Top Post Ad

रुग्णसंख्या घटत असल्याने कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता

 

   मुंबई- राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडाही कमी असेल त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे संकेत शासनाकडून मिळत आहेत. मागील आठवड्यात १७ ते २२ मे या कालावधीत रुग्णसंख्या ३० हजारांच्या आत आली असल्याचे प्रसार माध्यमांनी सांगितले आहे. केवळ बुधवार, १९ मे रोजी संख्या ३० हजारांपेक्षा अधिक होती. नाशिक, कोल्हापूर व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटली असल्यानेच कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.

१ जून रोजी सध्याचे लॉकडाऊन संपत आहे. नव्याने लॉकडाऊन वाढवणार का, याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. त्यासंदर्भात टोपे म्हणाले, १ जूनपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरी ते एकाच वेळी शिथिल होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने नियमांमध्ये शिथिलता दिली जाईल. दुसऱ्या लाटेत ७० हजारांची रुग्णसंख्या ३० हजारांवर आली आहे. मात्र धोका टळलेला नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊनसंदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १२ कोटी लसी एकरकमी घेण्याची राज्याची तयारी आहे, पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. जूननंतर लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून तेव्हा २४ तास लसीकरण राबवले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला दिली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्य सरकार सध्या तयारी करत आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ६ हजार ३०० बालरोगतज्ज्ञांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टर्सवर अंधविश्वास असतो. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या, अशी सूचना केली. काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनीदेखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, असे त्यांनी बजावले. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला. आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पावले टाकली आहेत. जूननंतर लसपुरवठा सुरळीत सुरू होईल त्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरू करू शकू, असे मुख्यमंत्री म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com