Top Post Ad

महान साहित्यिक : छत्रपती संभाजी महाराज


 छत्रपती संभाजी महाराजांचा  युद्धभूमीवरिल पराक्रम इथल्या पुरोहितशाहीने दडवून ठेवला तसच त्यांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान सुद्धा दडवून ठेवण्याचे काम यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धभूमीवर जसी तलवार चालवली तसंच साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा वयाच्या 14 व्या वर्षा पासून लेखणी चालविण्याचे काम केले आहे. संभाजी राजेंना पणजोबा मालोजीराजें पासून जसा तलवारीच्या पराक्रमाचा वारसा प्राप्त झाला तसाच भोसले कुळातून लेखणीचा वारसा प्राप्त झाला होता. शंभूराजेच्या साहित्याच्या क्षेत्रातील कार्याचा उल्लेख संत तुकाराम महाराजांच्या शब्दात करावयाचा झाल्यास तो असा..... 

"आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका,  तुका म्हणे पहा, शब्दची हा देव, शब्दची गौरव, पूजा करू  संत तुकाराम महाराज व भोसले कुळाकडून छत्रपती संभाजी महाराजांना लेखणी व शब्दांचा वारसा कसा मिळाला तो प्रथम बघू या...  

++ आजोबा शाहजी राजे :-  शहाजी राजेंच्या आई उमाई. उमाई राजकारणात जशा निपुण होत्या तसेच त्या उत्तम धर्म चिंतक होत्या. मालोजी राजेंच्या मृत्यू नंतर उमाईने शहाजी राजेंवर राजकारण, धर्म, अर्थ, साहित्य, संस्कृती यांचे संस्कार केलेत. शहाजी राजेंना हिंदी, मराठी, तामिळ, कन्नड, या भाषा जशा अवगत होत्या तसेच ते संस्कृत भाषेचे महानपंडित होते. संस्कृत ज्ञानी म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांचा उल्लेख केल्या जातो. शहाजी राजेंनी अनेक साहित्यिक, विद्वान यांना राजश्रय दिल्याचे उदाहरणे जयराम पिंडे लिखित 'राधामाधवविलासचंपू' या ग्रंथात आढळतात.  शहाजी राजे दरबारातील साहित्यिक, विद्वाना सोबत चर्चेत सहभागी होवून त्यांना अनेक समस्या घालत असत. शहाजी राजेंनी लिहिलेले  साहित्य मात्र कालौघात नष्ट करण्यात आली आहेत. शहाजी राजेंनी शिवाजी महाराजांना जी राजमुद्रा बनवून दिली होती, त्या राजमुद्रेवर शहाजी राजेंनी जे शब्द कोरले आहेत; त्यावरून आपण विचार करावा की त्यांचे शब्दांवर किती प्रभुत्व होते.  

++ काका संभाजी राजे :-   छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे हे वडील शहाजी राजेंच्या संस्कारात घडले व वाढले. यांचे सुद्धा वडिलांप्रमाणे मराठी, हिंदी, कन्नड व पारशी भाषे बरोबर संस्कृत भाषेवर सुद्धा प्रभुत्व होते. दरबारातील कवींना अनेक समस्या घालून त्यावर चर्चा करीत असत. तत्कालीन कवींनी त्यांचा शीघ्र कवी म्हणून उल्लेख केलेला आहे.  जयराम पिंडे व वेदाजी पंडित या लेखकांनी संभाजी राजेंना साहित्या बरोबर संगीत, नृत्य या कलांचीही आवड असल्याचे उल्लेख केले आहेत.  

++ वडील छत्रपती शिवाजी महाराज :-  वडील शहाजी राजे आणि ज्येष्ठ बंधू संभाजी राजें प्रमाणे शिवाजी महाराजही अनेक भाषा व शास्त्रात पारंगत होते. शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोष, आज्ञापत्रे, शक यांची निर्मिती करुन साहित्यात सुद्धा आपण छत्रपती आहोत हे जगाला दाखवून दिले. महाराजांनी निर्माण केलेले राज्य व्यवहार कोष,आज्ञापत्रे आज सुद्धा आम्हाला मार्गदर्शक ठरत आहेत. महाराजांनी पारशी भाषेत कविता केल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. त्यांचे साहित्य युरोपातील इंग्लंड, इटली, पोर्तूगाल या देशाबरोबर तंजावर च्या संग्राहालयात उपलब्ध असावेत.  

++ तंजावर व साहित्य :-   शहाजी राजेंनी बंगळूर येथे स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. पुढे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी तंजावर येथे स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. व्यंकोजी राजे सुद्धा भाषा पंडित होते तर त्यांच्या पत्नी दीपाराणीसाहेब महान तत्वज्ञ होत्या. दीपाराणीसाहेबांचा उल्लेख चिंदड शंकर या गोसाव्याने 'बुद्धिस बृहस्पती ' असा केला आहे.  व्यंकोजीचे पुत्र शहाराज यांनी मराठी, तेलगू, तामिळ, हिंदी, कन्नड, पारशी, संस्कृत या भाषेत लिखाण केले आहे. जगातील पहिले मराठी नाटक 'पंचभाषा विलास ' शहराज यांनी लिहिलेले आहे.  हे आम्हास माहित असू नये.  याच शहराजांवर पन्नास साहित्यिकांनी ग्रंथ लिहिलेली आहेत.  

                हा भोसले कुळाचा साहित्याचा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी जोपासला व त्यास वृंधीगत केले.  भोसले कुळाची साहित्य संपदा तंजावर येथील 'सरस्वती महाल ' या ग्रंथालयात अभ्यासायला मिळेल.  

++ साहित्यिक संभाजी महाराज :-  छत्रपती संभाजी महाराजांनी भोसले कुळाचा अर्थातच शिव कुळाचा वारसा तलवारी बरोबर लेखणी चालवत जोपासला.  आजची आमची मुलं ज्या वयात कॉपी पेस्ट लेखन करतात आणि परीक्षा केंद्रावर माय बापांना मुलांना सोडायला जावं लागत त्या 14 व्या वर्षाच्या वयापासून लेखनास सुरुवात केली होती.  संभाजी महाराज एक महान साहित्यिक होते,  हे आम्हा माय बापांनाच माहिती नाही तिथे मुलांना किती माहिती असेल, हा वेगळा प्रश्न. छत्रपती संभाजी महाराजांनी 32 वर्ष्याच्या अत्यंत धावपळीच्या आयुष्यात त्यांनी चार विविध भाषेतील पुढील ग्रंथांचे लेखन केले आहे. . 1. बुद्धभूषण   2.  नायिकाभेद 3. नखशीख   4. सातसतक     

++ बुद्धभूषण :-   हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. बुध म्हणजे विद्वान आणि भूषण म्हणजे दागिना. म्हणजे, विद्वानांचा दागिना, असा 'बुद्धभूषण' ग्रंथ संभाजी राजेंनी लिहिलेला आहे.  सध्या उपलब्ध बुद्धभूषण तिन अध्यायात आहे.  संभाजी राजेंनी या ग्रंथाच्या लेखनास सन 1671 मध्ये म्हणजे वयाच्या 14 व्या वर्षी सुरु करुन सन 1675 च्या दरम्यान पूर्ण केला.  बुद्धभूषण हा ग्रंथ राजनीती, राजकारण, राज्य कारभार यावर भाष्य करणारा आहे.  बुद्धभूषण या ग्रंथात 883 श्लोक असून ते तिन अध्यायात विभागलेले आहेत.  पहिल्या अध्यायात 194 श्लोक असून त्यात संभाजी राजेंनी शिव कुळाचा सांस्कृतिक वारसा सांगितला आहे.  भोसले कुळाचीही परंपरा सांगून सिंधू संस्कृती बद्दल आदर व्यक्त केलेला आहे.  दुसऱ्या अध्यायात 630 श्लोक असून, हा अध्याय राजनीतीवर आधारित आहे. तिसऱ्या अध्यायात 59 श्लोक असून हा अध्याय मिश्र प्रकरणात येत असला तरी सुद्धा राजपूत्रासाठी सामान्यनीती सांगण्यावर अधिक भर देतो.  वर्तमानात लोकशाही शासन व्यवस्थेतील राज्यकर्त्याना मार्गदर्शन करणाऱ्या या ग्रंथाचे राज्यकर्त्यानी एकदा अवश्य वाचून, त्यातून प्रेरणा घेवून लोककल्याणकारी राज्यकारभार करावा. अशी अपेक्षा.  

++ नखशीख :-  संभाजी राजेंनी हिंदी भाषेतील ब्रज भाषेत लिहिलेला हा दुसरा ग्रंथ होय.  या ग्रंथाच्या शीर्षकावरून लक्षात येतो की, नखा पासून ते शिखा (शीर / डोकं ) पर्यंतच्या सौंदर्याच काव्यात्मक वर्णन करणारा ग्रंथ आहे.  या ग्रंथात 136 पदे आहेत.  जवळपास सर्व कवींनी स्त्री सौंदर्याचे वर्णन हे डोक्यापासून पायाकडे केलेले आहे, म्हणजे शीखनख. परंतु संभाजी महाराजांनी 'नखशीख' असे वर्णन करून स्त्रीच्या पायांना वंदन करुन, तिला मातृत्व समजून सौंदर्याचे वर्णन केलेले आहे. 

++ नायिकाभेद :- हा तिसरा ग्रंथ सुद्धा ब्रज भाषेत असून सौंदर्य आणि लोकनृत्याशी सांस्कृतिक ओळख सांगणारा आहे. शिव कुळातील स्त्रिया शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध नृत्य सादर करत असत.  त्या नृत्य करणाऱ्या नायिकांचे विविध नृत्य प्रकार (भेद ) या ग्रंथात सांगितलेले आहेत.  शिव कुळात नृत्य शिव मंदिरात केले जात होते.  पुढे दक्षिण भारतातील भरत नावाच्या एका ब्राम्हण कलाकाराला नायिकाभेद हा ग्रंथ सापडला, त्याने या ग्रंथात दिलेल्या विविध भाव मुद्राचा अभ्यास करून एक नवा नृत्य प्रकार जन्मास घातला व त्यास 'भरतनाट्यम' हे नाव दिले. भरतनाट्यम या नृत्याचा जन्मदाता नायिकाभेद हा ग्रंथ असून या ग्रंथाचा निर्माते छत्रपती संभाजी महाराज होत. हे नेहमी स्मरणात असू द्या.  

++ सातसतक :-   संभाजी महाराज लिखित हा चौथा ग्रंथ अध्यात्मावर आधारित आहे.  संभाजी राजेंनी तरुण वयात अध्यात्मावर केलेली ग्रंथ रचना आश्चर्यचकित करणारी आहे.  या ग्रंथात 100 पदे आहेत.  संतांचे महात्म्य सांगण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केल्याचे सांगताना ते एका श्लोकात म्हणतात, " सीता पग नष चंद की भजी कै सभ समाज | सातसतक ग्रंथ ही रच्यो संतन के हिन काज |  

             संभाजी महाराजांचे हे चार ग्रंथ सध्या पूर्ण स्वरूपात उपलब्ध नसून त्रोटक स्वरूपात आहेत.  एकीकडे हजारो वर्षाच्या स्मृती, पुराणे, वेद जतन केल्या जातात तर चारशे वर्षा पूर्वीचे संभाजी महाराजांचे ग्रंथ उपलब्ध असू नयेत. ही ग्रंथ संपदा नष्ट करणारे नक्की ज्यांनी स्वराज्य नष्ट करुन पेशवाई आणली ते पेशवेच असू शकतात.  महाराजांनी या व्यतिरिक्त विपुल साहित्य संपदा लिहिली असेल परंतु त्याचे योग्य जतन न झाल्यामुळे आपणास एका महान ज्ञानापासून मुकावे लागत आहे.  

++ संभाजी महाराज गागाभटाचे गुरु :-  छत्रपती संभाजी महाराजांचे पंडित्य सांगण्यासाठी, त्यांचे गुण वर्णन करण्यासाठी, त्यांच्या ज्ञानाला वंदन करण्यासाठी त्या काळातील जागविख्यात काशीचे ब्राम्हण पंडित गागाभट यांनी संस्कृत भाषेत समयनय हा ग्रंथ लिहून हा ग्रंथ गागाभटाने संभाजी राजेंना अर्पण केला होता.. त्यावेळी संभाजी राजेंचे वय फक्त 18 वर्षाचे होते. एका वयोवृद्ध पंडिताने 18 वर्षाच्या तरुणाला आपला ग्रंथ अर्पण करावा यातच संभाजी महाराजांची विद्ववता दडलेली आहे.  राज्याभिषेका प्रसंगीच्या धार्मिक चर्चेत गागा भटाला राजेंची विद्वता प्रखरतेने जाणवली होती. म्हणूनच एका तरुण पण विद्यासंपन्न पंडित छत्रपती संभाजी राजेंना समयनय हा ग्रंथ अर्पण करून गुरुस्थानी मानले होते.   

    असे महान साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज या भारत भूमीत जन्माला आले, हे आपणास किती गौरवास्पद आहे.  अशा महान साहित्यिकास स्मृतीदिनी विनम्र अभिवादन....... !!! 

=========== अनिल भुसारी, तुमसर जि.  भंडारा  8999843978

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com