मार्च 2020 पासून सुरू झालेल्या Lockdown मुळे भारतात भिक्खू संघाची अवस्था तितकीशी चांगली राहिली नाहीये. अशा परिस्थितीत उपासकांचे कर्त्यव्य आहे की त्यांनी भिक्खू संघाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. भिक्खू हा संपूर्णत उपासकांच्या दानावर अवलंबून असतो. Lockdown मुळे धम्मप्रचारासाठी बाहेर येणे जाणे बंद असल्यामुळे तसेच उपासकांचे ही विहारात जाणे येणे बंद असल्यामुळे भिक्खू संघाला आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक भिक्खू आपणांस आज औषधांसाठी, प्रवासासाठी, विहाराचे मेंटेनन्स जमवण्यासाठी मदतीचे आवाहन करताना दिसत आहेत. अनेक भिक्खू वयोवृद्ध असल्याकारणाने त्यांना औषधोपचारासाठी पुरेसे पैसे अथवा त्यांची जबाबदारी घेणारे उपासक नगण्यच दिसत आहेत. Lockdown मुळे भिक्खू संघावरच नाही तर उपासकांवर देखील वाईट परिस्थिती ओढवली आहे. अशात जे उपासक श्रद्धेने भिक्खू संघाची सेवा करीत आहेत / धम्माची सेवा करित आहेत त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहे.
काही उपासक संभ्रमात असतात कोणाला मदत करावी व कोणाला करू नये. त्यांच्या संभ्रमाची कारणे त्यांना आलेले अनुभव किंवा मुळात इच्छेचा अभाव असणे हेच असते. या बाबीला संघात न राहणारे भिक्खू, एकटेच भ्रमण करणारे भिक्खू ही जबाबदार आहेत. असे पाहण्यात येते की श्रद्धेने दान देणारे उपासक नेहमी दान देतच असतात. परंतु विहारात संघाला किंवा कुठेतरी एकटे राहणाऱ्या भिक्खूला दानाची ( आर्थिक ) आवश्यकता लागली की त्याच उपासकाला अनेक ठिकाणावरून विचारणा केली जाते व त्या उपासकावर त्याचा भार पडतो.
बुद्ध म्हणतात, 'एकाच उपासकावर सतत दानाचा भार पडता कामा नये.'
जर हेच दान संघटितरित्या एका विहारात एका संघात गेले तर त्याचा लाभ संघातील अनेक भिक्खुंना होऊ शकतो. भिक्खूच भिक्खुंची काळजी वाहू शकतात. भिक्खू संघाच्या मैत्रिकरिता भगवंत म्हणतात.
सुखो बुद्धानं उप्पदो सुखा सुधम्म देसना ।
सुखा संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो । - धम्मपद
( बुद्धांचा जन्म सुखकारक आहे, धम्माचा उपदेश, संघातील एकता सुखदायक आहे आणि एकत्रित तप करणे सुखकारक आहे ). हे झाले संघाविषयी
आजही आपल्या समाजात धम्माबद्दल म्हणावी तशी जागरूकता नाही हे खेदाने म्हणावे लागते. दान देण्यासंदर्भात किंवा भिक्खू व इतर गरजूंना मदत करण्यासंदर्भात लोकांची मानसिक अवस्था काय असते याचे विवेचन आपणांस आपणांस दीघनिकायातील संगीति सुत्तात सापडते. एकदा धम्मसेनापती सारिपुत्त यांनी श्रावस्ती येथे दान देणाऱ्यांचे चार प्रकार सांगीतले आहेत.
१. जो स्वत: दान देतो परंतु दुसऱ्यांना दान देण्याची प्रेरणा देत नाही तो जिथे जिथे (उत्पन्न होतो) जन्म घेतो तिथे तिथे त्याला भोगसंपत्ती प्राप्त होते. परीवार संपत्ती प्राप्त होत नाही.
२. जो स्वत: दान देत नाही परंतु दुसऱ्यांना दान देण्याची प्रेरणा देतो, तो जिथे जिथे (उत्पन्न होतो) जन्म घेतो तिथे तिथे त्याला परीवार संपत्ती प्राप्त होते भोगसंपत्ती प्राप्त नाही.
३. जो स्वत:ही दान देत नाही व दुसऱ्यांना सुद्धा दान देण्याची प्रेरणा देत नाही, दान देऊ देत नाही तो जिथे जिथे (उत्पन्न होतो) जन्म घेतो तिथे तिथे त्याला अनाथासारखे दु:खी जिवन जगावे लागते.
४. जो स्वत: ही दान देतो व दुसऱ्यांनाही दान देण्याची प्रेरणा देतो, प्रवृत्त करतो तो जिथे जिथे (उत्पन्न होतो) जन्म घेतो तिथे तिथे त्याला भोगसंपत्ती व परीवार संपत्ती अशा दोन्ही संपत्ती प्राप्त होतात.
दान देण्यासाठी प्रेरित होणारे चित्त खालील प्रकारे असते.
१. असज्ज दानं देति :- एखादा आलेला पाहून ( त्रासून ) दान दिले जाते.
२. भय दानं देति :- काहीजण भीतीने दान देतात.
३. अदासि मे ति दानं देति :- ( भूतकाळात ) मला दिले म्हणून दान देतात.
४. दस्सति मे ति दानं देति :- ( भविष्यात ) मला पुन्हा देईल म्हणून दान देतात.
५. साधू दानं ति दानं देति :- दान करणे चांगले म्हणून दान देतात.
६. अरहमि पचन्तो अपचन्तं अदतून ति दानं देति :- मी अन्न शिजवितो. हे शिजवीत नाहीत, मी शिजवीत असताना न शिजवणाऱ्यांना दान न देणे योग्य नाही, असे म्हणून दान देतो.
७. इमम मे दानं ददतो कल्याणो कित्तिसद्दो अभ्भुग्गच्छन्ति ति दानं देति :- सर्वीकडे माझी कीर्ती होईल म्हणून दान देतात.
८. चित्तलन्कार - चित्तपरिक्कार दानं :- चित्ताचा अलंकार व परिष्कार म्हणून दान देतात. या दानामुळे चित्त मृदू होते. म्हणून या दानास 'अदन्तदमनं दानं' असे म्हटले आहे. हे दान चित्ताचा अलंकार व परिवार होय. सर्वात हे दान उत्तम ( बुद्धघोष ).
आज या कठीण काळात भिक्खू संघाला मदत करून आपणा बौद्धांना पुढील पिढीला एक आदर्श घालून द्यायचा आहे. धम्माचे संस्कार / दानाचे संस्कार आपल्या पुढील पिढीत रुजवायचे आहेत म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या धम्मगुरूंना ते जेथे कुठे अडचणीत असतील तिथे त्यांना मदत करायला पाहिजे.
संघ सोडून राहणाऱ्या भिक्खुंनाही विनंती आहे की आपण आपल्या संघासमवतेच राहावे. उपासकांनी विचारणा केली असता आपणांस आपले गुरुबंधू व विहाराची इत्यंभूत माहिती देता आली पाहिजे. तरच उपासकांचा विश्वास दृढ होईल.
( सदर पोस्ट दानासाठी अपील नसून बौद्धांना अश्या आपत्तीच्या प्रसंगात आपल्या जबाबदारीची जाणीव असावी म्हणून लिहिली आहे. आर्थिक दान म्हणजे धम्मदान नसले तरीही आज आर्थिक मदतीची गरज अनेक धम्मगुरूंना आहे. ती आपण आपल्या इच्छेनुसार / सोयीनुसार जिथे तिथे गरजेच्या ठिकाणी द्यावी म्हणून हा प्रपंच )
- अरविंद भंडारे
पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई
06/05/2021
0 टिप्पण्या