डिपार्टमेंटचे असल्याचे सांगून दुय्यम निबंधकाचे अपहरण ; चार जणांना अटक


शहापूर - ठाणे जिल्हाधिकारी यांची बैठक संपवून घरी परतणाऱ्या दुय्यम निबंधकाचे डिपार्टमेंटचे असल्याचे सांगत अपहरण करणाऱ्या चार खंडणीखोरांना कसारा पोलीसांनी अटक केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश उर्फ सोनू नरेश भगवाने (३०) राहणार रेल्वे कॉलनी कसारा, महेश मधुकर व्यवहारे (२३) राहणार त्रंबकेश्वर पाचाळे जि. नाशिक, विजय राजेश चंदिले (३५) राहणार आंबेडकर नगर कसारा, नरेंद्र एकनाथ निकम (२२) राहणार त्रंबकेश्वर नाशिक निरंजन स्वामी समर्थ आखाडा अशी अटक करणाऱ्यांची नावे आहेत. या चौघांना दहा लाखाची खंडणीची मागणी करत अपहरण करतांना अटक करण्यात आली आहे.

शहापुरचे दुय्यम निबंधक अधिकारी इंद्रवन अभिमन्यू सोनावणे (५१) राहणार आटगाव नाशिक हे १५ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे त्यांचा चालक ऋषिकेश पवार यासह सकाळी आपली स्कोडा गाडी घेऊन शहापूर कार्यालयातील कामकाज आटपून दुपारी तीन वाजता ठाणे जिल्हाधिकारी येथील बैठकिला हजर राहिले.  बैठकीनंतर  सायंकाळी ६.३० वाजता नाशिक येथे घरी जाण्यासाठी ठाण्याहून निघाले. रात्री आठ वाजता शहापूर येथील मिड वे हॉटेल मध्ये त्यांचे जेवणाचे डबे खाऊन निघाले असता रात्री १०.३५ वाजता सोनावणे यांच्या चालक टॉयलेटकरीता लथीफवाडी कसारा पेट्रोल पंपाजवल गाडी उभी करून गेला.  त्याच वेळेस दोन  इसम सोनावणे यांच्या गाडीजवळ आले त्यातील एकजण चालकाच्या सीटवर बसला व दुसरा कारच्या मागच्या सीटवर बसला गाडी घेऊन हे इसम सोनावणे यांना घेऊन नाशिकच्या दिशेने निघाले असता सोनावणे यांनी विचारले मला कुठे घेऊन जात आहेत त्यावेळी कार चालवणारा इसम बोलला आम्ही डिपार्टमेंटची माणसे आहोत आम्ही घेऊन जाऊ तेथे शांतपणे रहा नाहीतर जीवे ठार मारीन अशी धमकी दिल्याने   सोनावणे शांत बसले.

 त्यांनी कार जव्हार फाट्याने खोडाळ्याच्या दिशेने एका पाड्यावर नेले तेथे सोनावणे यांची कार तिथेच ठेऊन त्यांचे इतर दोन साथीदार कार नंबर MH12/HL2218 ही घेऊन त्या चौघांनी सोनावणे यांना कारमध्ये बसवून खोडाळ्याच्या दिशेने घेऊन गेले. पुढे त्यांनी थांबून सोनावणे यांचेकडे दहा लाख रुपयांची मागणी केली असता सोनावणे यांनी त्यांच्या कडे पैसे नसून त्यांच्या कारच्या डॅश बोर्ड मध्ये खर्चासाठी ठेवलेलं पन्नास हजार रुपये असल्याचे सांगताच त्यातील एकाने सोनावणे यांच्या कारमधील पन्नास हजार रुपये घेऊन आला व पुन्हा दहा लाख रुपयांची मागणी करू लागले  तेव्हा इंद्रवन सोनावणे यांनी नातेवाईकांकडून पाच लाख रुपये घेऊन देतो त्यावेळी त्यांनी कार पुन्हा कसारा घाटाच्या दिशेने वळवून पुढे बरेच अंतर आले असता त्यांच्या गाडीच्या समोरच  पोलीसांची गाडी असल्याने त्याच वेळेस त्यांनी गाडी थांबवून वळविण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलीसांनी तात्काळ त्या कार ला घेराव घातला व त्यांच्या मुसक्या आवळल्या. 

पोलीसांनी खंडणीखोरांची कार व आरोपीना व सोनावणे व त्यांच्या चालक पवार यास कसारा पोलीस ठाण्यात घेऊन आले. वरील चारही खंडणीखोरांनी इंद्रवन सोनावणे यांचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत दहा लाखाची खंडणी मागितली व कारमधील पन्नास हजार रुपये जबरदस्तीने घेतली म्हणून १६ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश भालचंद्र माळी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या