ग्लोबल रूग्णालयात ठाण्याबाहेरील रुग्णास दीड लाख रूपये घेऊन प्रवेश


 सध्या कोरोनाचा कहर वाढला असून अशा परिस्थितीत रूग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती असून त्यामुळं रूग्णही हैराण झाले आहेत. ठाणे महापालिकेनं करोडो रूपये खर्च करून कोविड रूग्णालयं उभी केली असून या रूग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार केले जातात. मात्र असं असतानाही पैसे घेऊन रूग्णालयात प्रवेश दिल्यामुळे रूग्णालय प्रशासनही अडचणीत आलं आहे.  ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रूग्णालयात ठाण्याबाहेरच्या रूग्णास दीड लाख रूपये घेऊन प्रवेश दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पोलीस आयुक्तांकडे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काल रात्री बारा- साडेबाराच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांना बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याच वेळी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास वसईतील एका रूग्णास दीड लाख रूपये घेऊन दाखल करण्यात आलं. वसईतील हा रूग्ण अतिशय गंभीर परिस्थितीत होता. त्याला सेव्हन हिल रूग्णालयातून या रूग्णालयात दाखल करून घेण्यात आलं. पहिले पैसे दिल्यानंतरच रूग्णाला दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. या पैशामध्ये सर्वांचा हिस्सा असून पैसे मंत्र्यां-संत्र्यांपर्यंत जातात असं त्यांना सांगण्यात आलं. हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला असून या सर्व रेकॉर्डींगची एक प्रतही जाधव यांनी पोलीस आयुक्तांकडे पाठवली आहे. एकूणच या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

 या घटनेची गंभीर दखल महापौर नरेश म्हस्के यांनी घेतली असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडे याबाबतचे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते तातडीने महापालिकेस सादर करावेत असेही आवाहन महापौरांनी केले आहे. कोविड 19 ची सुरूवात झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार घेता यावेत यासाठी महापालिकेने तातडीने ठाणे ग्लोबल कोविड सेंटरची उभारणी केली   या सेंटरमध्ये ठाण्यातीलच नव्हे तर नजीकच्या परिसरातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेतले व आजही घेत आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क महापालिकेकडून आकारले जात नाहीत. त्यामुळे  निश्चितच गोरगरीब रुग्णांना हे रुग्णालय वरदान ठरत आहे.  बुधवार दिनांक 21/04/2021 रोजी या रुग्णालयात रुग्ण दाखल करुन घेण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचे वृत्त ठाण्यात पसरले आहे, ही अत्यंत गंभीर व क्लेशदायी बाब आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन ही घटना खरी असल्यास संबंधितांनावर कठोर कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्तांना लेखी पत्रान्वये दिले आहे. 

         


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA