- ठाणे स्टेशन रोड परिसरातील शासकीय कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकासाला चालना
- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने होणार पुनर्विकास
- महिन्याभरात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होणार
- सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, तहसीलदार कार्यालय एकाच इमारतीत
- सुमारे अडीच हजार क्षमतेचे पार्किंग, पालिका बाजारही होणार

ठाणे स्टेशन रोड परिसरात तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, जुनी ठाणे महानगरपालिका इमारत, जिल्हा परिषदेची कन्याशाळा, अशा काही इमारती उभ्या आहेत. मात्र सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या या इमारती आता अत्यंत जीर्ण झाल्याने त्यांचा पुनर्विकास करणे गरजेचे असल्याने पालकमंत्री श्री. शिंदे गेली काही वर्षे या इमारतींच्या जागी अत्याधुनिक पद्धतीची सरकारी कार्यालये व्हावीत यासाठी प्रयत्नशील आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिल्याने आता तो वेगाने पूर्ण करण्याची गरज असल्याचे श्री. शिंदे यांनी बैठकीत सांगितले. तसेच, वेगाने हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले.
या भागातील कार्यालयांचा एकत्रित पुनर्विकास होणार असून सर्व कार्यालयाना एकाच इमारतीत सामावून घेतले जाणार आहे. या जागी बहुमजली आयकॉनिक इमारत उभी राहणार असून या इमारतीत सद्यस्थितीत वापरत असलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा या कार्यालयांना मिळणार आहे. याशिवाय सर्वसामान्य लोकांना आणि इमारतीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या खासगी कार्यालयांना मुबलक पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय या इमारतीच्या बाजूलाच शाळेसाठी स्वतंत्र इमारत आणि मैदान बांधून देण्यात येणार आहे. तसेच, काही छोटी खासगी कार्यालये आणि पालिका बाजार सुरू करण्यासाठी काही गाळे उपलब्ध होणार आहेत.
0 टिप्पण्या