सिंघानिया स्कूल जवळ पादचारी पूल उभारण्याला भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. कोपरी येथे अर्धवट उभारण्यात आलेला पूल पाडण्यात आला. त्यात साडेनऊ कोटी रुपयांचा खर्च वाया गेला होता. याचा शिवसेनेच्या नगरसेवकांना सोयीस्कर विसर पडला असेल. आता तत्वज्ञान विद्यापीठ आणि आर मॉल येथील पुलही तोडण्यात येणार आहेत, हे भ्रष्टाचारात आंधळे झालेल्या शिवसेना नगरसेवकांना दिसत नसावे, असा टोला भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.
तुर्फे पाडा तलावासाठी नऊ कोटी रुपये खर्च केल्याचे शिवसेनेने आणि नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी सिद्ध केल्यास आपण राजकीय संन्यास घेउ, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. प्रेस नोटच्या माध्यमातून माझ्या नावाने ‘रोज माणसे मरतात, प्रसिद्धीमाध्यमे बेजबाबदार, अशी निखालस खोटी विधाने करण्यात आली. भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी निघालेल्या शिवसेनेकडून हीच अपेक्षा! असा टोला लगावला. ठाणे महापालिकेने तीन वर्षांसाठी अन्नछत्राला जागा दिली. त्यातील एक वर्ष संपले. गरज असेल तर अवश्य शिवसेनेने ती जागा ताब्यात घ्यावी, कोरोनाच्या काळात तब्बल दीडशे- दोनशे माणसे जमा करून मर्दुमकी दाखविणारी शिवसेना प्रत्यक्ष महासभेला का घाबरत आहे, बेकायदेशीररित्या अशी झुंडशाही करणाऱ्या शिवसेनेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही मनोहर डुंबरे यांनी पोलिसांकडे केली आहे.
ठाण्यातील वर्तकनगर, घोडबंदर रोड आणि पडवळनगर येथे स्कायवॉकचे काम मंजूर झाले आहे, हे काम शिवसेना फंड जमा करण्यासाठी करीत आहे, असे वक्तव्य करणा-या मनोहर डुंबरे यांना काल वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा राधिका फाटक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरसेवकांसह, ठाण्यातील विविध भागातील नागरिकांनी घेराव घालून जाब विचारत मनोहर डुंबरे यांनी ठाणेकरांची माफी मागावी अशी आग्रही भूमिका घेतली. मात्र डुंबरे यांनी माफी न मागता प्रसिध्दीमाध्यमांनी हे वृत्त चुकीचे प्रसिद्ध केले असल्याचा आरोप केला.
सिंघानिया शाळेसमोर नागरिकांच्या सोईसाठी स्कायवॉक बांधण्याचे प्रस्तावित आहे, वास्ताविक पाहता या कामाच्या प्रस्तावास सभागृहात मंजुरी देत असताना ते सभागृहात उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध न करता गप्प बसले होते. परंतु आता गटनेते झाल्यावर केवळ विरोधासाठी विरोध आणि स्वत:चे पक्षाचे स्थान बळकट करण्यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून बेताल वक्तव्य करीत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. या ठिकाणी स्कायवॉकची नितांत आवश्यकता आहे, यासाठी आपला विरोध का अशी विचारणा केली असता, माणसे तर रोज मरतात असे पुनश्च वक्तव्य करुन त्यांनी ठाणेकरांचा अवमान करुन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
वर्तकनगर विभागामध्ये मागील अनेक वर्षापासून नागरिकरण झपाट्याने होत आहे, या ठिकाणी स्कायवॉक होणे अत्यंत गरजेचे आहे, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथे स्कायवॉकची गरज आहे. यासाठी स्कायवॉक लवकरात लवकर व्हावे अशी नागरिकांची देखील मागणी आहे, असे असताना मंजूर कामाला विरोध करीत केवळ शिवसेनेला बदनाम करुन आपले पक्षात वर्चस्व वाढविण्यासाठी डुंबरे स्टंटबाजी करीत आहेत हे शिवसेना कदापि खपवून घेणार नाही असे राधिका फाटक यांनी नमूद केले आहे.
0 टिप्पण्या