पावसाळ्यात नालेसफाईकरिता विशेष टीम सज्ज ठेवा- महापौराच्या प्रशासनाला सूचना


ठाणे-  नुसतेच नाले साफ करुन चालणार नसून नाल्यातील तसेच झोपडपट्टी, चाळींमधील अंतर्गत गटारे साफ करण्याच्या सूचना देत पावसाळ्यात विशेष टीम सज्ज ठेवणे गरजेचे आहे, 31 मे पर्यत 100 टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश  महापौरांनी प्रशासनाला दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली. यावेळी  स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, उपमहापौर पल्लवी कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका मिनल संख्ये, माजी नगरसेविका नम्रता भोसले, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा एकता भोईर, नगरसेवक एकनाथ भोईर, वर्तकनगर प्रभागसमिती अध्यक्षा राधिका फाटक, नगरसेविका विमल भोईर, आरोग्य समिती सभापती निशा पाटील, नगरसेवक मिलिंद पाटणकर, सुधीर कोकाटे, नगरसेविका नंदिनी विचारे,  अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब चव्हाण, कल्पिता पिंपळे, प्रणाली घोंगे, अनुराधा बाबर, शंकर पाटोळे, विजयकुमार जाधव तसेच सर्व प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

          ठाणे शहर, वागळे इस्टेट, वर्तकनगर माजिवडा, वृंदावन, खोपट, वंदना बसस्टॉप, चेंदणी कोळीवाडा आदी परिसरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा महापौरांनी घेतला. नालेसफाई करताना झोपडपट्टी, चाळी तसेच इमारतीलगतची जी गटारे नाल्याला येवून मिळतात, त्या गटारांची साफसफाई करण्यात यावी, जेणेकरुन चाळींमध्ये पाणी साचणार नाही याकडे लक्ष द्यावे. नाल्यातील काढलेला गाळ हा तसाच न ठेवता तो उचलल्यानंतर ती जागा पाण्याने स्वच्छ करण्यात यावी अन्यथा त्या ठिकाणी पाऊस पडल्‌यावर चिखल निर्माण होतो व त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. तसेच काही ठिकाणी नाल्याच्या कमकुवत भिंतीचे काम करणे, तसेच पोकलेन उतरविण्यासाठी तोडण्यात आलेल्या भिंती तातडीने बांधणे पहिल्या पावसात नाल्यातून अनेक वस्तू वाहत येत असतात, या वस्तूंमुळे पाण्याचा प्रवाह अडला जातो, यासाठी पावसात एक विशेष टीम सज्ज ठेवण्यात यावी, जेणेकरुन नाल्यातून वाहून आलेल्या वस्तू या तात्काळ बाहेर काढता येतील व पाण्याचा प्रवाह हा सुरळीत होईल. 

महापालिकेच्या वतीने नालेसफाईचे काम योग्यपध्दतीने करण्यात येत आहे, परंतु नालेसफाई झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी नागरिक त्यांच्या जुन्या वस्तू सोफा, गादी, उशा, फर्निचर, थर्माकोलच्या वस्तू टाकत असतात, त्यामुळे नाले तुंबून त्यांच्याच विभागामध्ये पाणी तुंबते व याचा नाहक रोष महापालिकेला व स्थानिक नगरसेवकांवर येतो. तरी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे असे देखील आवाहन महापौरांनी यावेळी केली. तसेच रात्रीच्या वेळी जे नागरिक नाल्यात कचरा फेकतात याबाबत टीम नेमून त्यांच्यावर लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई करणेबाबतही महापौरांनी सूचना केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA