मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या ऑनलाईन महासभेत मतदान व मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदान वेळी महासभेला जे हजर असतात त्यांनाच मतदान करता येते. तसेच प्रत्येक नगरसेवकाचे मत नोंदवले जाते. परंतु ऑनलाईन महासभेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्पणे मतदान व मतमोजणी करून ठराव मंजूर करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑनलाईन महासभेत ठरावावर मतदान व मतमोजणीच्या नियमांचे महापालिका सचिव यांनी जाणीवपूर्वक उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासह झालेला बेकायदेशीर ठराव रद्द करण्याची मागणी सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे. महापौर ज्योत्सना हसनाळे आणि आयुक्त दिलीप ढोले यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
१९ मे च्या ऑनलाईन सभेत परिवहन सेवेबाबत भाजपाच्या ध्रुवकिशोर पाटील सह नगरसेविका नीला सोन्स यांनी वेगवेगळे ठराव मांडले होते. सोन्स यांच्या ठरावास भाजपाच्या काही नगरसेवकांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा पाठिंबा देत भाजपातील दुफळीला हवा दिली. परंतु मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी मात्र नियमाप्रमाणे न करता त्यात गैरप्रकार केला गेल्याने पाटील यांचा ठराव मंजूर झाला असे आरोप झाले. आरोपांवर न थांबता भाजपच्या नीला सोन्स यांनी या प्रकरणी लेखी तक्रार केली आहें.
ऑनलाईन उपस्थित नगरसेवकांची मतांची नोंदणी पूर्ण होऊन त्याचा निकाल जाहीर करण्यापूर्वीच पीठासीन अधिकारी आणि जबाबदार अधिकारी सचिव वासुदेव शिरवळकर आदी सभागृह सोडून निघून गेले. वास्तविक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सचिवांनी स्थान सोडता नये होते. सुमारे १५ ते २० मिनिटांच्या नंतर ते सभागृहात परत आले. बर्याच वेळानंतर काही सदस्य ऑनलाईन नसताना सुद्धा केवळ फोनवर संपर्क साधून मतांची असंवैधानिक नोंद घेऊन मतांचा निकाल जाहीर केला असे सोन्स यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सचिवांनी अपारदर्शक, अप्रामाणिक आणि सदस्यांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्या जागी निष्पक्ष आणि जबाबदार अधिकारी नेमावा. परिवहन सेवा चालवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार महासभेला असल्याने झालेला ठराव रद्द करावा अशी मागणी सोन्स यांनी केली आहे. पत्र देताना सोन्स यांच्या सह भाजपचे नगरसेवक मदन सिंह, रवी व्यास, विनोद म्हात्रे, सुरेश खंडेलवाल, हेमा बेलानी, दौलत गजरे, पंकज पांडेय, विजय राय सह गजेंद्र रकवी आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या