Top Post Ad

शेतकरी आंदोलन, सचिन तेंडूलकर यांच्या फोटोवर काळे फासले

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या अमेरिकी पॉपस्टार रिहाना हिला सुनावल्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या  फोटोवर काळे तेल ओतून केरळमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  त्याचा निषेध केला आहे.  केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत मागील ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं या आंदोलनाबद्दल मत व्यक्त केल्यावर देशातील सेलिब्रिटी देखील व्यक्त होऊ लागले आहेत. देशातील काही क्रिकेटपटू व बॉलिवूड अभिनेत्यांनी रिहाना व ग्रेटाला सुनावलं आहे. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नका, असं काहींनी म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरचाही यात समावेश आहे. त्यावरून सचिनसह सर्वच सेलिब्रिटींवर टीका होऊ लागली आहे. मागील ७० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काहीच कसे वाटले नाही? इतके दिवस कुठे होतात? असा प्रश्न लोक करू लागले आहेत. भाजपच्या विरोधकांनीही या सेलिब्रिटींवर तोंडसुख घेतलं आहे. केरळमधील युवक काँग्रेसनं थेट रस्त्यावर येत सचिनविरोधात निदर्शनं केली. कोची येथे सचिनच्या पोस्टरवर काळे तेल ओतून त्याचा निषेध करण्यात आला.



मधूर आवाजाची धार

रॉबिन रियाना फेन्टो, तथा रियाना, ही वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात जन्मलेली एका फेरीवाल्याची मुलगी. लहानपणी ती आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर कपडे विकायची. त्यात वडील मद्यपी. आई सोडून गेलेली. शिवाय रियानाला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होता आणि त्यावर सतत उपचार सुरू होते. रियानाला आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. तिच्या शाळेत तिने गायलेलं गाणं एका अमेरिकन म्युझिक कंपनीच्या मालकाने ऐकून तिला तिथे बोलावली. "म्युझिक ऑफ द सन" हा तिचा पहिला अल्बम २००३ साली प्रसिद्ध झाला तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. तो इतका गाजला आणि खपला की तिथून तिने मागे वळूनच पाहिलं नाही. आज वयाच्या ३२ व्या वर्षी ती अब्जोपती आहे. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत. आपले जुने दिवस मात्र रियाना विसरलेली नाही. गरीब मुलांना शिक्षण, एड्स आणि कर्करोगाचे रुग्ण यासाठी ती खूप दानधर्म करते. एकूणच दुबळ्या घटकांबद्दलची तिची आस्था, पैसा आणि प्रसिद्धीमुळे संपलेली नाही.

दील्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश इथे शेतकरी आंदोलनाला चिरडण्यासाठी इंटरनेट बंद ठेवलं आहे. अमेरिकेच्या सीएनएन वृत्तसंस्थेने यावर एक सविस्तर बातमी दिली. तिचा दाखला देऊन, "आपण यावर का बोलत नाही?", असं ट्वीट तिने काल केलं आणि भारतातील सोशल मीडियावर रान उठवलं. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनात, ज्यात सुमारे ६० शेतकरी अद्यापपर्यंत मरण पावले आहेत, त्यावर भारतातील तमाम सेलिब्रिटी तोंडात मिठाची गुळणी धरून बसले असताना, अमेरिकेतली एक प्रख्यात गायिका आवाज उठवते, हे विलक्षण आहे. नव्हे, कित्येकांच्या तोंडात मारणारं आहे.

भक्तांची तर पार गोची झाली. तिला देशद्रोही म्हणता येत नाही की नक्षलवादी. पाकिस्तानात जा म्हणूनही सांगता येत नाही. "तू आमच्या अंतर्गत बाबीत कशाला ढवळाढवळ करतेस" असा दुबळा प्रतिकार काहींनी केला. त्यावर, "अबकी बार ट्रंम्प सरकार" बोंबलत आपले नेते तिथे कशासाठी गेले होते? ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का? अशा तीव्र प्रतिक्रिया स्वाभाविकपणे आल्या. हा वैश्विकीकरणाचा जमाना आहे. मानवतेशी निगडीत घटनांचे पडसाद आता त्या देशापुरते मर्यादित रहात नाहीत. ते जगभर उमटतात. जॉर्ज फ्लॉईड या काळ्या माणसाची अमेरिकेत पोलिसाकडून हत्या झाल्यानंतर अख्ख्या जगाने गुडघा टेकवून त्याला श्रद्धांजली वाहिली होती. त्यात जो बायडन होते तसेच मैदानावरचे क्रिकेटपटू सुद्धा होते. 

या नव्या जगात इंटरनेट बंद ठेवणं हा मुस्कटदाबीचाच एक अवतार आहे. दुर्दैवाने भारत आज यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. (आणि आपण 'डिजिटल इंडिया' करणार म्हणे). तुम्ही ही मुस्कटदाबी केलीत तरी जगात कुठे ना कुठे तरी आवाज उठणार आणि तुमची नाचक्की होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपला आवाज सुमधूर असला तरी त्याला धार सुद्धा आहे, हे रियानाने दाखवून दिलं.

Great Rihana you are simply great!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com