Top Post Ad

तोक्ते चक्रीवादळ ; पालकमंत्र्यांनी दिले जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे निर्देश

   ठाणे:- तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आज जिल्ह्याधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी एमएमआर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला फोन करून त्यांनी तेथील परिस्थितीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. 

तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर उल्हासनगरमध्ये एका रिक्षेवर झाड कोसळल्याने दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पालकमंत्री शिंदे यांनी उल्हासनगर मनपा आयुक्तांना फोन करून या जखमींना वेळेत चांगले उपचार मिळतील, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. 

 मीरा-भाईंदर क्षेत्रातील उत्तनच्या समुद किनाऱ्यापासून १० नॉटिकल मैलांवर एक जहाज  भरकटले होते. या जहाजावर ६ खलाशी अडकले आहेत. सध्या हे जहाज तटरक्षक दलाच्या संपर्कात असून वादळाचा जोर ओसरल्यावर ते उत्तनच्या किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती  शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण परिस्थिती तूर्तास नियंत्रणात असली तरी जिल्ह्याधिकारी  राजेश नार्वेकर या परिस्थितीचा आपत्ती नियंत्रण कक्षातून सातत्याने आढावा घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक पालिकेच्या अधिकाऱ्यांना आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.


 दरम्यान  ठाण्यातील पार्कींग प्लाझा कोविड केअर सेंटर मध्ये अवघ्या १० दिवसांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणाऱ्या  एअर सिप कंपनीनेच यावेळी अवघ्या तीन दिवसांत मीरा- भाईंदर मधील हा प्लांट उभारून तो कार्यान्वित केलेला आहे. अवघ्या तीन दिवसांत उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लँटमुळे मीरा भाईंदर महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय आता स्वयंपूर्ण झाले असल्याचं मत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते या ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं लोकार्पण करण्यात आले.  आज मुसळधार पाऊस असूनही करण्यात आलेल्या या ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उदघाटनाला पालकमंत्री श्री शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पोलिस आयुक्त सदानंद दाते, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, महापालिका आयुक्त  दिलीप ढोले  उपस्थित होते.

या प्लँटद्वारे दररोज १७५ जंबो सिलेंडर क्षमतेचा ऑक्सिजन तयार होईल व त्याद्वारे दररोज १२० रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवण्यात येणार आहे.  वातावरणातून हवा शोषून घेऊन त्यामधून नायट्रोजन बाहेर काढून 93 टक्के शुद्ध ऑक्सिजन या प्लांटद्वारे तयार केला जाणार आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याला सध्या प्राधान्य देण्यात आले असून त्यामुळे आगामी काळात एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारले जाणार आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com