या भयानक संकटाचा मुकाबला करण्यासाठी, एकत्र येणे गरजेचे आहे.


माझी वेगळ्याने ओळख करून द्यायला नको. मी एक राजकारणी, या सरकारमध्ये मंत्री असणारा जितेंद्र आव्हाड. राजकारणात असताना, आपल्या पक्षाची भूमिका सदैव बाळगावी लागते, त्याच्या विचारप्रणालीशी बांधीलकी ठेवावी लागते, जे इतके वर्ष मी करत आलो, आणि पुढेही करणार. पण या टप्प्यावर मी जरा वेगळं बोलणार आहे, किंवा तुमच्यासमोर मांडणार आहे.

२०१९पासून कोरोनाच्या संकटाने जगाला ग्रासले. वास्तविक पाहता आपल्याला या संकटाची सूचना आधीपासूनच मिळू लागली होती, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि मार्च २०२० मध्ये टाळेबंदी देशभर जाहीर करण्यात आली. जे जे घडलं ते मी इथे परत नव्याने सांगणार नाही. सर्वांना पूर्ण माहिती आहे. उपाय योजना, संयम ,शिस्त, सरकारी यंत्रणा आणि जनता यांच्यातील समन्वय, याच्या जोरावर महाराष्ट्रातील हे संकट  हळूहळू कमी होत गेलं, आणि साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जनजीवन पूर्वपदावर येवू लागले. पण परत नेमके मार्च २०२१ मध्ये कोरोना ची दुसरी लाट देशाला ग्रासू लागली.

वृत्तपत्र उघडावे तर मृत्यूचे आकडे धडकी भरवतात ,स्मशानात धडाडून पेटणाऱ्या चितांची धग बसल्याजागी जाणवते. रुग्णांची फरफट, नातेवाईकांचा असहाय आक्रोश ,भेदरलेली जनता, सगळे, सगळे अतिशय भितीदायक आणि निराशेने ग्रासून टाकणारे आहे. आणि म्हणूनच आज मी जे बोलणार आहे, किंवा जे काही सांगणार आहे ,ते या भारत देशाचा एक नागरिक, एक माणूस, एक पिता, एक पती या नात्याने! मी आज इथे, माझी राजकारणाची वस्त्रे उतरवून  सामान्य माणूस म्हणून बोलतोय.

आजही मला दिसतेय, लोक बेजबाबदारपणे वागताहेत, योग्य काळजी घेतली जात नाही, शासकीय यंत्रणांशी हुज्जत घातली जातेय. पोलिसांच्या अंगावर जाऊन  भांडणे होताहेत. गर्दी करू नका, शिस्त पाळा ,घरातून विनाकारण बाहेर पडू नका, असे वारंवार आवाहन करूनही अनेक लोकं जुमानत नाहीत. किंवा जुमानत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर्ण तर काही ठिकाणी अंशतः टाळेबंदी करावी लागली. लक्षात घ्या की, टाळेबंदी जेव्हा होते, तेव्हा तिचा फटका सर्व जनतेला बसतो. मग ज्या लोकांनी नियम पाळले होते ,शिस्तीने वागले होते, तेही होरपळून निघतात. अनेकांचे व्यवसाय बंद होतात, रोजी रोटी नाहीशी होते, मुलं लेकरे,वृध्द उपाशी झोपतात. रुग्णालयात रुग्ण संख्या प्रचंड वाढते, उपचाराअभावी लोकं तडफडून रस्त्यावर प्राण सोडतात, औषधोपचार शोधत वणवण भटकत राहतात. या सर्वांचा यात दोष असतोच असं नाही ,पण शिक्षा मात्र त्यांच्या कपाळी येते. कारण एकच, नियम न पाळणे ,सरकारच्या निर्बंधांना न जुमानता मनमर्जी करणे. 

यात आणखीन एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते,  राजकारण म्हटलं की, विरोधी मतप्रवाह असतातच. सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करणे  हे विरोधी पक्षांचे काम  किंवा कर्तव्य असते, त्यामुळे होतं काय की अनेकदा चुकीचा संदेश लोकांपर्यंत जातो. सध्या सोशल मीडियावर खोटे संदेश ,अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरवल्या जातात .आणि आपण ज्याला panic factor म्हणू, तो सामान्य लोकांमध्ये बळावतो. आता यात दुर्दैव हे की , या सगळ्याचा जबरदस्त फटका बसतो तो साध्या गोरगरीब जनतेला. ट्विटर म्हणा ,फेसबूक, इंस्टाग्राम अशा अनेक माध्यमांवर ,नेत्यांना टीकेचे धनी व्हावे लागते, त्यांची टिंगल टवाळी होते, समर्थन होतं, आरोप-प्रत्यारोपांची राळ उडते, समर्थक आणि विरोधक अटीतटीने, हिरीरीने भांडतात. हे सगळे आपल्याला माहीत आहे, आपण बघत असतो.

आज मला या सगळ्यांना ,माझे विरोधक, माझ्या समर्थक, माझे कार्यकर्ते, आणि महाराष्ट्रातील माझी संपूर्ण जनता ,या सर्वांना, हात जोडून कळकळीचे निवेदन ,विनंती आहे की, पुढील काही काळ, आपण आपल्या मधील राजकीय वैमनस्य ,हेवेदावे, आरोप हे सगळं विसरून, एक माणूस , एक नागरिक म्हणून,  या भयानक संकटाचा मुकाबला करण्यासाठी, एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्यातील मतभेद आहेत, होते,आणि राहणार. पण एक लक्षात ठेवा, यापरते ही काही आयुष्य आहे ,जे  निसटून गेल्यावर त्याची किंमत कळते. भांडायला, वाद घालायला आपण जिवंत तर रहायला हवं. आयुष्य नसते तेव्हा त्याचे मूल्य जाणवते. मग ते आपल्या विरोधकाचं का असेना. माझा विरोधक किंवा माझ्या विचारसरणीच्या विरोधातअसणारी कोणी व्यक्ती , जर आजारी पडली, किंवा त्याच्या आप्तस्वकीयांना काही झाले, तर त्यात मला आनंद वाटता कामा नये. तसं झालं तर माझ्यातला माणूस संपला. जर मला चुकूनही असं वाटलं, तर मी, स्वतः जितेंद्र आव्हाड हा माणूस म्हणून जगायला नालायक आहे. त्यामुळे पुढील काही दिवस, आपापसातील मतभेद विसरून, महाराष्ट्राला, भारताला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ,आपण एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. सरकारच्या उपाय योजना, त्याची पावलं, धोरणे, जर तुम्हाला पटत नसतील, आवडत नसतील, किंवा तुमची वेगळी मतं असतील, तर ती आम्हाला सांगा. तुमच्याकडे काही वेगळे विचार किंवा उपाय असतील तर ते कळवा. अश्या सामूहिक प्रयत्नातून, आपण आपली एकजूट अभंग ठेवून, संकटाशी लढू शकतो. मतभेद विसरून जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा ते बळ अफाट असते. 

इतिहास गवाह हैं. सध्या माणसांचा जीव वाचवणं, रुग्णांना उपचार मिळणे, गोरगरीबांच्या पोटात अन्न पडणं, हे मला राजकारणापेक्षा, अतिशय अतिशय महत्त्वाचं वाटत आहे. कारण मी आधी म्हटलं तसं, मी एक हाडामासाचा माणूस आहे, ही सगळी माझी, आपली माणसं आहेत, त्यांची दुःख माझी आहेत. आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी माझे आणि सरकारचे प्रयत्न अथक राहतील. शंका नाही. पण या सगळ्या प्रवासात, मला तुमची जोड जर मिळाली तर अधिक बळ येईल, हे नक्की! याच्यातून आपण वाचणार, परत आपले आयुष्य पूर्वपदावर येणार, आणि मग तेव्हा काय ते वाद घालू, काय ते आरोप करु. ते  जरूर करूया, पण आता या घटकेला,माझ्या माणसांची आयुष्य, त्यांचं जगणं हे मला महत्त्वाचं वाटतेय. मला या घडीला, माझी शक्ती भांडण वाद करण्यात घालवायची नसून,  ती संकटाशी लढण्यात वापरायची आहे.

जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो।
खो रहा चैनो अमन, मुश्कीलो मे है वतन।
सरफरोशी की शमा दिलं मे जला लो यारो।

डॉ जितेंद्र आव्हाड



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1