ठाणे
ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व त्याची अंमलबजावणी या संदर्भात आढावा घेण्यासाठी आज नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे अशा गैरवर्तणूक नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी असा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान प्रभाग समिती दक्षता समित्यांची बैठक आयोजित करून त्या समित्यांमार्फतही कोविड १९ नियंत्रण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासन अत्यंत चांगल्या प्रकारे करीत आहे. परंतु मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढल्याने गैरसोय होण्यासाठी रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणे, रुग्ण्वाहिका व आवश्यक औषधसाठा करणे याबाबत प्रशासनास सूचित करण्यात आले. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृहनेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते अशरफ पठाण(शानू), आरोग्यसमिती सभापती निशा पाटील, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, संदीप माळवी, वै्द्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर, विधी सल्लागार मकरंद काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंती देवगीकर, डॉ. खुशबू तिवारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातील महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेने केलेल्या उपाययोजना व प्रतिबंधात्मक कारवाई संदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. तर महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरण मोहिम अत्यंत प्रभावीपणे सुरू असून राज्यात व जिल्हयात ठाणे हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे नमूद केले. ठाणे शहरात लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून महापालिकेला आवश्यक असलेला लसींचा कोटा उपलब्ध करुन मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांचा आढावा घेतला असता इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई पोलीस विभागांच्या माध्यमातून संयुक्तरित्या करण्यात येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा आकडा मर्यादित असला तरी भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी स्वत:च दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, मास्कचा वापर कटाक्षाने करणे, महापालिका व पोलीस प्रशासन देत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी केले. नागरिकांनी नियम पाळून जबाबदारीने वागावे अन्यथा लॉकडाऊन अटळ आहे, नागरिकांनी सहकार्य न केल्यास नागरिकांमुळेच लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल असे महापौर नरेश म्हस्के यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
ठाणे शहरातील सर्वच ठिकाणी फेरीवाले कोणत्याही प्रकारची दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रभागसमिती स्तरावरील सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याबाबतही या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असताना वैद्यकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यास आपण कोरोनावर नियंत्रण आणू शकतो असा विश्वास महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केला.
-----------------------------------------------------
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत कॅडबरी जंक्शन येथील सुशोभीकरण कामाची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रभागसमितीनिहाय स्वच्छेतेच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असून आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी आदी ठिकाणांच्या साफसफाई तसेच सुशोभीकरण कामाची पाहणी केली. कोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसापासून प्रत्येक प्रभागसमितीनिहाय साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या