Top Post Ad

पर्यावरण दिन ...... एक दिवसीय उत्सव नको


     दरवर्षी 5 जून हा दिवस संपूर्ण जगभर `पर्यावरण दिन' म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो. शासकीय-प्रशासकीय तसेच वैयक्तिक पातळीवरही पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे नेक संकल्प सोडले जातात. पर्यावरणाचे जतन होण्यासाठी या दिवशी जागृती केली जाते. पण हा संकल्प वर्षभर न टिकता फक्त त्या दिवसापुरताच साजरा होतो. असे करण्याने खरेच पर्यावरणाचे रक्षण होणार का ? याचा सूक्ष्म विचार प्रत्येक नागरिकाने करायची वेळ आली आहे. खरंतर विचार करायची वेळ कधीच निघून गेलीय, आता वसुंधरेच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचीच वेळ आली आहे. 

पर्यावरणाची नव्याने ओळख करून घ्यायची खरंतर आपल्याला काहीच गरज नाही. हे पर्यावरण आपण लहानपणापासूनच `अभ्यास'त आलो आहोत. `देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो' हा पर्यावरणाचा पहिला पाठ आम्ही पहिलीतच गिरवलेला असतो. पण तेच सुंदर आकाश आज `विकासा'च्या प्रदुषणाने काळवंडले आहे... सुंदर प्रकाश देणारा सूर्य आज `ओझोन' भेदून आग ओकतो आहे. कारण हा गिरवलेला धडा विसरून आम्ही पुढच्या वर्गात पोहचतो. पुढे आम्ही तुकोबांची `वृक्षवल्ली' आणि ज्ञानोबांचा दहिभात खाणारा `काऊ' पाठ करतो. पण ते त्या-त्या इयत्तेपुरतंच मर्यादीत असतं. कारण या धड्यांचा `वापर' आम्ही मार्क्स मिळवून पुढच्या वर्गात जाण्यासाठी करतो. पण `विकासा'च्या नावाखाली `हाय-फाय' गृहसंकुलांसाठी... उड्डाणपुलांसाठी... `स्मार्ट सिटी'साठी ही वृक्षवल्लीच आम्ही कापून टाकतो आणि त्यांच्यावर नांदणारे आमचे चिऊ-काऊ हरवून बसतो.  

निसर्गातील या सर्वच गोष्टी मानवोपयोगी आहेत. पण स्वतच्या सुखासाठी निसर्गावर मात करण्याच्या इच्छेने मानवाने निसर्गाचा समतोल बिघडवला. यामुळे पर्यावरणावर परिणाम होऊ लागला. औद्योगिकीकरण व जंगलतोड यामुळे हवामानात बदल झाला. जमिनीची धूप वाढली. कस कमी झाला. रासायनिक कीटकनाशकांमुळे विषारी द्रव्यांचा परिणाम जीवसृष्टीवर व मानवी जीवनावर होऊ लागला. कारखान्यातील दूषित पाणी, कचरा नद्यांत सोडल्यामुळे  पाणवनस्पती, मासे नष्ट होऊन जलप्रदूषण वाढले. कारखान्यांच्या, वाहनांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढले. रस्ते, घरे बांधण्यासाठी डोंगर व झाडे नाहिशी होऊ लागले. गाड्यांचे आवाज, हॉर्न, यंत्राचे आवाज, नगारे, लाऊडस्पीकर, रेडिओ, टी.व्ही. यांच्या कर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषण होऊन शारीरिक आजार होऊ लागले.  

वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे यांच्यामुळे प्रचंड कचरानिर्मिती होऊन दुर्गंधी व रोगराई निर्माण होऊ लागली. म्हणजेच माणसाने स्वतच स्वतला धोकादायक परिस्थिती निर्माण करून विनाशाकडे वाटचाल चालविली आहे. दूषित हवा, दूषित अन्नपदार्थ यामुळे माणसे व्याधीग्रस्त होत चालली आहेत. दूषित वायूमुळे पृथ्वीभोवती असण्राया ओझोनच्या संरक्षणात्मक कवचाला धोका निर्माण झाल्याने त्यातून अनेक शारीरिक आजाह बळावू लागले आहेत. बेसुमार जंगल, वृक्षतोडीमुळे शुद्ध हवा, पाऊसपाणी, अन्नधान्ये यांची टंचाई निर्माण झाली आहे. हा सर्व ऱहास थांबविण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी व ते स्वच्छ, समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न  करायला हवा. 

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच असून प्रत्येकाने त्यासाठी योगदान द्यायला सुरूवात केली तर मोठा बदल घडू शकतो. कचरा विशेषत प्लास्टिक पिशव्या, रॅपर इतरत्र फेकणे बंद करायला हवे. बाइक वापरणाऱया तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्या योग्य तपासणीअभावी होणारे वायू प्रदूषण मोठे आहे. ते आटोक्यात आणले पाहिजे. गरज असेल तेव्हाच खासगी वाहनांचा वापर करायला हवा.  

आज अनेक शहरांच्या पालिका-महापालिकांमधून ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले जाते. कितीजण या आवाहनाचा आदर करत आहेत? गणपती-नवरात्रीच्या दिवसांत घराघरांतून निर्माण होणारे निर्माल्य टाकण्यासाठी जागोजागी `निर्माल्य कलश' ठेवले आहेत. पण आम्ही आमच्या वाहनांमधूनच त्या कलशात प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये भरलेले निर्माल्य भिरकावतो. या पिशव्यांचं पुढे काय होतं? याचा विचार करायलाही आम्हाला वेळ नसतो. पर्यावरण तज्ञ आणि सिस्टीम नावाची प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यापरीने जनजागृती करत असतेच. प्रश्न एवढाच, की याबाबतीत आम्ही सजग कधी होणार?  

 पर्यावरणाच्या गभीर समस्येकडे लक्ष वेधण्याकरिता दरवर्षी 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. त्यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम फक्त फोटोसेशनसाठी न करता, रोवलेल्या त्या प्रत्येक वृक्षाचे संवर्धन करून ते वाढवायला हवेत.  प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. `कचरा' कचराकुंडीतच टाकावा. स्वयंपाकासाठी गॅस, शक्य असेत तर बायोगॅसचा वापर करावा. पाणी वाया घालवू नये. रॉकेल, पेट्रोल, डिझेल यांसारख्या संपुष्टात येणाऱया खनिज तेलाचा काटकसरीने वापर करावा. होळीसाठी वृक्षतोड न करता कचऱयाची आणि दुर्गुणांची होळी करावी. दिवाळीला आवाजरहित फटाके वापरावेत. जत्रेवेळी, नागपंचमीला प्राणीहत्या व सर्पहत्या करू नये. वन्यप्राण्यांचे संरक्षण करावे. या साध्या साध्या गोष्टींचं पालन प्रत्येकानेच केलं तर आपल्या वसुंधरेच्या संवर्धन कार्यात आपला हातभार लागेल. आपण सजग झालो तरच ही जीवसृष्टी अबाधित राहिल. चला तर मग, या पर्यावरणाच्या दिवसापासूनच आपण वसुंधरा संवर्धनाचा कायमस्वरूपी संकल्प करूया! 

मनिष वाघ - ठाणे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com