Top Post Ad

ठामपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार


रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणवर तुटवडा निर्माण झाल्याने करोनारुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे. तरीही इंजेक्शन मिळत नसताना दुसरीकडे मात्र या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. शनिवारी ठाण्यातून दोघांना अटक करत त्यांच्याकडून २१ इंजेक्शन जप्त केली आहेत. आरोपी पाच ते दहा हजारांना इंजेक्शनची विक्री करत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. गंभीर बाब म्हणजे यातील एका आरोपीने त्याच्याकडे मिळालेली इंजेक्शन ठाणे महापालिकेच्या एका कोविड सेंटरमधून घेतल्याची बाब प्राथमिक चौकशीमध्ये समोर आली आहे. मुलुंडमधील पद्मश्री नर्सिंग होममधील एका डॉक्टरला रेमडेसिवीर इंजेक्शन चारपट दर वाढवून विकत असल्याबाबत त्याच्या सहाय्यकासह अटक करण्यात आली आहे.   हे रेमडेसिवीर इंजेक्शन सामान्य विक्रीसाठी नसून ते फक्त शासकीय विभागासाठीच वापरण्याचे होते. यामध्ये ठाणे महापालिकेचे काही अधिकारीही सामील असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 याबाबत माहिती मिळाल्यानंतर  ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं  तीन हात नाका येथे सापळा रचून आतीफ फिरोग अंजुम (२२, रा. कुर्ला), प्रमोद सखाराम ठाकूर (३१, रा. भिवंडी) यांना रंगेहात पकडलं.  अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  काही दिवसापूर्वीच  ठाणे महापालिकेचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना  पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आले असून त्यांना ठाणे सत्र न्यायालयाने 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता रेमडिसिवीरच्या इंजेक्शनचा काळाबाजार करणारे ते ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी कोण अशी चर्चा ठाण्यात सुरु आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यातच दिले होते. मात्र ठाण्यातच त्यांच्या निर्देशाला तिलांजली देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. 

ठाणे शहरात काही व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शनची बाजारभावापेक्षा जास्त किंमतीत विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने ठाणे खंडणी विरोधी पथकाने आरोपींना पकडण्यासाठी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून व्यूहरचना आखली. शनिवारी ठाण्यातील तीन हातनाका येथून ५ ते १० हजार रुपये किमतीमध्ये इंजेक्शनची विक्री करताना आतीफला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून १६ इंजेक्शन जप्त करण्यात आली. त्यानंतर बाळकुम नाका येथून प्रमोदच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यालाही पाच इंजेक्शनसह रंगेहात पकडण्यात आले. अशा प्रकारे या आरोपींकडून २१ इंजेक्शन, मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

आतिफ हा मुलुंड येथील एका नर्सिंग होममध्ये काम करत असून त्याच्याकडे मिळालेल्या १६ इंजेक्शनवर 'नॉट फॉर सेल' असा उल्लेख आहे. त्याने ही इंजेक्शन ठाणे महापालिकेच्या एका कोविड सेंटरमधून घेतले असल्याची माहिती समोर आल्याचे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी सांगितले. आरोपींकडे ही इंजेक्शन आली कशी, याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघडकीस आणण्याची कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे खंडणी विरोधी पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com