिंदू धर्माचे धर्मग्रंथ म्हणतो त्या पुराणे, उपनिषदे, वेद , रामायण, महाभारत, गीता यात कुठेच हिंदू शब्द येत नाही. जर हे सर्व ग्रंथ हिंदू धर्माचे धर्मग्रंथ आहेत तर त्यात हिंदू हा शब्द सुद्धा नसावा ?

● ५००० वर्षांपूर्वीचा प्राचीन धर्म म्हंटला जातो. पण त्यात गेल्या ९०० ते १००० वर्षांपूर्वी हिंदू शब्द निर्माण होतो याला काय कारण असावे ?हा विचार कुणीच करत नाही.● ज्यांना हिंदुराष्ट्र पाहिजे ते लोक स्पष्टपणे आपले म्हणणे का मांडत नाहीत ?● त्याचे कारण म्हणजे यांना हिंदूराष्ट्र आणायचं आहे म्हणजे त्यांना चातुर्वर्ण्य व मनुस्मृती त्यांना पुन्हा आणायची आहे.● उच्चवर्णीयांकरिता वेगळा आणि बहुजनानांकरिता वेगळा कायदा अस्तित्वात आणायचा आहे. राज्यघटना बदलायची आहे. स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आहे. बहुजनांना गुलाम करायचं आहे. आणि हे सर्व जर बहुजनांना कळलं तर ते हिंदुराष्ट्राला अज्जीबात पाठिंबा देणार नाहीत.त्यामुळे ते हिंदुराष्ट्राची लेखी घटना लिहीत नाहीत, ते मुख्य अजेंडा लपवतात कारण त्यांना फसवायचं आहे.

● घटनेबद्दल माजी सरसंघचालक कुप्प सी.सुदर्शन म्हणतात की "भारतीय राज्यघटना कितीही चांगली असली तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की ती एका अस्पृश्याने लिहिलेली आहे. भारतीय संस्कृतीच कुठलंही प्रतिबिंब या घटनेत उतरलेल नाही. पूर्णपणे परकीय प्रभाव असलेली ही घटना म्हणजे गोधडी आहे."●  'संकेश्वर पिठाचे श्रीमंत जगतगुरु शंकराचार्य जेरेशास्त्री यांनी रुक्मिणी पटांगणावर भरलेल्या सनातन सभेत उद्गार काढले कि, "डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल किंवा नवी भीमस्मृती (राज्यघटना) रचली आहे आणि त्यातील सर्व गोष्टींना धर्मशात्राचा आधार आहे असे ते सांगत आहेत. पण दूध अगर गंगोदक कितीही पवित्र असले तरी ते नालीतून अगर गटारातून आले तर पवित्र मानता येत नाही, त्याचप्रमाणे धर्मशास्त्र कितीही प्रमाण असले तरी ते डॉ. आंबेडकरांसारख्या बहुजन वर्गातून आले असल्यामुळे प्रमाण मानता येत नाही."इतका द्वेष आपल्या सर्वसमावेशक आणि समानतावादी राज्यघटनेबद्दल यांच्या मनात असताना वरकरणी फक्त आणि फक्त देशभक्ती, भारतमाता याशिवाय आपल्याला काहीच दिसत नाही.या सर्व छुप्या अजेंड्यांना देशभक्ती, वंदेमातरम व भारतमातेच्या वेष्टनात लपवून त्यांच्या विचारांना प्रचारीत व प्रसारित करण्यासाठी त्यांची जीवतोड मेहनत सुरु आहे.

● कारण सध्या लोकशाही असूनही सामान्य जनता सरकारद्वारे सर्वसामान्यांच्या हक्कांचे हनन होत असतांना प्रतिकार करण्यास असमर्थ आहे.● मग एकदा का यांना अपेक्षित हिंदुराष्ट्र अस्तित्वात आलं की जनतेच्या हातून सर्व गेलंच म्हणून समजा.● वि.दा. सावरकर यांचे 'हिंदुत्व' व गोळवलकर गुरुजींचे 'आम्ही' व 'विचारधन' ही पुस्तके म्हणजे कट्टरवाद्यांच्या हिंदुराष्ट्राचा वैचारिक आधार आहेत. गोळवलकरांनी 'आम्ही' या पुस्तकात स्पष्टपणे मांडलंय की 'गैरहिंदूंनी हिंदू वंश व संस्कृतीचे गोडवे गायलेच पाहिजेत, अन्यथा नागरी हक्काविना दुय्यम भूमिका स्वीकारून त्यांना देशात राहावे लागेल.' म्हणजे जर इतर धर्मियांनी हिंदूंचे गोडवे गायले नाहीत तर त्यांना नागरी हक्क मिळणार नाहीत, म्हणजे समानतेचा, मतदानाचा, अन्यायाविरूद्ध दाद मागण्याचा हे कोणतेच अधिकार मिळणार नाहीत.सध्या सामान्य माणसाला मतदानाचा हक्क असूनसुद्धा त्याच्या हक्क -अधिकारांना कवडी किंमत नाही, मग हा अधिकारसुद्धा काढून घेतला तर त्याची काय अवस्था होईल ही कल्पना पण करवत नाही.

●  हे हिंदुराष्ट्राची मागणी करणारे कट्टरवादी लोक आपल्या विचारांचा प्रचार प्रसार इतक्या सहजपणे, मोकळेपणाने करू शकत आहेत ते भारतातील लोकशाहीमुळेच हे ते लोक सोयीस्करपणे विसरतात.घटनेत दिलेल्या व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याचा वापर करूनच आपले विषारी विचार समाजात पेरत आहेत.  म्हणजेच लोकशाहीचा पुरेपूर वापर करून लोकशाहीच संपविण्याचा कट ते रचत आहेत.  हे लोक सर्वसामान्यांना भूलथापा देऊन, धर्माची आन देऊन सोबत घेत आहेत. यात सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन त्यांना त्यांच्याच भविष्याला अंधःकारात ढकलण्यासाठी वापरून घेण्याचा हा प्रकार आहे.

● हिंदुराष्ट्र निर्मितीची जनतेची मानसिकता तयार करण्यासाठी कट्टरवाद्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे.'हिंदू धर्मावर संकट आहे,हिंदूंनो जागे व्हा' अशी आवई उठवणे. या शस्त्राने चांगले चांगले विचारवंत सुद्धा प्रभावित होतात मग तरुणांची माथी भडकणे साहजिक आहे.● परंतु आपल्यावर ६०० वर्ष मोघलांचं राज्य होतं, ३५० वर्ष इंग्रजांचं राज्य होतं तरीसुद्धा धर्म संकटात नव्हता मग आज देशात हिंदूंचेच राज्य असतांना हिंदू धर्म संकटात कसा ? असा प्रश्न तरुणांना का पडत नसावा ?धर्म संकटात असण्याची भीती दाखवत असतांना जणू काही देशात ५०% मुस्लिम आहेत आणि लवकरच ते १००% वर पोहोचणार आहेत असे चित्र उभे केले जाते; परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की १९६१ ला झालेल्या जनगणनेत आपल्या देशातील मुस्लिम लोकसंख्या १०.७% होती आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणजे ६० वर्षात ही मुस्लिम लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १४.२% झाली आहे आहे. त्यामुळे धर्म संकटात वगैरे ह्या हेतुपुरस्सर पसरविल्या गेलेल्या अफवा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

● संयुक्त राष्ट्रसंघाचे आज २०० च्या वर राष्ट्रे सदस्य आहेत. त्यापैकी ९५% राष्ट्रे प्रादेशिक राष्ट्रवादाच्या भूमिकेवर उभी आहेत म्हणूनच आज अमेरिका, जपान, इंग्लंड, जर्मनी, फ्रांस ई. राष्ट्रांमध्ये गेलेल्या भारतीयांना तिथे पूर्ण नागरिकत्व मिळाले आहे. ● धार्मिक राष्ट्रांची, हुकूमशाही राष्ट्रांची अवस्था पाकिस्तान, इराण, इराक यांना बघून आपल्या लक्षात येते. कट्टर धार्मिक राष्ट्र झाल्यानंतर देशाची प्रतिमा आंतराराष्ट्रीय पातळीवर कशी असेल ?आताच्या राज्यकारभारात आणि हिंदुराष्ट्र झाल्यानंतरच्या देशाच्या राज्यकारभारात नेमका काय फरक पडणार आहे ? हे हिंदुराष्ट्रवाद्यांनी स्पष्टपणे जनतेला सांगितलं पाहिजे.● हिंदुराष्ट्राची नेमकी व्याख्या सांगून, त्यात नेमके काय काय मुद्दे असतील ते स्पष्टपणे भारतीय जनतेसमोर मांडावेत. त्यानंतर जनतेला कोणते राष्ट्र पाहिजे ते भारतीय जनतेला ठरवू द्यावे.● एक महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुराष्ट्र घोषित झाल्यानंतर पंजाब, नागालँड, मिझोराम, केरळ, काश्मीर हे लोक आपापल्या धर्मानुसार वेगळं राज्य मागणार नाहीत हे कशावरून ?

● *अनेक फाळण्यांकरिता देशाला प्रवृत्त करून अखंड भारताचे तुकडे करण्याचा हा प्रयत्न आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.●  कोणतीही मागणी करण्यापूर्वी किंवा एखाद्या मागणीला समर्थन देण्यापूर्वी त्या मागणीचे नेमके स्वरूप, उद्देश, त्यामागील उघड आणि छुपे अजेंडे काय आहेत हे पूर्णपणे  समजून घेतले पाहिजे. त्या मागणीमुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडेल ? त्याचा फायदा होईल की तोटा होईल, आज देशात प्राधान्य कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे ? काय आवश्यक आहे हे सर्व समजून घेणे गरजेचे आहे.● देशातील महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी, गरीब-श्रीमंतातील दरी वाढत चालली आहे. हे सर्व संकट हिंदुराष्ट्र झाल्याने संपणार आहेत काय ? ● अतिउत्साहांत, वरच्या वेष्टनाला भुलून, अर्धवट माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय आपल्या पुढील पिढ्यांच्या जीवावर बेतू शकतो; हे लक्षात घेणं गरजेचं आहे.● शेवटी राष्ट्र आणि माणूस महत्वाचा की धर्म हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.-

 चंद्रकांत झटाले   अकोला   ९८२२९९२६६६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com