ठाणे
ठाणे महापालिकेच्या वतीने ठाण्यातील 👉आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, दादोजी कोंडदेव स्टेडियम, 👉 ग्लोबल कोव्हिड हॉस्पीटल, साकेत 👉 कळवा हेल्थ सेंटर 👉 छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा 👉 रोजा गार्डेनिया हेल्थ सेंटर, घोडबंदर रोड 👉 किसान नगर हेल्थ सेंटर 👉 लोकमान्य नगर हेल्थ सेंटर 👉 पोस्ट कोव्हीड सेंटर, माजीवाडा 👉 वर्तकनगर हेल्थ केअर सेंटर 👉 शिळफाटा हेल्थ सेंटर 👉 कोपरी प्रसुती केंद्र 👉 मानपाडा हेल्थ सेंटर 👉 मनोरमा नगर हेल्थ सेंटर 👉 गांधीनगर हेल्थ सेंटर 👉 कौसा हेल्थ सेंटर 👉 शाहू मार्केट, नौपाडा इत्यादी ठाणे महापालिका क्षेत्रात ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांना वेळेत लस मिळावी म्हणून नियोजन करण्यात आले आहे. याबरोबरच नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी ठाण्यातील नऊ खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दरम्यान प्राईम होरायझन रूग्णालयामध्ये उद्यापासून लसीकरण मोहिम सुरू करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात २५ ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या सर्व ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहेत. सर्वच लाभार्थ्यांना वेळेत लस मिळावी तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आता नवीन 9 खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ठाण्यातील सिद्धिविनायक रुग्णालय, वेदांत हॉस्पिटल,घोडबंदर रोड, ज्युपिटर हॉस्पिटल, काळसेकर रुग्णालय, प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हाईलँड हॉस्पिटल आणि कौशल्य रुग्णालय आदी खाजगी हॉस्पिटलचा समावेश आहे. या सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
कोविड काळात अवाजवी बिल आकारणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले होते . कोरोनासाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी रुग्णालयातून रुग्णांची लूट होत असलेल्या अनेक तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने खाजगी रुग्णालयांवर लेखापरिक्षणाकरिता वेगळे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने दिलेल्या अहवालात कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांकडून केवळ ४० दिवसांमध्ये १ कोटी ८२ लाख रुपये जादा बिले आकारली असल्याची बाब उघड झाली होती. परिणामी सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी बील आकारणाऱ्या होरायझन प्राईम या रुग्णालयाची कोविडची मान्यता रद्द करण्यात आली होती.. एक महिन्यांची नोंदणी रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला होता. मात्र आता त्याच रुग्णालयातून कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान आज महापौर नरेश म्हस्के यांनी हाजुरी आरोग्य केंद्र, काजूवाडी आरोग्य केंद्र व मेंटल हॉस्पिटल येथील आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती निशा पाटील, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका मीनल संख्ये, माजी नगरसेविका नम्रता भोसले- जाधव उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे राहू लागू नये तसेच गर्दी होवू नये यासाठी लसीकरणाची केंद्रे वाढविण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले होते, त्यानुसार नवीन लसीकरण केंद्रे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुरू केली, त्याचा आढावा महापौरांनी यावेळी घेतला असून ठाण्यात आजमितीला 25 लसीकरण केंद्रे सुरू आहेत. या सर्व लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था व पाण्याची सोय करण्यात यावी, तसेच काही आरोग्य केंद्रावर त्रुटी असल्यास त्या ही दूर कराव्यात असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
0 टिप्पण्या