संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या "विठाईं"च्या स्म्रुतीस शतश: नमन !

तमाशा किंवा तमाशा कलावंत म्हटले की लोकं नाक मुरडतात नाही तर तोंड वाकडे करतात. त्यांना समाजात फारसा मान दिला जात नाही. पण त्यांच्या मध्ये ही किती " टॅलेंट " असतो हे बघा....  स्वतंत्र भारताच्या प्रत्यक्ष "राष्ट्रपतींना" देखिल, दोन मिऩीटे "थांबा" असे सांगणारी,  सतत दोन वेळा " राष्ट्रपती पारीतोषीक" मिळवणाऱ्या विठाबाई भाऊ नारायणगांवकर ! 

सन 1946 साली, कराड तालूक्यातील, 'गोळेगांव' मुक्कामी  त्यावेळचे नावाजलेले दोन फड समोरासमोर 'सामन्या'साठी ऊभे ठाकले होते! एक होता, भाऊ अकलेकर, तर दुसरा होता  भाऊ नारायणगांवकर! यांच्या सवाल जवाबातील जुगलबंदी पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला असताना, केवळ तमाशात 'स्त्री नर्तीका' नाही म्हणून कै.भाऊ नारायणगावकरांना हार पत्करावी लागली! ऊभ्या महाराष्ट्रात भाऊंनी आत्तापर्यंत "हार" पाहीली नव्हतीच ! हा अपमान भाऊंच्या जिव्हारी लागला होता! त्यावेळी "विठा", कै.मामा वरेरकरांच्या कलापथकात, मुंबईमध्ये काम करीत होती. स्वत: भाऊंनीच तिची अभिनयातील निपुणता वाढवण्यासाठी मामा वरेरकरांच्या विनंतीला मान देऊन तिला तेथे ठेवले होते. त्याच रात्री भाऊंनी मुंबई गाठली, व झाला प्रकार 'विठा'ला सांगितला मात्र !  "विठा"च ती...वाघिणीसारखी चवताळून ऊठली, व जन्मदात्या बापाचा अपमानाचा सुड घेण्यासाठी, आपल्या वडीलांबरोबर दुसऱ्याच दिवशी 'कोळेगांव'ला आली! त्याच रात्री तिथेच पुन्हा "सामना" सुरू झाला... 'भाऊ अकलेकर व भाऊ नारायणगांवकर या मातब्बरांचा सामना पाहण्यासाठी अवघा 'कराड' तालूका लोटला होता!

अनेक सवाल-जवाब झाले, पण कोणीही माघार घेत नव्हते, रात्र सरत चालली होती! आणि पहाटेच्या ऊगवत्या "शुक्रचांदणी" बरोबरच, "विठा" पहील्यांदाच वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी, बापासाठी पायऱ्यांना नमस्कार करून 'बोर्डा 'वर हजर झाली! समोर बसलेल्या हजारोंच्या जनसमुदायास "मुजरा" करून,  'विठा'ने पहीलाच सवाल आकलेकरांच्या 'शेवंता'स विचारला, "पुरूष समागम थेंबापोटी नार होतसे गरवार, परी नराश्रूच्या थेंबापोटी नार कोण ती गरवार?" आणि विठाच्या पहील्याच सवालाने शेवंताची 'दातखिळ'च बसली !  तिच्याकडेच काय, पण तिच्या बापाकडे, अकलेकराकडे देखील या सवालाचे उत्तर नव्हतेच ! 

 नियमाप्रमाणे शेवटी विठानेच उत्तर दिले, "रम्य वनी हो रसक्रिडेत नारायण ते रमले गं, प्रणयाचे ते कर्म देवाचे चोरून 'मोरा'ने पाहिले गं.. मोराच्या या दुष्क्रुत्याने  देव तयावर कोपले गं...  प्रणयाचे हे भाग्य तुजला  नाही मिळणार वदले गं...  मोराला शाप देताच वंश विस्तारा साठी मोर गयावया करू लागला! तेव्हा देवाला दया येऊन, मोराच्या 'प्रणयविरहीत' वंशविस्तारासाठी त्याने मोराला 'उ:शाप' दिला,

"गरजतील मेघ जेव्हा नभाला...
करशील आकांत बघून मेघाला...
अश्रू नेत्रांची गळतील भुईला..
गिळताच ती भार्या तुझी
देईन जन्म पिलाला! आणि हजारो जनसमुदायासमोर फक्त "विठा"च जिंकली होती! व तेही जन्मदात्या बापाच्या अपमानाचा बदला घेऊनच! तेही पहील्याचसलामीला!


सुमारे अर्धशतक विठाबाईंनी महाराष्ट्र  हलवला, झुलवला, खुलवला व फुलवला देखील!  नाटक, सिनेमा यामधून देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला!  मुंबईत चेंबूरच्या आर. के. स्टुडीओमध्ये "राम तेरी गंगा मैली" या चित्रपटाचे शुटींग चालू असताना, विठाबाईंच्या गाड्या तिथून जात होत्या, तर शुटींग पाहायला आलेले लोक राज कपूर, मंदाकीनीला सोडून, विठाबाईंच्या फक्त गाड्या पाहण्यासाठी त्यांच्याभोवती गराडा घालून बसले होते. स्टुडिओच्या दारातून राज कपूरला ते दृश्य दिसले, तर त्याने शुटींग थांबवून, विठाबाईंना बोलावून घेतले, स्वत:च्या शेजारी विठाबाईंना बसवून घेऊन, या "चित्रसम्राटा"ने तिला स्वत:च्या "बरोबरी"च्या सन्मानाने वागवले!

कारण त्याला "विठाबाई" माहीत होती!
ज्या काळात, हिंदी चित्रपटस्रुष्टी राज कपूरच्या ईशाऱ्यावर नाचत होती, "मधूबाला"पासून तर "झीनत अमान" पर्यंत, त्याच्या चित्रपटामध्ये काम मिळावे म्हणून आघाडीच्या अभिनेत्री  राज कपुरपुढे"लोटांगण" घालत होत्या....त्याच "राज कपूर"ने स्वत:च्या चित्रपटात काम करण्याची विनंती  "विठाबाई"ला केली तर...

"मै जहाँ हूँ , जिस दुनियामे हूँ, खुष हूँ...आपकी दुनिया मुझे कभी रास नही आ सकती!"असे बाणेदार पण नम्रपणे उत्तर देऊन, विठाबाईंनी स्वत:चे "विठापण" जपले, व ज्या जन्मदात्या बापासाठी तिने वयाच्या आकराव्या वर्षी तमाशाच्या बोर्डावर पाऊल ठेवले होते, त्याच बापाचे नांव पुढे चालवण्यासाठी "तमाशा" कलेसारख्या "जीवंत" कलेचीच सेवा करायची 'शपथ' तिने घेतली होती...व ऊभी हयातभर ती निभावली देखील!

सन 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले होते! पंतप्रधान मा. जवाहरलाल नेहरू फार मोठ्या चिंतेत होते. नेहरूंनी 'कृष्णा मेनन' यांना हटवून "संरक्षणमंत्री" या पदावर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या खांद्यावर 'संरक्षण' मंत्रीपदाची जबाबदारी दिली होती! अवघ्या भारतात ,"हिमालया'च्या मदतीला 'सह्याद्री' धलावला" अशी महाराष्ट्राची शान वाढवणारी गोष्ट घडून आली होती!  भारताची तयारी नसताना, अचानक झालेल्या आक्रमणामुळे, आपली पिछेहाट होत होती. त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य टिकवणे, ही मोठीच जबाबदारी स्व. चव्हाणसाहेबांवर होती.. सीमेवर बहूतेक ठिकाणी  "मराठा बटालियन" झूंज देत होती!  व त्यांचे मनोधैर्य टिकवण्याकरीता सैनिकांचे काहीतरी वेगळे मनोरंजन करणे आवश्यक होते.  मा.यशवंतरावांनी, विठाबाईंनाच युद्ध चालू असताना सीमेवर सैनिकांसमोर कार्यक्रम करण्याची विनंती केली! देशसेवेच्या चालून आलेल्या सुवर्णसंधीला विठाबाईंनी तत्काळ होकार दिला. डोळ्यां समोर बाँम्ब फुटत असताना, स्वत:च्या मृत्यूचीही तमा न बाळगता, विठाबाईंनी भारत-चीन सीमेवर "नेफा" आघाडीवर तब्बल दोन आठवडे मराठी तसेच हिंदी भाषेत कार्यक्रम दाखवून जे देशाची सेवा करतात, त्यांची सेवा करून फार मोठे राष्ट्रकार्य केले आहे! एवढ्या मोठ्या कार्याची व लोकरंजनातून लोकशिक्षणाची फार मोठी जबाबदारी, उभी हयातभर विठाबाईंनी पार पाडली! व याची दखल प्रत्यक्ष भारत सरकारला घ्यावीच लागली..

तत्कालिन राष्ट्रपती आर वेंकटरमन, यांच्या हस्ते विठाबाईंना "संगीत नाटक अकादमी पुरस्कार" स्विकारण्यासाठी "राष्ट्रपती भवन" दिल्ली, या ठिकाणी बोलावून घेण्यात आले. ता.18 एप्रील 1990 रोजी, महाराष्ट्राच्या 'तमाशा' क्षेत्रातील महान कलावंत "विठाबाई" यांना पुरस्कार देण्याचे नक्की झाले!  दिल्लीतील फिरोजशहा रोडवर असलेल्या, "रविंद्रनाथ भवन" येथे पुरस्कार देण्यासाठी भारताचे राष्ट्रपती मा.आर. वेंकटरमन, आपल्या सुविद्य पत्नी सौ. जानकीदेवी यांच्यासोबत आले.  

महाराष्ट्राच्या 'तमाशा' कलाक्षेत्रात "विशेष प्राविण्य" मिळवणाऱ्या, लोकरंजनातून लोकप्रबोधन व लोकशिक्षन देणाऱ्या, "विठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर" या लोकनाट्य तमाशाच्या 'मालकीण' ....."विठाबाई भाऊ खुडे" असे नांव पुकारल्याबरोबर विठाबाईंच्या डोळ्यात टचकन पाणीच आले! जुन्या स्मृती जाग्या झाल्या..! आजपासुन बरोबर तीस वर्षांपुर्वी, 1961 साली, तत्कालीन राष्ट्रपती मा. डाँ. राजेंद्रप्रसाद, यांच्या हस्ते हाच पुरस्कार चुलतबंधू कै. बापु खुडे नारायणगांवकर, यांनी स्विकारण्याआगोदर, विठाबाईंना त्यांनी तो स्विकारण्याची विनंती केला होती! पण विठाबाईंनी "मी दुसरा मिळविनच!" असे बापूंना वचन दिले होते व त्या वचनाची पुर्तता आज झाली होती!

गालावर ओघळणारे आनंदाश्रू पुसून विठाबाई पुरस्कार स्विकारण्यासाठी व्यासपिठावर राष्ट्रपती आर.वेंकटरमन यांच्यासमोर कँमेऱ्यांच्या लखलखाटात उभ्या राहील्या. एका सुशोभीत ताटात एका युवतीने "विठाईं" साठी आणलेला पुरस्कार, तिला देण्यासाठी राष्ट्रपतींनी हातात घेतला....... तोच विठाबाईंनी हात दाखवून थांबवले! सारे प्रेक्षाग्रह स्तब्ध झाले. त्याचवेळी "विठाबाई" भारताच्या महामहीम "राष्ट्रपतीं"ना म्हणाल्या..... "थांबा साहेब!  आपण या पदावर जे आहात, त्यामागे तुमच्या पत्नी  "बाईसाहेबा"चे देखील मोठे योगदानआहे....त्यांनाही व्यासपिठावर तुमच्या बरोबरीने उभे करा! "  आत्तापर्यंत पुरस्कार वितरणासाठी राष्ट्रपतींबरोबर कधीही त्यांच्या पत्नी व्यासपिठावर येत नसत...! नव्हे, तसा "प्रोटोकाँल" नसायचाच...!! पण "विठाबाईंनी" प्रत्यक्ष भारताच्या "महामहीम राष्ट्रपतीं" ना देखील हात दाखवून "दोन मिनीटे" थांबायला लावून "स्त्री शक्ती "चे महत्व स्वत:च्या क्रुतीतून संपुर्ण राष्ट्रास दाखवून दिले!

सौ. जानकीदेवी, राष्ट्रपतींच्या शेजारी येऊन, उभ्या राहीपर्यंत प्रत्यक्ष राष्ट्रपतींनाही "दोन मिनीटे" ताटकळत ठेवण्याची  "पात्रता" एका महान "तमाशा कलावंतीणी" मध्ये, अखंड हिन्दूस्थानने पाहिली!

दुसऱ्या दिवशी संपुर्ण देशातील आघाडीच्या वृत्तपत्रात  पहील्याच पानावर ही "बातमी" ऊभ्या "हिन्दूस्थान"मध्ये "विठाईं"च्या नाव व फोटोसकट झळकली!

"विठाईं"च्या स्म्रुतीस शतश: नमन!🙏

- तात्या कोळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1