कोरोना आपत्तीमध्ये ठाणेकरांचे हाल होत असून रूग्णांना अनेक समस्या आणि अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याबाबत ठाणे महानगर पालिका प्रशासन करीत असलेल्या चालढकल आणि दिरंगाईच्या विरोधात आज ठाणे मुख्यालयाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीने केलेल्या या आंदोलनात मनसेनेही सहभाग नोंदवला महासभा असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराजवळ ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यामध्ये मनसेचे अविनाश जाधव हेही सहभागी झाले होते. तर महासभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.
महापालिकेची व्होल्टास, बुश, बोरिवडे येथील रूग्णालयं बंद असून कौसा रूग्णालयही बंद आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन वाढीव बेड निर्माण करण्यात अपयशी ठरलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठीही रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. शहरातील रूग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यातही महापालिकेला अपयश आल्याचं या लक्षवेधीत म्हटलं आहे. महापालिकेच्या कोविड हॉस्पीटलमध्ये कर्मचा-यांची अपुरी संख्या असून एमबीबीएस किंवा बीएएमएस ऐवजी युनानी डॉक्टरांचा वापर होत आहे. तसंच निकृष्ट दर्जाचे पीपीई कीट, बॉडीबॅगऐवजी रूग्णाचा मृतदेह प्लास्टीक पिशवीत बांधल्याचा धक्कादायक प्रकार आणि व्हेंटीलेटर खरेदी प्रकरणी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यांना झालेली अटक यासंदर्भात नारायण पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली आहे.
या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महासभा असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानु पठाण, नगरसेवक सुहास देसाई उपस्थित होते. हे आंदोलन सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सहभागी झाले होते.
स्थानिक संस्था कर कमी करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करणा-या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. ठाण्यातील एका स्टेशनरीच्या व्यापा-याचा मागील तीन वर्षाचा स्थानिक संस्था कर कमी केल्याचा मोबदला म्हणून पालिकेच्या एलबीटी विभागातील लिपिक शरद उघाडे यांनी त्यांच्याकडे ५० हजार रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत विभागाने माजिवडा येथील कार्यालयात ४५ हजारांची लाच स्वीकारताना उघाडे यांना रंगेहात अटक केली.
0 टिप्पण्या