दुकान बंद, उदरनिर्वाहाचे बिकट संकट; सलून व्यावसायिकाची आत्महत्या


उस्मानाबाद :

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक दि चेन मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मागील आठ दिवसांपासून प्रशासनाने सलून बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. पण दुकान बंद झाल्याने उदरनिर्वाहाचे बिकट संकट निर्माण झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील तरुण व्यवसायिक मनोज झेंडे (वय ४०) यांने शनिवारी रात्री विषारी औषध प्यायला. मृत्युपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून दुकान बंद झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. मनोज झेंडे यांचे सांजा गावात छोटे केशकर्तनालय होते. यावरच ते आपल्या कुटूंबाची उपजिवीका करत असत. त्यांना ना शेती होती ना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन. मागील आठ दिवसापासून धंदा बंद असल्याने पैसा येणे बंद झाले. यातच हातऊसने घेतलेले पैसे, कर्ज, लाईट बील यासह इतर देणी असल्याने त्यांनी मनोज झेंडे यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

विष प्यायल्यानंतर कुटुंबीयांनी ताबडतोब झेंडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज झेंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी लिहीले आहे की, माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे. मी कोरोनाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. आमची दुकाने बंद आहेत, आम्ही पाच हजार रुपयांवर घर कसे चालवायचे असे देखील मनोज झेंडे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या