कल्याणमधील शिवसेनेचे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

 कल्याण पूर्वेला नेतीवली चौकात लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या एका बॅनरवर थेट शिवसेनेचे दोन मातब्बर  नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि नविन गवळी यांचे फोटो झळकले आहेत. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पक्षाकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबादारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर नाना पटोले आज पहिल्यांदा कल्याणमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आले. या कार्यक्रमानिमित्त त्यांचे कल्याण नगरीत स्वागत आहे, असा बॅनर काँग्रेसच्या नेतीवली नाक्यावर लावण्यात आला आहे. मात्र या बँनरवर शिवसेना नगरसेवकांचे फोटो झळकल्यामुळे कल्याणमध्ये राजकीय चर्चा रंगली आहे. 

गेल्या आठवड्यात याच परिसरात नेतीवली नाक्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणारा बॅनर शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी  लावला होता. मात्र, या बॅनरमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना टोमणे मारण्यात आले होते. ‘खासदार दिलदार है, मगर चमचो से लोग परेशान’, असा मजूकर या बॅनरमध्ये होता. या बॅनरमुळे कल्याणमधील शिवसेनेचे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. ही बातमी प्रदर्शित केल्यानंतर संबंधित वादग्रस्त बॅनर हटवून दुसरा शुभेच्छांचा बॅनर त्याठिकाणी लावण्यात आला होता.

कल्याणच्या नेतीवली चौकात दोन्ही बॅनर लावण्यात आले आहेत. नेतीवली चौकात मल्लेश शेट्टी यांचं ऑफिस आहे. विशेष म्हणजे या नेतीवली नाक्यावर मुंबई, नाशिक आणि पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या हजारो गाड्यांची रोजची वर्दळ असते. त्यामुळे या बॅनरविषयी सर्वत्र जोरदार चर्चा रंगत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA