भाजपचे वंग-भंग; बंगालच्या निकालामध्ये ‘खेला’


 देशात कोरोना महामारीचे थैमान सुरु असतानाही सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन करून  62 दिवस चाललेल्या निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे. प.बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पॉंडेचरीचे निकाल जाहिर झाले आहेत. तीन राज्य बंगाल, केरळ आणि असममध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. म्हणजेच, बंगालमध्ये तृणमूल, केरळमध्ये LDF आणि असममध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश आले आहे. तर, तमिळनाडुमध्ये बदल होताना दिसत आहे. तिथे द्रमुक सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित आहे. 

संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. भाजपचे इतर राज्याचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रातील सर्व मंत्री मंडळ आणि खुद्द मोदी दररोज राष्ट्रीय विमानाने दिल्लीहून पं.बंगालला प्रचाराकरिता जात होते. तरीही अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा राबवूनही राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. ममता सोमवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.  इकडे, सन २०१६ च्या ३ जागांच्या तुलनेत भाजपची कामगिरी खूप सुधारली आहे. परंतु पक्ष सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. त्या वेळी १२१ जागांवर आघाडी मिळाली होती. निकालानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचार उफाळला.

तामिळनाडूत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक आणि सहकारी पक्षांनी १५६ जागा जिंकल्या. यातील १३३ द्रमुकच्या आहेत. बहुमतासाठी ११८ जागा हव्या आहेत. म्हणजे, सहकारी पक्षांचा द्रमुकवर दबाव राहणार नाही. दुसरीकडे, आपसांतील संघर्षामुळे अण्णाद्रमुक ७८ जागांवरच आटोपला. राज्यात नवे राजकीय समीकरण मांडण्याच्या तयारीत असलेले कमल हासन यांना भाजपच्या वानती श्रीनिवासन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. भाजपच्या महिला आघाडीच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

डाव्या पक्षांचे प्रमुख पी. विजयन केरळमध्ये सत्ता वाचवण्यात यशस्वी ठरले. राज्यात ५० वर्षांनंतर प्रथमच एलडीएफ सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. वास्तविक केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन होते. या वेळी कोरोना लढाईतील भूमिका या पक्षासाठी गेमचेंजर ठरली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफला नव्याने उभारी देण्यासाठी राहुल गांधी केरळमध्ये प्रचंड वेळ दिला. मात्र, विजयन यांनी या भागांत सभा वाढवून काँग्रेसला अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत घेरले.

५ राज्यांत भाजपसाठी सर्वात दिलासा आसाममध्ये मिळाला. येथे सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ७४ जागा जिंकून सत्ता कायम राखली. आसाममध्ये या वेळी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. आसाम सरकारचे शक्तिशाली मंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, सीएमचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. अर्थात, केंद्रीय नेतृत्वाने याबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. मात्र, सरमा यांचा दावा सहजपणे घेता येणार नाही. कारण आसाममधील भाजप संघटनेचा सरमा हे कणा मानले जातात.

  नंदीग्राम मतदारसंघातून  ममता बॅनर्जी पराभूत झाल्याने नाट्यमय कलाटणी मिळाली. एकेकाळचे तृणमूलचे सेनापती व भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनीच ममतांना १९५६ मतांनी पराभूत केले. तथापि निकालामध्ये रात्री उशिरापर्यंत आघाडी-पिछाडी सुरू होती. अखेर रात्री ११.३० वाजता ममतांच्या पराभवाची अधिकृत घोषणा झाली.  तत्पूर्वी, सायंकाळी ६ वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता यांनी पराभव स्वीकारला असे सांगून निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते.  पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान ममता म्हणाल्या की, नंदीग्रामबाबत जास्त ताण घेऊ नका.मी नंदीग्रामसाठी संघर्ष केलाय. नंदीग्रामच्या लोकांनी जो कौल दिलाय, तो मला मान्य आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA